स्यमंतक मणी कृष्णाकडून मिळाल्यानंतर सत्राजिताला कृष्णाबद्दल पूज्यभावना निर्माण झाली. त्याने आपली सुंदर मुलगी सत्यभामा हिचे लग्न उद्धवाच्या मध्यस्थीने श्रीकृष्णाबरोबर लावून दिले. व स्यमंतक मणीही त्याला अर्पण केला; पण एकदा दिलेली वस्तू परत घेणे, हा धर्म नव्हे म्हणून कृष्णाने तो नाकारला. सत्राजिताने पूर्वी सत्यभामेचा विवाह कृतवर्मा नावाच्या मनुष्याला देण्याचे ठरविले होते; पण आता त्याने कृष्णाशी तिचे लग्न लावून दिल्यामुळे कृतवर्मा सत्राजिताचा नाश करण्याची संधी शोधू लागला. त्यासाठी तो अक्रुराकडे गेला. त्या दोघांनी शतधन्वा नावाच्या एका माणसाला आपल्या कटात सामील करून घेतले. तो अत्यंत शूर होता. त्याने सत्राजिताला तो झोपेत असता ठार मारले, तो मणी घेतला व अक्रुराजवळ दिला. मणी मिळताच अक्रूर व कृतवर्मा काशीला निघून गेले. सत्राजिताच्या मृत्यूमुळे दुःखी झालेली सत्यभामा शोक करू लागली. त्या वेळी श्रीकृष्ण पांडव लाक्षागृहात जळाल्याचे वृत्त आल्यामुळे हस्तिनापुराला गेला होता. तो परत आल्यावर त्याने या गोष्टीचा छडा लावण्याचे ठरवले. ते ऐकल्यावर शतधन्वा भिऊन पळून द्वारकेच्या बाहेर गेला. ही बातमी कृष्णाला समजताच त्याने शतधन्वाचा पाठलाग करून त्याला ठार मारले; पण त्याला तो मणी मिळाला नाही. तो बलरामासह द्वारकेला परतू लागला. तेव्हा बलरामाने स्यमंतक मणी कसा दिसतो, ते पाहण्यासाठी मागितला; पण आपण शतधन्वाला निष्कारणच मारले, मणी त्याच्याजवळ नव्हताच, हे कृष्णाचे म्हणणे बलरामाला पटले नाही. त्याला कृष्णाचा राग येऊन तो मिथिलेस निघून गेला.
द्वारकेला पोचल्यावर मणी मिळाला नाही, हे कृष्णाचे म्हणणे सत्यभामेलाही पटले नाही व ती कृष्णावर नाराज झाली. आता मण्याचा पुन्हा शोध घेतला पाहिजे, असे कृष्णाला वाटू लागले. इकडे बलराम हिंडतहिंडत काशीला पोचला, तेथे त्याला अक्रूर व कृतवर्मा यांच्या अफाट दानधर्माविषयी कळले. तो त्यांना भेटला असता, स्यमंतक मण्यामुळे ते दोघे हे सर्व करीत आहेत हे कळले. श्रीकृष्णाला त्याने हे कळवताच कृष्णाच्या निरोपावरून बलराम, अक्रूर व कृतवर्मा हे द्वारकेस परत आले. तेथे अक्रुराने स्यमंतक मण्याची हकिगत सांगितली व तो मणी कृष्णापुढे ठेवला. बलराम व सत्यभामा दोघेही आपण श्रीकृष्णावर उगाचच आळ घेतला, असे वाटून ओशाळले व त्यांनी कृष्णाची क्षमा मागितली. मग कृष्णाने तो मणी अक्रुराला दिला व त्यापासून मिळणार्‍या सुवर्णाचा योग्य तो विनियोग कर, असे सांगितले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel