जीवनाच्या संध्याकाळी यशोदा पुत्रवती झाली. कृष्णजन्म झाला. यशोदेच्या आणि नंदाच्या आनंदाला सीमा राहिल्या नाहीत. सारे गोकुळच आनंदात निमग्न झाले. यशोदेला तर कृष्ण जीव की प्राण वाटू लागला. क्षणभरही ती त्याला दृष्‍टिआड होऊ देईना. तिच्या वात्सल्याच्या वर्षावाने कृष्णही गुदमरुन जात होता. वात्सल्यरसात न्हाऊन निघत होता.
कृष्ण गोकुळात वाढतो आहे, याचा सुगावा कंसाला लागला. त्याचा नाश करण्यासाठी कंसाचे प्रय‍त्‍न सुरु झाले; आणि अगदी महिन्याच्या आतच कृष्णावर संकटांची परंपरा कोसळू लागली. संकटे कसली, यशोदेच्या वात्सल्यप्रेमाची ती परीक्षाच होती. कसोटी होती. त्या संकटातूनच कृष्णावरचे तिचे प्रेम वाढत होते. घनीभूत होत होते. कृष्ण तिचा बहिश्‍चर प्राण बनला होता. रात्रंदिवस तिला कृष्णाशिवाय काही सुचत नव्हते.
कंसाने पूतनेला कृष्णाकडे पाठविले. सांगितले, ’वात्सल्याचा आव आणायचा. त्याला स्तनपानाला जवळ घ्यायचं. आणि विषलिप्‍त स्तनपानाने त्याचा नाश करायचा.’ पूतनेने गोपसुंदरीचा वेष घेतला. ती लावण्यवती नंदाघरी आली. यशोदेकडून कृष्णाला घेतले. त्याला स्तनपान करु लागली. कृष्णाला कल्पना आली. तो विषमिश्रित दुधाबरोबर तिचे पंचप्राणच ओढून घेऊ लागला. तिने प्रयत्‍न केला पण कृष्ण स्तन सोडीना. ती घाबरी झाली, अन् कृष्णाला घेऊनच मथुरेच्या दिशेला पळत सुटली. ते पाहून यशोदा घाबरी झाली. तिला काही सुचेना. रडू लागली. भोवताली असणार्‍या गोपस्‍त्रिया पूतनेपाठोपाठ पळू लागल्या. पूतना जीवाच्या आकांताने पळत होती. कृष्ण तिचे प्राण ओढून घेतच होता. अखेर ती धाडकन पडली. मरताना तिचा आक्राळविक्राळ देह जमिनीवर पडला. कृष्ण तिच्या अंगावर होता. गोपस्‍त्रिया घाबरल्या. तशाच पुढे गेल्या. कृष्णाला कडेवर घेतले आणि तशाच धावत यशोदेकडे आल्या. तोपर्यंत यशोदेच्या जीवात जीव नव्हता. जणू तिचे प्राणच पूतनेच्या पाठोपाठ जात होते. तिच्या डोळ्यांतले अश्रू अखंड वाहत होते. गोपींनी जेव्हा त्याला यशोदेच्या हाती दिले तेव्हा तिने कृष्णाला अश्रूंनी भिजवून काढले. छातीशी घट्ट धरुन ठेवले. प्रेमभराने त्याची लाखलाख चुंबने घेतली. त्याला दृष्‍ट लागली असेल म्हणून त्याची दृष्‍ट काढली. त्याला गोठयात नेले. एका शुभलक्षणी गायीच्या शेपटाचा गोंडा त्याच्या सर्वांगावर फिरवून त्याचे मंगल व्हावे, अरिष्‍ट टळावे म्हणून देवाजवळ प्रार्थना केली. तेव्हा कुठे तिचे मन थोडेसे स्वस्थ झाले. शांत झाले.
कृष्ण दिसामासांनी मोठा होत होता आणि यशोदेचा आनंदही क्षणाक्षणाने वाढत होता. कृष्णाला पाहून तिला आनंदाचे भरते येई. त्याच आनंदात दिवस कधी निघून जाई हे कळतही नसे. कधी मांडीवर घेऊन त्याच्या मुखाकडे टक लावून पाहावे. एखादी गोपी आली की, तिला म्हणावं, बघ ना किती गोड दिसतोय हा !’ कधी त्याला खांद्यावर घेऊन गाणं म्हणत हिंडवावं. कधी पाळण्यात घालून झोका द्यावा अन् त्याने हसत हसत हात उंचावले की, पटकन छातीशी घेऊन त्याचे चुंबन घ्यावे. सारा दिवस नि रात्र तिला कृष्णाचाच ध्यास लागलेला असे.
असाच एक दिवस. अंगणात एक मोठी गाडी उभी केलेली होती. त्याच्या खाली पाळणा बांधलेला होता. यशोदेने त्याला पाळण्यात झोपवले आणि ती घरात कामाला निघून गेली. त्याच वेळी कंसाकडून उत्कच नावाचा दैत्य आला. त्याने कृष्णाला पाहिले. तो गाढ झोपला होता. त्या दैत्याने त्या गाडीत प्रवेश केला. विचार केला, ’ही गाडी पाळण्यावर ढकलून द्यावी. त्याखाली कृष्ण आपोआप चिरडला जाईल आणि आपलं काम, कोणाच्याही लक्षात न येता पुरं होईल.’ तो संधीची वाट पाहत होता.
कृष्णाला त्याच्या काव्याची कल्पना आली. त्या दैत्याने पाळण्यावर गाडी ढकलण्याआधीच, कृष्णाने पाळण्यातून पाय बाहेर काढला आणि विरुद्ध दिशेने गाडी जोरात ढकलली. दाणकन ती खाली पडली. दैत्याचाच नाश झाला. गाडी पडल्याचा भयंकर आवाज यशोदेने ऐकला मात्र अन् ती कमालीची घाबरली. हातातले पात्र खाली पडले. ’त्या गाडीखाली कृष्ण जिवंत राहिला असेल का ?’ असा विचार येऊन ती जोरात किंचाळली. अंगणाकडे धावत सुटली आणि क्षणार्धात तो ताण असह्य होऊन खाली पडली. मूर्च्छित झाली. गोपी जमा झाल्या. त्यांनी तिच्या मुखावर पाणी शिंपडले. सावध होण्यासाठी उपचार केले. थोडया वेळाने ती सावध झाली. डोळे उघडले. एका गोपीच्या खांद्यावर कृष्णाला बघितलं आणि अंगात वीज भरल्यासारखी उभी राहिली. कृष्णाला बघितलं आणि अंगात वीज भरल्यासारखी उभी राहिली. कृष्णाला तिच्याकडून घेतले. छातीशी कवटाळले. दोन्ही डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. रडता रडता आपलाच धिक्कार करीत म्हणू म्हणाली, "हाय ! माझं हे पाडस लोण्याहूनही सुकोमल...त्याला मी गाडीखाली झोपवलं...ती गाडी उलट दिशेला पडून तिचे तुकडे तुकडे झाले. तीच माझ्या बाळाच्या अंगावर पडली असती तर ? एवढा विचारही माझ्या मनात आला नाही ? हे भयंकर दृश्य पाहून अजून माझे प्राण मला सोडून गेले नाहीत ? त्यांना सांभाळत अजून मी जिवंत आहे...खरंच माझं अंतःकरण वज्रापेक्षाही कठोर आहे. मी केवळ नावाची माता आहे. माझ्या मातृत्वाचा, वात्सल्याचा धिक्कार असो..."
तिचा विलाप ऐकून गोपींनी तिची कितीतरी वेळ समजूत घातली. बर्‍याच वेळाने यशोदेने कृष्णाला घेतले आणि हृदयाशी धरुन ती त्याला आत घेऊन गेली.यशोदा मनात विचार करीत असे, ’माझा कृष्ण मोठा कधी होणार ? तो रांगायला केव्हा लागेल ? त्याला दात कधी येतील ? तो बोबडा बोलून माझ्या कानांना तृप्‍त केव्हा करेल ?’या विचारात ती देहभान विसरायची. देवालाही हीच प्रार्थना करायची. आणि थोडयाच दिवसांत यशोदेचे मनोरथ परिपूर्ण झाले. कृष्ण घरभर रांगायला लागला. अंगणात जायला लागला. आपलं अंग धुळीने माखून घेऊ लागला. त्याच्या पाठीमागे फिरण्यात यशोदा मेटाकुटीला येऊ लागली. ती त्याच्या भोवती भोवती फिरु लागली. जणू आत्माच परमात्म्याभोवती फिरतो आहे. लटक्या रागाने ती त्याला बोलू लागली. थोडयाच दिवसांत त्याला दुधाचे दात आले. लालचुटुक जिवणीत पांढरे शुभ्र दात शोभून दिसू लागले. जणू माणकांच्यामध्ये मोती बसवले आहेत. कृष्ण हळूहळू बोलूही लागला. त्याच्या बोबडया बोलांनी यशोदा अमृतात न्हाली. सारे घरदार बोबडे झाले.कृष्ण अंगणात रांगत होता. यशोदा त्याच्यावर लक्ष देत होती. एवढयात वार्‍याची झुळुक आली. वार्‍याचा वेग वाढला. धूळ उडू लागली. कृष्णाला घेण्यासाठी ती पुढे आली तोच कृष्ण आकाशात उंच उडाला. ती पाहतच राहिली. क्षणभरात गडगडाटी हास्याचा आवाज आला. तो तृणावर्त राक्षस होता. ते विकट हास्य ऐकून यशोदेने किंकाळी फोडली. ’कृष्णा‍ऽऽ...’ म्हणून जोराने हाक मारली आणि ती धाडकन खाली कोसळली. आता यशोदा जिवंत राहणेच कठीण होते. गोपींनी सावध करण्याचा खूप प्रयत्‍न केला. नंदालाही बोलावून आणले. तिची हालचाल थांबली होती. श्‍वास अगदीच मंद झाला होता. सगळ्यांच्या पुढेच ’काय करावं ?’ हा प्रश्‍न पडला होता. उपचार चालू होते. इतक्यात दूर अंतरावर काही तरी मोठी वस्तू पडल्याचा आवाज झाला. काहींनी जाऊन पाहिले. तो राक्षसाचा छिन्नविछिन्न देह होता; आणि त्यावर कृष्ण शांतपणे बसला होता. गोपींनी त्याला उचलले. यशोदेपाशी आणले. तिला हलवत एक गोपी म्हणाली, "यशोदे ऽऽ यशोदे...अगं, पहातरी कोण आलंय. अगं, डोळे उघड ना...कृष्ण आलाय. खरंच, हा बघ कृष्ण...घे त्याला...."
ते शब्द तिच्या कानांवर पडले. कृष्णाचे नाव तिच्या कानांवर पडताच कुणीतरी संजीवन मंत्र म्हणावा तशी ती जागी झाली. वर्षाऋतूचं पाणी पिऊन इंद्रगोप ज्याप्रमाणे सजीव होतात तशी ती सावध झाली. कृष्णाला समोर पाहताच झटकन उठून बसली. गोपींनी कृष्णाला तिच्याजवळ दिले. मग कितीतरी वेळ ती त्याला छातीशी कवटाळून बसली होती. त्याला अश्रूंचा अभिषेक करीत होती. वात्सल्याचे ते परम मंगल दृश्य गोपीही भारावलेल्या अंतःकरणाने पाहत होत्या. कृष्णाला पाहून यशोदेचे वात्सल्य उचंबळून यायचे. जणू त्या दोघांत पैज लागायची ! यशोदेचे वात्साल्य पाहून, त्याची छाया सायीसारखी दाट व्हावी म्हणून कृष्णाचे लीलामाधुर्य शतपटीने प्रकाशित व्हायचे आणि ते लीलामाधुर्य पाहून यशोदेच्या भावसिंधूवर सहस्‍त्रावधी तरंग निर्माण व्हायचे. यामुळेच यशोदेचे वात्सल्य अनन्त, असीम आणि अपार बनले होते. त्या वात्सल्यात निमग्‍न असणारी यशोदा सारं सारं विसरुन गेली होती. स्वतःलाही विसरली होती. तिचे नेत्र केवळ कृष्णाला पाहत होते. तिचे मन केवळ कृष्णाचाच विचार करीत होते. तिचे हृदय केवळ कृष्णप्रेमच जतन करीत होते. ती कृष्णमय होऊन गेली होती. काळाचं अखंडत्व, कोणी सांगितले तर खंडित व्हायचे अन् दिवस-रात्र तिला कळायचं; नाहीतर अखंड काळ तिच्यासमोर कृष्णमय होऊनच वावरत होता.
एका सकाळी कृष्ण अंगणात गेला. खेळता खेळता त्याने मातीची बुचकुली भरली आणि तोंडात घातली. यशोदेने ते पाहिले. हातातले काम टाकून ती तशीच धावत बाहेर आली. तिने कृष्णाच्या पाठीत धपाटा घातला. त्याला रागावून म्हणाली, "माती खाल्लीस ? तोंड उघड पाहू."
कृष्णाने मुकाटयाने तोंड उघडले. ती त्याच्या तोंडात माती कुठे ते पाहू लागली. आणि पाहता पाहता पाहतच राहिली. तिचे नेत्र विस्फारले गेले. ती चित्रासारखी स्थिर झाली. चेहर्‍यावर आश्‍चर्य दाटले. कृष्णाच्या मुखात सारे विश्‍व तिला दिसले. ते अतर्क्य दृश्य पाहून ती भयचकित झाली. तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले. कितीतरी वेळ ती त्याच स्थितीत होती. थोडया वेळाने कृष्णाने तोंड मिटले. कृष्णाने आपल्या मायेचे पटल पुन्हा यशोदेवर पसरले. ती हे सारं विसरुन गेली. तिने कृष्णाला कडेवर घेतले आणि ती त्याला घरात घेऊन गेली. यशोदा कृष्णलीलेत रंगून गेली होती तरी काळ आपले कर्तव्य विसरला नव्हता. तो आपल्या गतीने पुढे सरकत होता. कृष्णाला आता चांगलेच पाय फुटले होते. तो शेजारीपाजारी जाऊ लागला होता. स्वभावाने खोडकर. गप्प बसणे माहीतच नाही. त्यामुळे गोपींच्या घरी जाऊन तो उचकाउचकी करु लागला. दह्यादुधाची भांडी सांडू लागला. फोडू लागला. लोणी खाऊन सगळं अंग बरबटून घेऊ लागला. आणि तक्रारी करुन गोपी यशोदेला भंडावून सोडू लागल्या. असा एकही दिवस जात नव्हता की, ज्या दिवशी कृष्णाची कोणतीही तक्रार आली नव्हती. कृष्णाच्या खोडया पाहून ती काही वेळा रागवायची. पण थोडयाच वेळात तो राग शांत व्हायचा अन् हृदयाकाशात वात्सल्याचा पूर्ण चंद्र आपल्या शीतल चंद्रिकेचा वर्षाव करायचा.
पण एक दिवस मात्र कृष्णाने कमालच केली. घरात दहयाचे एक भांडे पूर्वापार चालत आले होते. सहवासाने त्यासंबंधी यशोदेला प्रेम होते. कृष्ण खेळत खेळत आला. हातातली काठी त्याच्यावर मारली आणि एवढं मोठं सुंदर भांडं फोडून टाकलं. ते पाहून यशोदा रागावली. ’आता मात्र याला शिक्षा केलीच पाहिजे. अवखळपणा फारच वाढलाय.’
"रोज दह्याची भांडी फोडतोस. सगळ्याजणी तुझ्याबद्दल तक्रार करतात. थांब.तुला आता चांगली शिक्षा करते."
तिला समोर उखळ दिसले. कृष्णाला तिने उखळापाशी नेले. त्याला धाक वाटावा म्हणून तिने त्या उखळाला त्याला घट्ट बांधून ठेवले. मग ती घरात निघून गेली.
कृष्णाने पाहिले, यशोदा आत गेली आहे. तिचे लक्ष नाही. त्या उखळापासून बर्‍याच दूर अंतरावर दोन अर्जुनवृक्ष अगदी जवळ जवळ उभे होते. कृष्ण उखळासह पुधे चालू लागला. त्या वृक्षांपाशी आला. उखळ त्या दोन वृक्षांच्यामध्ये अडकले. त्या वृक्षांना कृष्णस्पर्श होताच जोराचा आवाज झाला. ते दोन्ही वृक्ष मुळासकट उन्मळून पडले. ते वृक्ष म्हणजे नलकबूर आणि मणिग्रीव नावाचे कुबेराचे पुत्र होते. कृष्णाचा सहवास मिळताच त्यांना त्यांचे मूळ रुप मिळाले आणि ते आकाशमार्गाने जाऊ लागले. आवाज होताक्षणीच यशोदा घाबरुन बाहेर आली. तिचा लाडका कान्हा उखळासह खूप दूर गेला होता. यमलार्जुन वृक्ष खाली कोसळले होते. कृष्ण आनंदात उभा होता. यशोदेने कृष्णाला सोडले. त्याला हाताला धरुन ती आत आणू लागली पण येता येता त्याचे रक्षण कसे करावे, कंसाच्या वक्रदृष्‍टीतून त्याला कसे वाचवावे हाच विचार तिला अस्वस्थ करीत होता. केवळ यशोदाच नव्हे, तर सारेच व्रजवासी कृष्णाच्या सुरक्षिततेची काळजी करु लागले. आजपर्यंत पूतना, शकरासुर, तृणावर्त यांपासून परमेश्‍वरानेच त्याला वाचवले, असे सगळे समजत होते. पण आता या गोकुळात राहणे सर्वांनाच धोक्याचे वाटू लागले. त्या सगळ्यांनी ठरवले, आता गोकुळात राहायचे नाही. वृंदावनात जायचे. त्याप्रमाणे सारे वृंदावनात आले. यशोदा-कृष्णही गोकुळातून वृंदावनात आले.
वृंदावनात आल्यानंतरही कृष्णाच्या लीला सुरुच होत्या. कधी गोपबालक यशोदेला कृष्णाचे पराक्रम सांगत असत, तर कधी यशोदा स्वतःच ते पाहत असे. त्यामुळे कधी ती आनंदात बुडून जाई तर कधी या मुलाचं रक्षण कसं करायचं, या विचाराने तिचे प्राण व्याकुळ होत असत. कासावीस होत असत. आता कृष्ण मोठा झाला होता. सवंगडयांच्या बरोबर यमुनातीरी खेळायला जाऊ लागला होता. खेळताना तन्मय होऊ लागला होता. एकदा दुपारी यमुनातीरी विटीदांडूचा खेळ मांडला होता. खेळ रंगत आला. एकाने विटी मारली ती यमुनेच्या डोहात पडली. ती आणण्यासाठी कृष्ण धावत सुटला. कृष्णाला कल्पना नव्हती, पण तो डोह कालिया नागाचा होता. त्याने फूत्कारुन फूत्कारुन त्या डोहाचे पाणी विषारी करुन टाकले होते. कोणीही त्या पाण्याचा उपयोग करु शकत नव्हते. गायींना ते पाणी पिता येत नव्हते. कृष्णाच्या सवंगडयांना हे माहीत होते. त्यामुळेच कृष्ण विटी काढायला निघाल्याबरोबर ते ओरडू लागले, "कृष्णा ! थांब-त्या डोहाकडे जाऊ नकोस. त्या डोहात कालिया नाग आहे. यमुनामाईचं पाणी विषारी झालं आहे. तू जाऊ नकोस तिकडे- आपण दुसरी विटी करु--"
कृष्णाच्या कानांवर ते शब्द पोहचलेच नाहीत. तो तीरासारखा धावत गेला. आणि बाकीचे नको-नको म्हणत असताना त्याने त्या डोहात उडी मारली. लाटा उसळल्या अन् शांत झाल्या. आता कृष्ण परत येत नाही असा विचार करुन काही गोपबालक घराकडे धावत गेले. त्यांनी ही वार्ता सांगताच सारे लोक, गोपी यमुनाकाठी जमा झाल्या. यशोदेला तर काहीच सुचेना. ती धावतपळतच यमुनातीरी आली. कालियाच्या डोहातून कृष्ण आता परत येणार नाही याची सर्वांची खात्री पटली. पुढे जायला कोणीच तयार नव्हते. जाणे शक्यही नव्हते. ते सारं पाहून यशोदा रडू लागली. तिची समजूत तरी कोण घालणार अन् कशी ? कृष्ण सर्वांचा आवडता. सगळ्याच गोपी त्याच्यावर पुत्रवत प्रेम करायच्या. आणि आता कृष्णाच्या अनिष्‍ट कल्पनेनेच सार्‍यांना दुःख अनावर झाले. सगळ्यांच्या डोळ्यांतून अश्रू झरत होते आणि सारे गोप, कृष्णाचे सवंगडी हतबुद्ध होऊन, यमुनेच्या त्या डोहाकडे पाहत होते. सगळे हवालदील झाले होते. काय करावे कोणालाच सुचत नव्हते. वेळाचे भान कोणालाच नव्हते. बर्‍याच वेळाने डोहातल्या लाटा पुन्हा हलल्या. आणि सूर्यबिंब क्षितिजावर हळूहळू वर यावे तसा कृष्ण कालियाच्या फण्यावर उभा राहून वर येऊ लागला. ते पाहताच गोपाळ ओरडले,"तो पहा, आला, कृष्ण आला-"
यशोदेने समोर पाहिले. कृष्ण आला होता. तिला सारंच अतर्क्य होतं. हसताना रडावं का रडताना हसावं हेच तिला कळेना. एवढयात कृष्णाने कालियाच्या फण्यावरुन तीरावर उडी मारली. पुन्हा धावत तो यशोदेकडे आला अन्‌ लडीवाळपणे म्हणाला, "आईऽऽ तू इथे कशाला आलीस ? अन् रडतेस कशाला ! विटी आणायला म्हणून मी डोहात उडी मारली. ही बघ विटी घेऊन वर आलो."
या त्याच्या बोलण्यावर, त्याला काय बोलावे हेच तिला कळेना. तिने त्याला घट्ट मिठी मारली. गोपींनीही सुटकेचे निःश्‍वास टाकले. सगळ्यांनी त्याला अश्रूंनी भिजवले. त्या आनंदात ते घरी कधी परतले हे त्यांचे त्यांनाही कळले नाही. कृष्णाच्या लीला दिवसेंदिवस वाढतच होत्या. यशोदा घरी असली तरी तिचं लक्ष सारखं श्रीकृष्णाकडे असायचे. डोळे त्याला पाहायला आतुर असत, कान त्याचे बोल ऐकायला उत्सुक असत अन् हात त्याला उचलून घ्यायला अधीर झालेले असत. कंसाच्याही कानांवर कृष्णाचे स्थलांतर गेले होते. तोही अनेक असुरांना पाठवीत होताच. वत्सासुर, बकासुर, केशी असे कितीतरी जण कृष्णाला मारण्यासाठी आले; पण कृष्णापुढे त्यांचे काही चालले नाही. कृष्णाच्या या पराक्रमाचे गोपालांनी वर्णन केले की, यशोदा मोहरुन येई आणि त्याच वेळी त्याच्या रक्षणाच्या काळजीने भयाकूल होत असे. अशा अनेक प्रसंगी यशोदेच्या अंतःकर्णात हर्षाच्या, दुःखाच्या ज्या लहरी उचंबळून येत त्यांत ती स्वतःतर बुडून जात असेच, पण व्रजवासींनाही त्यांत बुडवून टाकत असे.
असाच एक दिवस. संध्याकाळ होत होती. मथुरेच्या रस्त्याने एक रथ भरधाव वेगाने वृंदावनात येत होता. सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. रथ जवळ आला. अक्रूर त्यातून खाली उतरला. त्याने नंदाची गाठ घेतली. अक्रूर त्यांचा आप्‍तेष्‍टच होता. दोघांनीही एकमेकांना क्षेमकुशल विचारले. रात्रीची भोजने झाली. थोडी शांतता झाल्यावर नंदयशोदाने अक्रूराला विचारले, "आज वृंदावनात पायधूळ कशी झडली ?"
"कंस महाराजांचा निरोप घेऊन आलोय."
कंसाचे नाव निघताच नंदाच्या कपाळाला आठी पडली. यशोदा तर संतापलीच. रागानेच तिने विचारले,"तो दुष्‍ट आता आणखी काय म्हणतोय ?"
"तसं काही विशेष नाही, त्याने मोठा यज्ञ करायचे ठरविले आहे. तो यज्ञाचा सोहळा बळराम, कृष्णानी पाहावा अशी त्यांची इच्छा आहे. यज्ञ संपला की मी परत घेऊन येईन त्यांना."
"कृष्णाला मथुरेला पाठवायचं ?" यशोदा.
"हो---काही दिवस---"
अक्रुराचा निरोप ऐकताच आपल्या हृदयावर कोणीतरी वज्रपहार करतो आहे, असे तिला वाटले. ती अस्वस्थ झाली. ताडकन म्हणाली, "नाही. ते कदापि शक्य नाही. कृष्ण माझा जीव की प्राण आहे. त्याच्याशिवाय मी एक क्षणही जगू शकणार नाही."
तिचे उत्तर ऐकून अक्रूर आणि नंद क्षणभर गप्प राहिले. नंतर अक्रूराने तिला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्‍न केला, पण तिची समजूत पटेना. कृष्णाला एक क्षणभरही दृष्‍टीआड करायला ती तयार होईना. कंसाच्या सापळ्यात पाठवायला तिचे मन तयार होईना. अखेर कृष्णानेच आपल्या मायेचा प्रभाव यशोदावर पसरला. त्याला मथुरेला जायलाच हवे होते. त्याशिवाय कंसाचा समाचार घेता येणार नव्हता. मायेच्या प्रभावाने यशोदा संभ्रमात पडली. अजूनही ती अनुमती द्यायला तयार होत नव्हती. तिच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. अखेर नंदाने तिची खूप समजूत घालून तिला शांत केली. कृष्णाला आपल्या कुशीत घेऊन ती त्याला थोपटत होती. रात्रभर रडत होती. डोळ्याला डोळा लागला नव्हता. सकाळ झाली. जाण्याची वेळ झाली. यशोदेचे चित्त मुळीच ठिकाणावर नव्हते. तिला काही सुचत नव्हते. तिचे मन सैरभैर झाले होते. कृष्ण प्रवासाला निघाला होता, त्या वेळी योग्य ते मंगलचिंतनही ती करु शकली नाही. त्याच्याबरोबर प्रवासासाठी शिदोरी देण्याचेही ती विसरुन गेली. श्रीकृष्णाला हृदयाशी घेऊन ती सारखा विलाप करीत होती, अखेर बळंच कृष्णाला तिच्यापासून सोडवून रथावर बसवले. बलरामही आला आणि अक्रूराचा रथ मथुरेच्या मार्गावर दौडू लागला. कृष्णाला घेऊन रथ चालला होता. रथचक्रांच्या खुणा भूमीवर उमटत होत्या, जणू धरारुपी यशोदेचे छेदलेले हृदयच पृथ्वीदेवी व्यक्‍त करीत होती. कितीतरी वेळ ती जाणार्‍या रथाकडे पाहत होती. तिच्या शरीरातले चैतन्य नाहीसे झाले होते. जणू प्राणपक्षीच उडून गेला होता. गलितमात्र होऊन ती घरात आली होती. खरं म्हणजे गोपींनी तिला आणली होती. तिला कृष्णाशिवाय काही सुचेना. ती वारंवार रस्त्यावर जाऊ लागली. ज्या रस्त्याने कृष्ण गेला, त्या रस्त्याकडे हात करुन दुःखातिरेकाने म्हणू लागली, "अरे, अक्रूर कृष्णाला घेऊन चालला आहे. त्याला थांबवा. त्याच्याशिवाय मी जिवंत राहू शकणार नाही. थांबवा त्याला आणि माझ्या कृष्णाला कुणीतरी परत आणा रे !"
तिची ही अवस्था पाहून गोपींना, नंदाला वाईट वाटे. दुःख होई. कृष्णालाही आपल्या मातेच्या दुःखाची कल्पना होती. मथुरेला गेल्यावर दुसर्‍याच दिवशी कृष्णाने उद्धवाला बोलावले आणि त्याला आपल्या मातेचे सांत्वन करायला पाठवले. तो यशोदेकडे आला. त्याने अनेक प्रकारे तिची समजूत घातली. पण उपयोग झाला नाही. यशोदेचे अश्रू तो पुसू शकला नाहि. तोही दुःखी मनाने परत कृष्णाकडे गेला. उद्धव येताच कृष्णाने मातेबद्दल चौकशी केली. त्याने यशोदेच्या दुःखाचे वर्णन करताच कृष्णाचेही डोळे भरुन आले. त्याचाही कंठ दाटून आला. सद्‌गदित स्वरात तो म्हणाला, "उद्धवा ! पाहिलंस यशोदेचं माझ्यावर किती प्रेम आहे ते ! वात्सल्यभावाने माझी भक्‍ती कशी करावी याचा श्रेष्‍ठतम आदर्शच यशोदेने घालून दिला आहे. उद्धवा, अशी माता मिळायला खरंच भाग्य लागतं."
कृष्णाचा कंठ पुन्हा दाटून आला. डोळे पाझरु लागले. उद्धवाने यशोदेच्या कृष्णावरच्या प्रेमाचा नुकताच अनुभव घेतला होता. आता कृष्णाच्या मातृप्रेमाचा त्याला प्रत्यय येत होता. भक्‍तीच्या एका वेगळ्या पैलूचे दर्शन त्याला घडत होते. त्याच्याही अंतःकरणातल्या भक्‍तिवीणेच्या तारा छेडल्या जात होत्या. अन् यशोदेच्या त्या वत्सल मूर्तीपुढे त्याचे हात नकळतपणे जोडले जात होते, मस्तक नम्र झाले होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel