वृकासूर हा शकुनी नावाच्या राक्षसाचा मुलगा. एकदा फिरत असता, त्याची नारदांशी गाठ पडली. त्याने नारदांना विचारले,"ब्रह्मा, विष्णू, महेश या देवांत लवकर प्रसन्न होऊन वर देईल असा देव कोणता?" त्यावर नारदांनी सांगितले,"शंकर हे भोळे असून, भक्तांना ते लगेच पावतात; पण त्याचबरोबर ते चटकन रागावतात. तुला काही वर हवा असेल, तर तू शंकरांची भक्ती कर." हे ऐकून वृकासुराने शंकरांना प्रसन्न करून घेण्याचे ठरवले. त्याने एक यज्ञ सुरू केला व हवन म्हणून तो आपला एकेक अवयव यज्ञात सोडू लागला. याप्रमाणे सहा दिवस गेले; पण शंकर प्रसन्न झाले नाहीत. शेवटी सातव्या दिवशी वृकासूर आपले मस्तक कापून यज्ञात आहुती देऊ लागला. ते पाहून शंकर प्रसन्न झाले व प्रगट झाले. त्यांनी हस्तस्पर्श करताच वृकसुराचे सर्व अवयव पुन्हा जागच्या जागी आले.
शंकर म्हणाले,"अरे, हे काय करतोस वृकासुरा? मी नुसत्या उदकाहुतीनेही तृप्त झालो असतो. बरे, आता तू एखादा चांगला वर माग." त्यावर वृकासुराने मागितले,"हे देवा, मी ज्याच्या मस्तकावर हात ठेवीन त्या मनुष्यप्राण्याला मरण येऊ दे." हे ऐकून शंकरांना खूप वाईट वाटले. एखादे चांगले मागणे मागायचे सोडून हे काय भलतेच? पण ते वचनबद्ध असल्याने त्यांनी वृकासुराला तसा वर दिला. त्याबरोबर वृकासुराच्या मनात पार्वतीचे हरण करावे असे आले व तो वराचा प्रयोग श्री शंकरांवरच करू लागला. त्यामुळे शंकर श्री विष्णूंना शरण गेले व त्या दुष्टापासून वाचवा म्हणू लागले.
विष्णूंनी एक बाल ब्रह्मचार्‍याचे रूप घेतले व ते वृकासुरापाशी आले. वृकासूर शंकरांना शोधीत होता. तेव्हा तो ब्रह्मचारी म्हणाला,"हे वृकासुरा, तू थकला असशील. मी तुला या कामी साह्य करतो; पण एक लक्षात घे, दक्षाच्या शापामुळे शंकर नेहमी भूतपिशाच्च यांच्या सान्निध्यात असतात. ते अपवित्र झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या वरातील ताकदही कमी झाली आहे. वाटल्यास तू स्वतःवरच प्रयोग करून पाहा." वृकासुराला हे पटले व त्याने स्वतःच्याच डोक्‍यावर हात ठेवला. त्याबरोबर शंकरांनी दिलेल्या वरानुसार तो दुष्ट वृकासूर पहाडाप्रमाणे कोसळून भुईसपाट झाला. श्री विष्णू सर्व देवांना म्हणाले,"त्याचा दुष्टपणा फारच वाढला होता. त्याला त्याचे शासन मिळाले."

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel