आत्म्याची तरफ

असे गांधीजी म्हणत आहेत. ते जी क्रान्ति करू पहात आहेत, तिची तरफ तुमच्या अंतःकरणांत आहे. त्या तरफेच्या जोरावर सारे जग बदलायचे आहे. महात्माजींनी आपले सत्याग्रहाचे शास्त्र, आपले क्रान्तिशास्त्र या आत्म्याच्या शक्तीतून निर्मिले आहे. महात्माजींचे प्राप्तव्य काय? गन्तव्य काय? त्यांचे ध्येय काय? रामराज्याची भाषा ते बोलत असतात. रामराज्य हे माझे ध्येय आहे असे ते म्हणतात. अहिंसेवर उभारलेली लोकशाही मला हवी आहे असे त्यांनी शतदा सांगितले आहे, लिहिले आहे. नैतिक पायावर, ऋतसत्याच्या दृढ आधारावर उभारलेली लोकशाही त्यांना हवी आहे. नैतिक नियमांच्या सुप्रतिष्ठेवर, श्रेष्ठत्वावर आधारलेली लोकशाही हे त्यांचे गन्तव्य आहे. समाजवाद, लोकशाही इत्यादी कल्पनांत, या विचारांत महात्माजी स्वतःचे काही तरी विशेष ओतूं पाहतात. या कल्पना रूढार्थाने ते स्वीकारीत नाहीत. त्या जशाच्या तशा ते घेत नसून त्यांत नवीन अर्थ ते ओततात. या कल्पनांत माझे रामराज्य मला हवे असे ते म्हणतात. ते रामराज्य ज्या समाजवादांत, ज्या लोकशाहीत नाही, त्याचे मला काय होय? समाजवाद, लोकशाही, इत्यादींचे पर्यवसान माझ्या रामराज्यांत व्हायला हवे. रामराज्य म्हणजे काय? रामराज्य म्हणजे आत्मारामाचे राज्य, आत्म्याचे राज्य. तो इतिहासपूर्वकालीन दाशरथी राम येथे अभिप्रेत नाही. ती स्थूल कल्पना महात्माजींजवळ नाही. महात्माजींचा राम म्हणजे जो अंतःकरणांत पूर्वी होता, आज आहे, पुढे असेल, तो आत्माराम होय. या रामाचे चिन्मय राज्य त्यांना हवे आहे. ही जी हृदयांतील आध्यात्मिक दिव्यता, तिचे सहजसुंदर राज्य त्यांना हवे आहे. सर्वांना जर हे आत्मदर्शन झाले, त्या आत्मदर्शनाच्या आनंदांत सारे जर मस्त होऊ लागले, तर सारे सत्यनिष्ठ होतील, सारे एकमेकांवर निर्मळ, अवर्णनीय असे प्रेम करू लागतील. बाहेर कोणती शाही आहे याचे त्यांना भानहि नसेल. बाहेरचे स्वरूप कोणतेहि असो, आपण होऊनच सारे नैतिक वृत्तीने वागतील, खरा मानवधर्म आचरतील. तेथे मग नकोत दंडयोजना, नकोत शिक्षाप्रकार. तेथे शासनसंस्थाच उरणार नाही. ती गळून पडेल. तिची जरूरच उरणार नाही. सर्वत्र आत्मारामाचे एकछत्री राज्य ! जणू सत्ययुगाचा सूर्य उगवला. महात्माजींच्या समोर हे असे परम मंगल, परम दिव्य ध्येय आहे. हे रामराज्य प्रथम प्रत्येकाच्या हृदयांत स्थापन व्हायला हवे. सर्वांच्या हृदयांत रामरावण आहेत. तेथे रात्रंदिवस युध्द चालले आहे. तुकाराम महाराजांनी म्हटले आहे.

''रात्रंदिन आम्हां युध्दाचा प्रसंग
अन्तर्बाह्य जग आणि मन ।''

राम म्हणजे सद्बुध्दि, न्याय्य वृत्ति. रावण म्हणजे अहंकारी वृत्तीचे प्रतीक. रावण अन्याय्य वृत्तीचे द्योतक. आपणांस खरी लोकशाही हवी असेल तर आपण प्रथम अंतःकरणांत मेळ घातला पाहिजे. तेथील गदारोळ बंद केला पाहिजे. तेथे रामाचे म्हणजेच सत्याचे निरपवाद राज्य स्थापले पाहिजे.

महात्माजी शासनहीन ध्येयाचे पुरस्कर्ते

गांधीजींना लोकशाहीचे शेवटी अ-राजक स्थितीत परिणमन व्हावे असे वाटते. राज्यतंत्रच नको. शासनसंस्थाच नको. कारण शासनसंस्था म्हटली म्हणजे हिंसा आलीच. या जगांत सहकार्यानें सारा मानवसमाज वागत आहे हे गांधीजींच्या विचारांचे परम ध्येय आहे, अंतिम सार आहे. ते ध्येय डोळयासमोर ठेवून ते पावले टाकतात. ती जी अंतिम दंडहीन व्यवस्था, तिच्या निकषावर घांसून, त्या ध्येयाच्या कसोटीवर पारखून ते योग्य काय, अयोग्य काय ते ठरवितात. ती जी अंतिम अराजक स्थिति, तेथे सक्ती अस्तास जाईल. तेथे पोलीस नाही, लष्कर नाही. ते ध्येय डोळयांसमोर ठेवून आपण जाऊं या, असे गांधीजी अट्टाहासाने सर्व जगाला सांगत आहेत. आपणांस एकदम आज ही अ-राजक स्थिति, ही सहज सहकार्याची सुंदर, मंगल स्थिति आणतां येणार नाही ही गोष्ट खरी; परंतु ध्येय तरी हें असू दे. राज्यसंस्था हे अंतिम ध्येय नको. राज्यसंस्था, शासनसंस्था, हे अलीकडचे ध्येय आहे. अपूर्णावस्थेतील हे ध्येय आहे. हा एक टप्पा आहे. त्या अ-राजक स्थितीच्या जवळ जायला अत्यन्त जवळचा मार्ग म्हणजे अहिंसेवर आधारलेली लोकशाही होय.Democracy based on nonviolence is the
nearest approach to the purest form of anarchy. विशुध्दत्तम अ-राजक ध्येयाजवळ जायचा अत्यन्त निकटवर्ति मार्ग म्हणजे अहिंसक लोकशाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel