फार प्राचीन काळची कथा. इतिहासाची पानेही बरीचशी कोरी होती-त्या काळची ! दण्डकारण्याला त्याचं नावही मिळालं नव्हतं-त्या कालची !! आर्यकुलं दक्षिणेत येऊ लागली होती. स्थानिक लोकांशी त्यांचा संघर्ष सुरु झाला होता. येथल्या लोकांना ते दस्यू म्हणू लागले होते; पण त्यांनी दस्यूंना पूर्णपणे जिंकले नव्हते, अशा संक्रमणकाळातली ही कथा !

विंध्यपर्वताचा पूर्व भाग. कृष्णावेण्णेला आणखी एक नदी मिळते. नाव ? मुस्सई ! त्या काळचं हे नाव. त्यांच्या संगमावर मदनपल्ली नावाचे एक दस्यूंचे वसतिस्थान होते. अतिशय निसर्गरम्य ! अवतीभवती दाट झाडी. लहान लहान टेकडयांनी वेढलेले. पावसाळ्यात चारही बाजूंनी खळाळणारे निर्झर. मोठेमोठे शिलाखंड ठिकठिकाणी पडलेले. भोवताली टेकडयांमुळे अनेक खिंडी तयार झालेल्या. उंचवटया उंचवटयावर पर्णकुटिका बांधलेल्या. नदीतीरी उगवणारे धान्य, फळंमुळं खावीत. शिकार करावी. मांसावर ताव मारावा. हाच त्यांचा दिनक्रम. रात्रीच्या वेळी मद्य प्यायचं; आणि शिकोटीच्या उजेडात धुंद होऊन नाचायचं गायचं ! शिकारीसाठी, फळंमुळं गोळा करण्यासाठी दिवस उगवायचा आणि नाचगाण्यात दिवस मावळायचा. दिवसरात्रीच्या या पाठशिवणीच्या खेळाचं त्यांना भान नव्हतं. कालचक्र किती फिरलं हे त्यांना कळतही नव्हतं !तशा एकमार्गी असणार्‍या त्यांच्या जीवनात आर्यांची एक टोळी आल्याने वलये निर्माण झाली. नदीच्या पलीकडे त्यांनी आपले कुल वसवले. पर्णकुटिका सजल्या. त्यांची आक्रमक वृत्ती आणि धनुर्विद्या यांचं दस्यूंना भय वाटू लागलं. जीवनात संघर्ष आणि भीती यांनी एकदमच प्रवेश केला.
एके दिवशी सकाळीच आर्यकुळातल्या सभेत एका वीराने एका दस्युकन्येला आणून उभे केले. ती घाबरली होती. बावरली होती. श्यामल वर्णाची असूनही ती दिसायला सुंदर होती. अनेक आर्यवीरांचे लक्ष तिच्या अंगावर खिळले होते. ती मात्र खाली मान घालून उभी होती. थोडया वेळात कुलपती आले. त्या वीरानं सांगितलं,"महाराज, मी ही दस्युकन्या जिंकली आहे. हिचं देवतांना यजन करुन तिला माझ्या स्वाधीन करावं, अशी माझी विनंती आहे."
"भगदत्ता, तू हिला जिंकली म्हणतोस ? ठीक आहे. पण कुठे जिंकली ? कशी जिंकली ? सारं कळयाशिवाय निर्णय देता येणार नाही."
"महाराज, काल सायंकाळी मी नदीतीरावरील झाडावर बसलो होतो. श्‍वापदं पाणी प्यायला आल्यावर शिकार करायचा माझा विचार होता. एवढयात प्रवाहातून एक नाव आपल्याच बाजूला येताना दिसली. त्यात ही रुपसुंदरी आणि एक दस्युतरुण होता. मला ही आवडली. मी बाणानं त्याच्या नौकेला भोक पाडलं. आणखी एका बाणानं त्याला खाली पाडलं. तोअ पात्रात पडल्यावर जीव वाचवण्यासाठी नौकेला धरायला गेला; पण नाव उलटली. ही कन्या धारेला लागली आणि वाहत नदीतीराला लागली. मी तिला ओढून आपल्या कुलात आणली."
"ठीक आहे. तिला आमच्याकडे दे. भार्गवा, देवव्रता...!"
"आज्ञा व्हावी गुरुदेव !"
"हिला स्नान वगैरे घालून शुद्ध करा आणि सायंकाळी होमाच्या वेळी यज्ञस्थळी उपस्थित करा. त्यावेळी समंत्रक देवतांना हिचे यजन करु."
देवव्रत, भार्गव यांनी तिला ताब्यात घेतले. बरोबर आणखी सशस्‍त्र तरुण तिच्या संरक्षणार्थ होते. दस्यूंनी हल्ला केला तर प्रतिकार करता यावा यासाठी ही योजना होती. ते नदीच्या रस्त्याला लागले. देवव्रताला दस्यूंची भाषा येत होती. इतरांना मात्र संस्कृताशिवाय अन्य भाषांचा गंधही नव्हता. नदीच्या वाटेला लागताच त्याने तिला गोड भाषेत विचारले,"तुझं नाव काय ?"
तिच्या भाषेत आलेल्या त्या प्रश्‍नाने तिला आश्‍चर्य वाटले. शत्रूच्या ताब्यात असल्यानंतर असं कोणी विचारील अशी तिला कल्पनाही नव्हती. उत्तर न आल्याने त्याने पुन्हा विचारले,"भिऊ नकोस. सांग ना तुझं नाव."
तिने त्याच्याकडे स्निग्धतेने पाहत म्हटले, "नीलम."
तिला नदीवर आणलं. गोमयमृत्तिकादिकांनी तिला स्नान घालण्यात आले. ती कमालीची अस्वस्थ झाली. तिला काही करताही येत नव्हते. अखेर न राहवून तिने देवव्रताला विचारले,"तुम्ही माझं काय करणार आहात ?"
"तुला आता यज्ञस्थळी नेणार."
"कशाला ? आगीत टाकायला ?"
"तुला अग्नीभोवती फिरविणार. मंत्र म्हणणार. मग तू पवित्र झालीस की, भगदत्ताला देऊन टाकणार."
"मग तो माझं काय करणार ? लग्न करणार माझ्याशी ?"
"छे, वेडी का काय तू ? दस्युकन्येशी कोणी लग्न लावत नसतं.
"मग ?"
"तू त्याची जन्मभर सेवा करायची."
काही वेळ ती गप्प राहिली. तिला तिचं भवितव्य काय आहे हे लक्षात आले होते. सगळं मनाविरुद्ध ! पण ती काय करणार होती ? आल्या प्रसंगाला तोंड देण्यावाचून आता तरी तिच्या हातात काही नव्हते. दुपार अशी अस्वस्थतेत गेली. सायंकाळी तिला यज्ञस्थळी नेण्यासाठी देवव्रत आला. तेव्हा ती चटकन त्याच्या पायांवर पडली. पायाला मिठी मारुन करुणार्द्र स्वरात म्हणाली, "मला एक भीक घालाल का ?"
"कोणती ?"
"माझी ही विटंबना वाचवा हो ! इच्छेविरुद्ध कोणाची तरी दासी व्हायचं त्यापेक्षा मरण बरं. मला तुमच्या त्या यज्ञात टाका; पण अशी विटंबू नका."
ते शब्द ऐकून कोमल हृदयाच्या देवव्रताला वाईट वाटले. तिची दया आली. त्याचं अंतरमन म्हणू लागलं, ’काहीही कर पण हिला सोडव.’ त्याच्या डोळ्यांत पाणी तरारले. नीलमच्या नजरेतून ते सुटले नाही. तिचेही डोळे डबडबले. तो काहीच बोलला नाही. तो तिला यज्ञस्थळी घेऊन आला. सारे विधी आटोपून भगदत्त तिला नेऊ लागला. देवदत्त त्याच्या मागे गेला. म्हणाला,"थांब, भगदत्ता, थांब."
"काय रे ?"
"पूर्वी तुझ्या कार्याबद्दल तू मला वचन दिलं होतंस. मागशील ती दक्षिणा देईन म्हणून मला म्हणाला होतास. आठवतं ?"
"पण, त्याचं आता काय ?"
"मला दक्षिणा हवी आहे. देणार ? मी मागेन ती ?"
"हे काय विचारणं झालं ?"
"मग ही दस्युकन्या मला दक्षिणा म्हणून दे."
"काय ? हिला दासी म्हणून स्वीकारणार ? भ्रष्‍ट होणार ?"
देवव्रत काही बोलला नाही. नीलमला आपल्या ताब्यात घेतले. तिचा हात धरुन तिला नदीकिनारी आणले. आणि सांगितले, "नीलम, तू स्वतंत्र आहेस. जा. आपल्या गावी जा आणि सुखी हो.
नीलमच्या डोळ्यांत पाणी आले. तिच्यासाठी एवढा त्याग करणारे तिला आजपर्यंत कोणीच भेटले नव्हते. त्या मायेने, प्रेमाने ती चिंब भिजली होती. ती त्याला सोडून जायला तयार होईना. "तुम्हाला सोडून मी आता कुठेही जाणार नाही. तुम्ही माझे देव आहात." असे तिने मनापासून सांगितले. पण तिला जवळ ठेवणे कसे अशक्य आहे, तिला मुक्‍त करण्यासाठी लोकदृष्‍टया मी कसा हीन ठरलो आहे, हे त्याने समजावून सांगितले. मोठया कष्‍टाने आणि अपार प्रयत्‍नाने त्याने तिचे मन वळविले. तिने नदीत उडी टाकली. पोहत पैलतीर गाठले. ती तिच्या गावाच्या दिशेने जाऊ लागल्याचे देवव्रताने डोळ्याने पाहिले आणि जड अंतःकरणाने तो परत फिरला.
नीलमनेही पाहिले तो परत फिरला आहे. ती गावात गेलीच नाही. मनाशी काही एक विचार करुन तिने पुन्हा पाण्यात उडी मारली. मासळीसारखी पोहत ती परत आली. ते अरण्य तिच्या पूर्ण माहितीचे असल्याने ती देवव्रताच्या मागोमाग राहू लागली. त्याच्या छायेप्रमाणे--छे--प्रियेप्रमाणे !
नीलमला पळवून नेल्यावर दस्युसंघही संतापला होता. तिला सोडवून आणण्याचा ते प्रयत्‍न करीत होते. त्यातून नीलम त्या संघातही सुंदर तरुणी. दस्युसंघाच्या प्रमुखाच्या मुलाचे तिच्यावर प्रेम ! त्यामुळे तिला सोडवून आणण्यात तो सर्वांत पुढे होता. दिवसा युद्ध करणे शक्य नव्हते. कारण आर्यांच्या धनुर्विद्येला ते घाबरत असत. म्हणून त्यांनी रात्रीची वेळ निवडली. मध्यरात्र होत आली. अनेक दस्युवीर कमरेला कोयते बांधून नदीतीरी आले. नदी पार करुन आर्यांच्या तळावर गेले. पहार्‍यासाठी काही आर्य जागे होते. जवळ पंचाग्नी धडपडत होते. दस्यूंनी इतका अचानक आणि मोठा हल्ला केला की, त्यांना काही कळायच्या आताच ते कापले जात होते. काहींच्या अग्नीत आहुती पडत होत्या. या सगळयात प्रमुखाच्या मुलाचा आवेश विलक्षण होता. जणू संहारक रुद्रच त्याच्या अंगात शिरला होता. त्याने चार-पाच जणांना कापून काढले होते. दोघा-तिघांना फरफटत आणून अग्निकुंडात टाकले होते. त्याचा तो आवेश पाहून आर्यांची दातखीळ बसत होती. संपूर्ण आर्यसंघच त्यांच्या या हल्ल्यात संपत आला होता.
नीलम हे सारं पाहत होती. पुढे आणखी काय घडणार याची तिला कल्पना आली. देवव्रताचे कुटीर एका बाजूच्या झाडीत दडलेले होते. तिने लपत छपत पण पळतच देवव्रताचे कुटीर गाठले. तो आपल्या झोपडीबाहेर पहारा करीत होता. घाबर्‍या घाबर्‍या , पळत आणि अवेळी आलेल्या नीलमला पाहून त्याला आश्‍चर्याचा धक्काच बसला. तो म्हणाला, "तू ? अन् आत्ता अशा मध्यरात्री ?"
"हो. चला--चला आधी."
"अगं पण कुठे ? आणि एवढी घाबरलीस कशाने ?"
"तुम्ही आधी माझ्याबरोबर चला. नाहीतर तुमचं रक्षण होणार नाही. आमच्या लोकांनी तुमच्या यर्रांचा संहार केला आहे. चला आधी--"
त्याचा तिच्या सांगण्यावर विश्‍वासच बसेना. तो झाडावर चढला. पाहिलं, गोष्‍ट खरी होती. तो उतरला. नीलमला म्हणाला, "नीलम, तुझं खरं आहे, पण मी कसा येणार ?"
"का ? नाहीतर तुम्ही वाचणार नाही."
"मी एकटा नाही." त्याने आत संकेत केला. हातातली मशाल त्याने आतल्या बाजूला केली. आत एक सुंदर स्‍त्री गाढ झोपली होती. तिचे लावण्य पाहून नीलमही थक्क झाली. देवव्रत म्हणाला,"ही ठेव इथंच ठेवून मी कसा येऊ ?"
तिने क्षणभर विचार केला. म्हणाली, "आपण हिलाही घेऊन जाऊ. पण आता थोडा वेळ इथं राहणंही धोक्याचं आहे."
ती आत गेली. तिने त्या तरुणीला उचलले. देवव्रताला मागोमाग यायला सांगून ती झपाटयाने आडवाटेला लागली. मोहिनी घातल्याप्रमाणे देवव्रत तिच्या मागोमाग जात होता. त्या दिवशीच्या त्या भयंकर संहारात ही फक्‍त दोनच माणसे वाचली. नीलमच्या प्रसंगावधानामुळे की तिच्या देवव्रतावरच्या शुद्ध सात्त्विक प्रेमामुळे ?
देवव्रत आणि त्याच्याबरोबर असणारी ती तरुणी - ऋता तिचे नाव - दोघेही नीलमच्या घरी राहिले. तिच्या सांगण्यावरुन दोघांनाही जीवदान मिळाले होते. स्वातंत्र्यही देण्यात आले होते.
या घटनेला कितीतरी काळ उलटला. दस्युसंघातही बदल झाले. त्यांचा प्रमुख -पल्लीपती-मृत्यू पावला. अति बलवान म्हणून पल्लीपती झाला. सर्वाधिकार त्याच्याकडे आले. त्याही काळात त्याची नीलमवरची निष्‍ठा कायम होती. तिला खूष करण्याचा तो सारखा प्रयत्‍न करी. एकही संधी तो वाया घालवीत नसे. ती मात्र त्याला शक्यतो टाळत असे. त्याच्याशी विवाह करावा अशी कल्पनाही कधी तिच्या मनात येत नव्हती.
ऋताही त्या पर्णकुटीत राही. दस्यूंपासून तिचं रक्षण करणं हे देवव्रताला दिवसेंदिवस कठीण होत होते. नीलमला आर्यांनी पळवून नेल्याची आठवण पूर्णपणे विझली नव्हती. म्हणूनच ऋताचं रक्षण करणं अवघड होतं. ती कुणाशीही बोलत नसे. त्यांची भाषा शिकण्याचाही तिने प्रयत्‍न केला नाही. त्यांच्या स्‍त्रियांतदेखील ती मिसळेना. बोलली तर फक्‍त देवव्रताशी ! तो एकटाच आर्य तेथे होता. तिचेही त्याच्यावर प्रेम होते. त्याने आपल्याशी विवाह करावा असं तिला मनापासून वाटे. तिच्या कृतीतून तिचं शुद्ध प्रेम प्रत्ययाला येई. आणि नीलम-जिच्यासाठी एका संपूर्ण आर्यकुलाचा संहार झाला, जिच्या प्रेमाची याचना स्वतः पल्लीपती करीत होता, जिच्याशी बोलण्यासाठी तो अधीर होत असे, जिच्या लावण्याची या दस्युसंघात ख्याती होती-ती नीलम देवव्रताला एक क्षणभरही विसंबत नसे. एक वेळ छाया वस्तूपासून दूर जाईल, पण ती कधीच त्याला सोडून जात नसे. त्याच्या दर्शनाशिवाय तिला चैन पडत नसे. तिने मनाने त्याला सर्वस्व अर्पण केले होते.
या सगळ्या स्थितीमुळे देवव्रताची मनःस्थिती फारच कठीण झाली होती. काय करावे हे त्याला समजेना. नीलमचे काय करावे ? अनार्यपाणिग्रहण करावे ? का ऋतेशी विवाह करावा ? मग नीलमचे काय होईल ? तिचे उपकार... तिने दस्यूंपासून आपले रक्षण केले. एवढेच नाही तर ऋतेची अब्रूही अनेक प्रसंगी आपल्या पराक्रमाने वाचवली... ते उपकार कसे फेडणार ? कृतघ्न बनायच्म ? का स्‍त्रीहत्या ? आत्महत्या ? काय करावे ? त्याला काही सुचेना. रात्री झोप येईना. संध्यावंदनात लक्ष लागेना. अस्थिर मनाने स्नान करुन तो संध्या करु लागला की, वरुणाला तो विनवू लागला. त्याची करुणा भाकू लागला--"हे वरुणा, मला वाईट कृत्यांपासून वाचव. परावृत्त कर. माझ्या वंशाचं रक्षण होईल आणि व्रतभंगही होणार नाही असा काही तरी उपाय तू मला सुचव. तू तुझ्या भक्‍तांना कठीण अशा डोंगरातून मार्ग दाखवितोस ना ? मग मलाच या संकटातून पार पडण्यासाठी मार्ग का दाखवीत नाहीस ?"
पुनःपुन्हा प्रार्थना करुनही त्याच्या मनाला शांतता लाभत नव्हती. पर्णकुटीतही चैन पडत नव्हते. मग तो आपले धनुष्यबाण घेऊन एकटाच नदीकिनारी जाई. तेथे एक वेळूचे बेट होते. त्यात फिरत बसे. आपल्या भवितव्याबद्दल विचार करीत बसे. एके दिवशी सायंकाळी तो असाच त्या वेळूच्या वनात अस्वस्थ मनाने फिरत होता. हात धनुष्यबाणांशी चाळा करीत होते. त्या बाजूला सहसा कोणी येत नसे. आणि अचानक कोणाची तरी चाहूल लागली. श्‍वापद तर आलं नाही ना ? तो सावध झाला. त्या दिशेने हळूच जाऊ लागला. तो त्याला पल्लीपती आणि नीलम मोठयाने बोलताना दिसले. त्याची उत्सुकता शिगेला पोहचली. एका वृक्षाच्या आडोशाला उभे राहून तो त्यांचे बोलणे ऐकू लागला. पल्लीपती थोडया रागात, अधीरतेने म्हणत होता,"आता मी जास्त काळ तुझी वाट पाहणार नाही."
"आत्तापर्यंत तरी वाट पाहायला कुणी सांगितले होते ?"
"नीलम, आज फार बोलतेस."
"खरं तेच बोलते. तुला अवघड लागतं त्याला काय करु ? माझी मुळीच वाट पाहू नकोस. मी दुसर्‍याशी लग्न करणार आहे."
"नीलम, माझ्यावर प्रेम करुन आता...."
"कुणी केलं तुझ्यावर प्रेम ? तूच माझ्या मागेमागे करायचास !
मी मुळीच तुझ्यावर प्रेम केलं नाही. मी तुला केव्हाच सांगितलं होतं..."
"असा आहे तरी कोण तो ?"
"तुला काय करायचं आहे ? कुणीही असेल."
"तुला नाव सांगितलंच पाहिजे."
"ज्याला मी तुझ्या हातून वाचवलं तो --देवव्रत !"
"तो आपला शत्रू-- ! त्याच्याशी लग्न करणार ? त्याच्यात असं काय विशेष आहे ?"
"तुझ्यात नाही ते ! शुद्ध प्रेम ! मानवता ! शुद्ध आचार, आणि कितीतरी !"
"नीलम ! कोणाशी बोलते आहेस तू ? पल्लीपतीशी ! मी सर्वाधिकारी असताना माझा उपमर्द ? मी मनात आणलं असतं तर केव्हाच तुझ्याशी लग्न केलं असतं."
"माझ्या इच्छेशिवाय ?"
"होय. मी सर्वाधिकारी आहे इथला."
"हाच तुझ्यात आणि त्याच्यात फरक आहे."
पल्लीपती संतापला. रागाने लाल झाला. विवेक संपला आणि तो संतापाने म्हणाला, "नीलम, मला तू हवी आहेस. आत्ता !" तो तिच्याकडे झेपावला. तिचा दंड त्याने धरला. तोच मागनं एक बाण सूंऽऽसूं करीत आला. त्याच्या पाठीत घुसला आणि तो खाली पडला. ते पाहून नीलम घाबरली. भांबावली. गोंधळली. क्षणभर काय घडतंय हेच तिला कळेना. तोच देवव्रत पुढे झाला. त्याला पाहून ती आनंदली अन् लाजलीही ! पल्लीपतीने ते पाहिलं आणि तडफडत प्राण सोडला. ते पाहून दोघांनीही तेथून काढता पाय घेतला. पर्णकुटीत येईपर्यंत रात्र झाली होती.
पर्णकुटीत येताच ती अश्रुभरल्या नेत्रांनी त्याला म्हणाली, "मला वाचवण्याच्या नादात तुम्ही हे काय करुन बसलात ? पल्लीपतीला बाणानं मृत्यू आल्याचं कळल्यावर दस्युसंघ तुम्हाला जिवंत ठेवीला का ? जा, आधी कुठंतरी दूर जा."
"नीलम--तुला सोडून--?"
"माझं नशीब एवढं चांगलं कुठं आहे ?"
"तू तुझं गाव---तुझे लोक---नातेवाईक सोडून येशील ?"
"मला आहे कोण ? फक्‍त आई होती तीही गेली. आता तुमच्याशिवाय..."
"पण आम्ही आता वनवासी होणार. तुला निष्कारण कष्‍ट--"
"ऋताला नाही का होणार ?"
तो थोडा विचारात पडला. पण वेळ मर्यादित होता. नीलमने पुन्हा जाणीव करुन दिली -"आता वेळ घालवू नका. तुमच्या पाया पडते, पण आता निघू या. नाहीतर कठीण आहे."
आणि त्या रात्री या तिघांनीही ते मदनपल्लीचे स्थान सोडले. नीलमने ऋताच्या पायांना वनस्पतींची सोपटी बांधली होती. त्यामुळे रस्त्यातले दगड, काटेकुटे यापासून तिचे रक्षण होत होते. तरी आपण एवढया रात्री का निघालोत, आपल्याला कुठे जायचे आहे, हे तिला माहीत नव्हते. त्यांचे पाय झपाटयाने पुढे पडत होते. सुरुवातीला चांदण्यांनी त्यांना वाट दाखविली. थोडया वेळाने चंद्र उगवला. रस्ता बराच उजळला. बरंच चालून आल्यानंतर, ते एका जलाशयावर पाणी प्याले थोडा वेळ विश्रांती घेतली. सकाळ झाली. ते चालतच होते. वन लागत होते. अरण्य येत होते. डोंगर पार करावे लागत होते; पण त्यांना चालण्याशिवाय गत्यंतर नव्हते. मध्येच ऋतेला उचलून घ्यावे लागायचे. नीलमही देवव्रताला बिलगून चालायची. दोघींनाही काय वाटत होते, ते त्यांच्या मनालाच माहीत. त्या दिवशि संध्याकाळी ते विंध्यपर्वताच्या पायथ्याशी आले. नीलमने सुटकेचा निश्‍वास टाकला. "आता आपण त्यांच्या हातातून सुटलो. पण पुढची वाट मला माहीत नाही हं !’ नीलम म्हणाली. देवव्रताने आजूबाजूला पाहिले. काही दिवसांपूर्वी तो या भागात येऊन गेल्याचे आठवले. आतापर्यंत नीलमने मार्ग दाखविला. आता देवव्रतावर तो भार आला होता. रात्र त्यांनी तेथेच काढली. सकाळ होताच त्यांचे पाय पुन्हा मार्ग आक्रमू लागले. विंध्यगिरीच्या दुर्गम भागातून त्यांची वाट जात होती. एक फार मोठी खिंड त्यांनी चढली. ऋता दमून गेली. पूढे एक पाऊल टाकणेही तिला शक्‍य नव्हते. सूर्यही अस्ताला कलला होता. जवळच एक जलाशय दिसला. देवव्रतानं ठरवलं, ’आता इथेच थांबावे.’ ऋता जलाशयावर जाऊन पाणी पिऊन आली. देवव्रत वृक्षाखाली बसला होता. नीलम फळे गोळा करायला गेली होती. ऋता थकली होती. ती देवव्रताजवळ बसली. म्हणाली, "किती अवघड वाटा आहेत, नाही ?"
"जीवनाचा मार्ग असाच दुस्तर असतो." तो गंभीरपणे म्हणाला. "खरं आहे. पण काय रे, पल्लीपतीला कशासाठी मारलंस ?"
देवव्रत गप्पच राहिला. त्याच्या मुखाकडे पाहून ती त्याला प्रेमाने म्हणाली,"मी तुझ्या अंकावर डोकं ठेवून निजू का ?"
तो गप्पच होता. ती त्याच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली. तीच बोलत होती, "नीलम किती चांगली आहे, नाही. मला फार आवडते. आपल्यासाठी किती कष्‍ट घेते. मलाही किती जपते." तो बोलला नाही. तीच पुढे म्हणाली,"तिची माझ्यावरही किती माया आहे. मला म्हणाली, ’ऋते, तू किती गोड आहेस, नाही !"
तो बोलत नाही असे पाहून ती पुन्हा म्हणाली, "हे रे काय ? रागावलास माझ्यावर ? बोलत का नाहीस ?"
"तुझ्यावर कशाला रागावू ?" देवव्रत म्हणाला. त्याने तिच्या केसातून प्रेमाने हात फिरवले. फार बरं वाटलं तिला. एका गोड स्वप्‍नात तिचा डोळा लागला. तेवढयात नीलम आली. तिनं ऋताला देवव्रताच्या जवळ झोपलेली पाहिली आणि ती पळत आली आणि त्याच्या दुसर्‍या अंकावर बसली. आणलेली काही फळं त्याच्या मुखात घातली. तो तिच्या कानात कुजबुजला,"गोड आहेत. अगदी तुझ्यासारखी !"
"चल, जरा फिरून येऊ. इथंच जवळ."
एवढयात सूर्याचे तिरपे किरण ऋताच्या डोळ्यावर आले. ती जागी झाली. तिनं ते पाहिलं. त्याचे शब्द तिच्या कानावर आले, ’ऋता झोपली आहे ना.’ नीलमने त्याच्याकडे अशा काही प्रेमळ दृष्‍टीने पाहिले की, तो मंत्रमुग्ध झाला. त्याने ऋताकडे पाहिले. तिने डोळे मिटून घेतले होते. त्याने तिचे डोके चर्माच्या घडीवर खाली ठेवले. तो उठला. नीलम म्हणत होती, "ऋता किती सुंदर आहे, नाजूक आहे, नाही ? हिच्याजवळ राहावंसं वाटतं !" तो काही बोलला नाही. ऋताने हलकेच डोळे उघडले. एकमेकांच्या हातात हात गुंफून ते दूर चाललेले तिने पाहिले. सूर्य अस्ताला जात होता आणि ऋताच्या नेत्रांतून अश्रूंच्या सरीवर सरी ओघळत होत्या. सकाळ झाली. उगवत्या सूर्याचा रंग आज अधिक लालसर असल्याचे ऋताला जाणवले. त्याला प्रणाम करुन पुन्हा वाटचालीला प्रारंभ झाला. समोर एक मोठा कडा होता. तो पार करुन जायचा होता. देवव्रताला वाटलं, आज ऋताची खरी परीक्षा आहे.’ आज चालायला ही कशी टिकणार’ असं नीलमलाही जाणवलं होतं; पण ऋता मात्र रोजच्यापेक्षा उत्साही होती. एक वेगळ्याच प्रकारचा आनंद तिच्या मुखावरुन ओसंडून वाहत होता. कधी ती देवव्रताचा हात धरी, तर कधी नीलमचा. कधी दोघांचेही !कडा अवघड होता. खाली खोल दरी होती.
ती पाहून ऋता म्हणाली, "किती खोल दरी आहे, नाही ! अगदी डोळे फिरतात."
"जपून चाल हं---पाय घसरेल." नीलमने सांगितले. "तुम्ही दोघं असल्यावर पाय बरा घसरेल ! मला आधार द्या बाई ! अवघड वाटेनं जायचं असलं की आधार असलेला बरा. नाही का ?"
नीलम आणि देवव्रताने एकमेकांच्या हातात हात गुंफले. त्यावर रेलून दोघाच्या खांद्यावर हात ठेवून ऋता पुढची पावलं टाकीत होती. खाली खोल दरी होती. त्यात पाण्याचा प्रवाह खळाळत होता. रस्ता अती बिकट होता; पण जाणं भागच होतं. ऋता पुढे जात होती. नीलमच्या हाताला थोडा हिसका बसला. ऋता देवव्रताच्या वक्षस्थळावर पडली. त्याला म्हणाली, "स्वामी, नीलम आणि तुम्ही सुखी व्हावं. ऋतेचं जीवन याचसाठी होतं !"
दोघांनाही काय होतंय हे कळायच्या आत, दरीतून वाहणार्‍या प्रवाहात काही तरी पडल्याचा आवाज झाला. दोघं एकमेकांकडे आश्‍चर्याने अवाक् होऊन पाहत राहिले. पुढे त्यांचे काय झाले याची वार्ता इतिहासाने आपल्या हृदयाच्या आतल्या गाभ्यात लपवून ठेवली--कोणालाही न सांगण्यासाठी !!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel