हिरण्यकश्‍यपूचा नाश करण्यासाठी भगवंतांनी नृसिंहावतार धारण केला. ते कार्य पूर्ण झाल्यावर नृसिंह क्रुद्ध दृष्टीने सगळीकडे पाहू लागला. त्याच्या तेजामुळे सर्वत्र प्रखर उष्णता निर्माण झाली. तेव्हा प्रलयकाळ होईल असे वाटल्याने ब्रह्मदेवासह सर्व देव घाबरले व ते शंकराकडे गेले. नृसिंहाचे ते असह्य तेज लवकर नाहीसे करावे, अशी त्यांनी प्रार्थना केली. शंकर रूप बदलून नृसिंहाकडे गेले व आपले तेज आवरण्याचा त्यांनी उपदेश केला. पण नृसिंहाने तो न ऐकल्यामुळे महादेवांनी वीरभद्राचे स्मरण केले व युक्तीने आणि ते न जमल्यास भीती दाखवून नृसिंहाचे तेज हरण करावयास त्याला सांगितले. त्याप्रमाणे वीरभद्र नृसिंहाकडे गेला व तुझ्या तेजाने सर्व विश्‍व तप्त झाले असून तू हे आवरण्याची कृपा कर, असे विनवू लागला. विनवणीचा उपयोग झाला नाही, उलट नृसिंह जास्त गर्वाने म्हणू लागला, "माझा कोप शंकराचे कैलास जाळण्यासही समर्थ आहे. मी त्रिभुवनात थोर असून सर्व देवांना माझाच आधार आहे. उत्पत्ती, स्थिती व संहार या माझ्याच लीला आहेत." हे ऐकून वीरभद्राने शंकरांचे चिंतन केले. शंकरांच्या सांगण्यावरून वीरभद्र पुन्हा नृसिंहाकडे गेला व म्हणाला, "असा अहंकार बरा नव्हे. मागे ऋषियज्ञाच्या वेळी तू गर्व केल्यामुळे हयग्रीव अवतार होऊन तुला शिक्षा झाली. महादेवाचा नंदीही तुझा पराभव करू शकतो. महादेवाची योग्यता जाणून तू त्याची आज्ञा ऐकावीस हे बरे! तुझे युगायुगातील हे अवतार महादेवाच्या कृपेनेच होतात. तेव्हा त्याचे ऐकून तू तेज आवर." याचाही काही उपयोग न झाल्याने शंकर अत्यंत उग्र रूप धारण करून तेथे गेले. त्याचे ते भयंकर रूप पाहून मात्र नृसिंहाचा अभिमान पार नाहीसा झाला. तो शंकरांना शरण गेला. सर्व देवांनी शंकर व विष्णू दोघांवर पुष्पवृष्टी केली. महादेव प्रसन्न चित्ताने सर्व देवांना म्हणाले,"देवहो, मी नृसिंहाची ही स्थिती केली, यातले गूढ समजून घ्या. मला व विष्णूला भिन्न मानण्याचे कारण नाही." त्यानंतर शंकरांनी नृसिंहरूप विष्णूची त्वचा काढून त्याने आपला देह झाकला. शिरकमळ तोडून ते मुंडमाळेत ओवून घेतले व ते कैलासास निघून गेले. तेव्हापासून शंकराला नृसिंहसंहारण असे नाव पडले आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel