ही कथा वैशंपायन ऋषींनी जनमेजयाला सांगितली. एकदा सर्व राक्षस गुरू शुक्राचार्यांकडे गेले. पृथ्वीचे व स्वर्गाचे राज्य जिंकण्यासाठी काय करावे, असे ते विचारू लागले. तेव्हा राक्षसांचे वास्तव्य पाताळात होते. गुरू शुक्राचार्यांनी सांगितले, की एक लक्ष यज्ञ केले असता देवेंद्राच्या राज्याची प्राप्ती होते. त्यानुसार राक्षसांनी ऋषींना बोलावून यज्ञ आरंभ करण्यास सांगितले. त्यासाठी लागणारे प्राणी, सामग्री आणून घेतली. यज्ञाला प्रारंभ झाला. ही वार्ता नारदाने देवेंद्राला सांगितली. आता आपले राज्य जाणार या भीतीने देवेंद्र सर्व देवांना घेऊन श्रीहरीकडे गेले व मदतीची याचना करू लागले. तेव्हा भगवंत म्हणाले, "देवहो, यज्ञांमुळे राक्षसांचा पुण्यसंग्रह वाढला आहे. तेव्हा युद्धात त्यांना हरवणे अवघड आहे. काही तरी युक्तीने मार्ग काढला पाहिजे.''
त्यानंतर भगवंताने नेहमीच्या वस्त्रांचा त्याग करून मोरपिसे अंगाभोवती लपेटली, पायात पुष्पपादुका घातल्या, हातात मोरपिसांचा कुंचा घेऊन भूमी अलगद झाडीत, जपून पावले टाकीत ते चालू लागले. सर्व देवांनाही त्यांनी तसेच करावयास सांगितले. हे सर्व जण पाताळात तरंगजेच्या काठी जेथे यज्ञमंडप घातला होता तेथे जाऊन पोचले. राक्षसांनी त्यांचे स्वागत करून बसायला दर्भासन दिले. पण दर्भासनावर न बसता श्रीहरीने भूमी हलकेच मोरपिसांच्या कुंच्याने साफ केली व ते अलगद बसले. राक्षसांनी याचे कारण विचारताच भगवंत म्हणाले, "अहिंसा सर्वश्रेष्ठ आहे. भूमीवर अनेक सूक्ष्म जीव असतात. त्यांना इजा होऊ नये म्हणून आम्ही पुष्पपादुका घातल्या. अवकाशात अदृष्य असे जीव असतात. आपल्या शरीरस्पर्शाने त्यांना काही होऊ नये म्हणून आम्ही मोरपिसांचे वस्त्र परिधान केले. हिंसेच्या नुसत्या उच्चारानेही नरकप्राप्ती होते. तुम्ही तर यज्ञासाठी प्रत्यक्ष हिंसा करीत आहात. तेव्हा हे थांबले पाहिजे. '' यावर राक्षसांनी आपणास गुरू शुक्राचार्यांनी एक लक्ष यज्ञ केल्यावर स्वर्गाचे राज्य मिळेल असे सांगितल्याचे सांगितले. हे ऐकून भगवंत म्हणाले, "तुम्ही शुक्राचार्यांवर भलताच विश्‍वास ठेवून तुमचा कुळधर्म, कुळाचार सोडता आहात. तुम्ही महापराक्रमी राक्षस आहात. युद्ध करून राज्य जिंकणे हे तुम्हाला अवघड नाही.'' हे बोलणे राक्षसांना पटले व त्यांनी यज्ञ थांबविला.

अशा प्रकारे फक्त युक्तीचे बोलून, बुद्धिसामर्थ्याने भगवंतांनी देवांवरचे संकट निवारण केले. म्हणून या अवतारास बौद्धावतार असे म्हणतात.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel