डोळयांना कधींहि न दिसणारें साध्य संत पदोपदीं अनुभवीत असतात आणि अत्यानन्द अनुभवतात. त्यांना ती अनुभूति येत असल्यामुळें त्यांच्या सर्व क्रियेंत विवेक येतो. आदर्शाचा ज्याला अनुभव नाहीं, त्याला विवेकहि नाहीं. आदर्श सृष्टीचा ध्यास अंतःकरणाला लागला कीं विवेक येऊं लागेल. महात्मा गांधी म्हणतात,''माझीं ध्येयें मला माझ्या देहांपेक्षां, माझ्या हातापायांपेक्षांहि जवळचीं आहेत.'' बाह्यतः तीं अत्यंत दूरचीं दिसतात. व्यवहारांत तीं केव्हा येतील तेव्हां येतील. ध्येयाचा हा गुणच आहे कीं, तें अनंत, असीम, अप्राप्य असें सदैव वाटत असतें. The virtue of an ideal is in tis boundlessness. माणसें अपूर्ण आहेत. ध्येयें अनंत आहेत. जों जों आपण त्यांच्याकडे जातों तों तों तीं आणखीनच दूर जातात. "Nearer we go, farther they seem, Still they are nearer to us than our hands and feet." असें महात्मा गांधी म्हणतात. जों जों त्यांच्या निकट जावें तों तीं आणखी दूर पळतात. तरीहि तीं आपल्या हातापायांपेक्षाहि जवळचीं अशीं आहेत. कारण आंत तीं स्पष्ट दिसत असतात. अंतःकरणांत एक ध्वनि ऐकूं येत असतो. एक हांक ऐकूं येत असते. तुम्ही म्हणाल तुमचा तो अंतध्वनि भ्रम कशावरून नाहीं? महात्मा गांधी म्हणतील, हा माझा जड देह खरा कीं खोटा ही एक वेळ शंका येईल माझ्या अस्तित्वाचीच एखादें वेळीं शंका घेतां येईल. परंतु त्या आदर्श सृष्टीची शंका कदापि येणार नाहीं. तें ध्येय आहे. तो आदर्श आहे. तो आदर्श अंतःकरणांत आहे. त्याचा मंजुळ ध्वनि ऐकूं येतो. तो आपणांस सन्मार्गाकडे नेतो. कोणीं कोणाचें ऐकावें हा सवालच नाहीं. स्वतःच्या त्या ध्येयावर अचल श्रध्दा ठेवून जावें. त्या ध्येयाच्या ध्यासानें जें आपण जीवन जगतों तेंच जीवन खरोखर आपण जगलों. बाकीचें जीवन कधींच पुरें होत नाहीं. अखंड उत्तरायण, उंच जाणें, पुढें जाणे. उपनिषदें म्हणतात, ''जो म्हणेल मला मिळेंल, त्याला मिळालें नाहीं. जो म्हणेल मला समजलें, त्याला समजलें नाहीं.'' कितीही ध्येयाच्या रोखानें प्रगति झाली तरी अत्यल्पच वाटते. हीच मौज आहे. जितकी पूर्णतेकडे प्रगति अधिक, तितकी स्वतःच्या अपूर्णतेचीहि जाणीव अधिक होत असते. आणि मनुष्याला सिध्दींत जेवढा आनन्द नाहीं तेवढा प्रयत्नांत  असतो. मी पूर्ण झालों असें वाटून जें समाधान होईल, त्यापेक्षां मी अपूर्ण आहें, मला अधिक प्रयत्न केले पाहिजेत, असें जें असमाधान तें अधिक मोलाचें आहे. जॉन स्टुअर्ट मिल म्हणे ''संतुष्ट डुकरांपेक्षा असंतुष्ट सॉक्रेटिस असणें शतपट श्रेयस्कर होय. ''(It is better to be a Socrates dissatisfied than a pig satisfied.) मुक्कामावर पोंचणेंच नको. कारण तेथें पुढें काय हा प्रश्न उरणार नाहीं. प्रयत्नांतच मला रमूं दे. उत्तरोत्तर पुढें जाऊं दे. माझ्या प्रयत्नांना अन्त नाहीं. कारण माझें ध्येय अनन्त आहे. अनंत ध्येयासाठीं प्रयत्नहि अनंतच हवेत. हा जो ध्येयार्थ धडपडींतील परम आनंद, तो ज्याला माहीत नाहीं तो डुक्करच होय. तो मनुष्य बाह्यतः असमाधानी दिसेल, परंतु अंतरंगीं तो सुखावलेला असतो. मी पूर्णतेकडे जात आहें ही जिवंत निष्ठा त्याच्याजवळ असते. तो सदैव गतिमान् असतो. कधींहि तो सांचीव डबक्याप्रमाणें होत नाहीं, ठोकळेबाज होत नाहीं. महात्मा गांधींचे जीवन हें असें आहे. एक आदर्श डोळयासमोर ठेवून ते जात आहेत. त्यांत त्यांना परम धन्यता वाटते, आणि जगानें याच मार्गानें जावें म्हणून ते अट्टाहासानें, श्रध्देनें स्वतःच्या जीवनाची ज्योत पेटती ठेवून सांगत आहेत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel