सर्वांचे आवडते
मुले त्यांच्याकडे ओढली जात. त्यांचा स्वभाव खेळकर व आनंदी होता. ते असत तेथे नेहमी गडबड असायची, गप्पा असायच्या. एका विद्यार्थ्याला चित्तरंजनांचे मित्र व्हावे असे फार वाटत होते. परंतु तो लाजाळू होता, संकोची होता. तो चित्तरंजनांकडे बघत दूर उभा असे. चित्तरंजनांचा हात हातात घ्यावा असे त्याला वाटे. परंतु धैर्य होत नसे. एके दिवशी चित्तरंजनाच्या ध्यानात ही गोष्ट आली.
''तुम्ही असे दुःखी का असता? दूर दूर एकटे का उभे राहता? तुम्हाला कोणी मित्र नाही?'' चित्तरंजनांनी विचारले.
''तुम्ही माझे मित्र व्हा. तुमच्याजवळ बोलावे असे किती दिवस वाटते आहे.''
''मग का बोललात नाहीत? वेडे. चला माझ्याबरोबर.'' असे म्हणून चित्तरंजनांनी त्या विद्यार्थ्याचा हात धरला व त्याला नेले. ते दोघे परम मित्र बनले.
विलायतेस प्रयाण
१८९० मध्ये ते पदवीधर झाले. सन्मानाने उत्तीर्ण व्हायला थोडे मार्क कमी पडले. चित्तरंजन जरा खट्टू झाले. परंतु पित्याने त्यांना इंग्लंडमध्ये पाठवायचे ठरविले. आय. सी. एस. होण्यासाठी ते निघाले. घरी गरिबी होती. औदार्यामुळे दारिद्रय जाईल. कटकट मिटेल. म्हणून कर्ज काढून त्यांनी मुलाला विलायतेस पाठविण्याचे ठरविले. चित्तरंजन सहा हजार मैलांवर जावयास निघाला.
दुःखी आई
चित्तरंजनांच्या आईस दुःख होत होते. मुलगा परमुलखात दूर जाणार याचे वाईट वाटत होते. चित्तरंजन आईचे सर्वात आवडते. चित्तरंजन जरी दूर गेला तरी त्यांना हुरहूर वाटे. आणि आता तर साता समुद्रापलीकडे हा लाडका पुत्र जाणार!
''आई रडू नको.'' चित्तरंजन म्हणाले.
''दर आठवडयास पत्र पाठवशील ना?'' तिने विचारले.
''होय. कधीही चुकणार नाही. तुझा आशीर्वाद मला तारील. तू काळजी नको करू.''
आणि चित्तरंजन आय. सी. एस. होण्यासाठी गेले.