हिमालयाच्या उत्तरेस कर्कटी नावाची एक राक्षसी राहत होती. ती उंच, धिप्पाड व उग्र अशी होती. तिचे शरीर प्रचंड मोठे असल्यामुळे तिची भूक मोठी होती व पुरेसा आहार मिळण्याची तिला पंचाईत पडत असे. तिला वाटे, पृथ्वीवरील सर्व मनुष्यांना खाऊन टाकावे; पण हे कसे व्हावे? तपश्‍चर्येने कोणतीही कठीण गोष्ट साध्य होते, या विचाराने तिने पर्वत शिखरावर जाऊन तप केले. मग ब्रह्मदेव प्रसन्न झाले. तिने वर मागितला, की मला सुईसारखे सूक्ष्म रूप दे, जेणेकरून कोणालाही न दिसता मी सर्व प्राण्यांच्या शरीरात प्रवेश करीन व अशा रीतीने माझी क्षुधा शांत होईल.
खरे तर तपस्वी तप करतात ते शुद्ध बुद्धीने; पण या राक्षसीचे तप सर्व लोकांच्या हिंसेविषयीच्या दुर्बुद्धीने केले होते. शास्त्रनिषिद्ध अन्नसेवन खाणारे, दुष्कर्मे करणारे आणि स्वभावतः दुष्ट असे जे लोक असतील त्यांचीच तू हिंसा करू शकशील, असा वर तिला मिळाला. मग कर्कटीने आपला आकार हळूहळू लहान करीत सुईएवढा केला व प्राण्यांमध्ये शिरून ती त्यांना क्रूरपणाने ग्रासू लागली. एवढे तप करूनही तिची क्षुद्र बुद्धी नाहीशी झाली नाही. अशी अनेक वर्षे गेली. प्राण्यांच्या देहातून ती दशदिशांत हिंडत असे. यात तिची मानसिक तृप्ती झाली; पण शारीरिक तृप्ती झाली नाही. तिच्या सूक्ष्म शरीरामुळे तिच्या पोटात अन्नाचा एक घासही मावू शकत नसे. तिला पश्‍चात्ताप होऊन आपल्या पूर्वदेहाचे स्मरण होऊ लागले. पोट भरले असताना होणार्‍या आनंदाची आठवण मनात येऊन ती दुःखी झाली. आपल्या शरीराचा नाश करून घेण्याची दुर्बुद्धी झाल्याबद्दल तिला पश्‍चात्ताप झाला. आता माझा उद्धार कसा होणार, या विचाराने कर्कटीने पुन्हा एकदा उग्र तपाला सुरवात केली. तिच्यावर खूप संकटे आली; पण एकाग्रता व दृढनिश्‍चय यांच्या जोरावर तिने तप पूर्ण केले व आत्मज्ञानसंपन्न झाली.
कर्कटीचे हे उग्र तप सार्‍या जगाला जाळल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा नारदाने इंद्राला दिला. इंद्राने ब्रह्मदेवांची प्रार्थना केली. त्याप्रमाणे ब्रह्मदेवांनी तिला असा वर दिला, की तुझ्या या दिव्य तपाच्या योगाने तुझे मनोरथ पूर्ण होतील. तुला पूर्वीचा देह प्राप्त होईल व या भूतलावर काही काळ उत्तम प्रकारचे भोग भोगून तू मोक्ष मिळवशील. आता तू कोणालाही पीडा देणार नाहीस. देहयुक्त असूनही तू जीवनमुक्त अशी राहशील. मग कर्कटीला तिचे मूळचे शरीर मिळाले. अरण्यात फिरताना तिची गाठ किरातांचा राजा विक्रम याच्याशी पडली. तपामुळे मिळालेल्या आत्मज्ञानामुळे तिने राजा विक्रमाशी तत्त्वज्ञानविषयक प्रश्‍नोत्तरे केली. प्रभावित होऊन राजा विक्रमाने तिला राजवाड्यात नेले व सर्व प्रकारची सुखे तिला प्राप्त होतील, अशी आपल्या राणीला सांगून व्यवस्था केली. योग्य वेळी कर्कटीस मोक्ष मिळाला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel