वृंदावनाऐवजी भारतमातेची हाक
परंतु प्रभूची ओळख निराळीच योजना होती. त्या वेळेस १९१४ चे महायुध्द सुरू होते. लोकमान्य टिळक सुटले होते. त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. लोकमान्य येईपर्यंत जहाल पक्षाचे लोक काँग्रेसपासून दूर होते. त्यांना काँग्रेसमध्ये कोण घेणार? दारे बंद होती. परंतु लोकमान्यांनी दूरदृष्टीने थोडे पडते घेऊन, मिळते घेऊन, काँग्रेसमध्ये शिरकाव करून घेतला. आणि राष्ट्रीय पक्षाची ते पुन्हा नीट संघटना करू लागले. ठिकठिकाणची आजपर्यंत स्वस्थ असणारी माणसे त्यांना ते पुन्हा ओढू लागले. राजकारणात खेचू लागले. लोकमान्य व डॉ. ऍनी बेझंट यांनी स्वराज्याची चळवळ सर्वत्र सुरू केली. लोकमान्यांनी दौरे सुरू केले. परंतु ऍनी बेझंट बाईस अटक झाली. देशभर अटकेचा निषेध झाला. कलकत्त्यास १९१७ जुलैच्या १७ तारखेस प्रचंड सभा भरली. चित्तरंजनांचे तेजस्वी भाषण झाले. सरकारचा निषेध करण्यात आला.
महायुध्दच्या या काळात स्वातंत्र्यप्राप्तीचे प्रयत्न झाले. गदर चळवळ झाली. अनेक फाशी गेले आणि बंगालभर धरपकड सुरू झाली. त्यावेळच्या मॉडर्न रिव्ह्यूने लिहिले, 'बंगालमध्ये असे एकही घर नसेल, ज्यातील एखाद्या तरी तरुणास अटक झालेली नाही.' पत्नीचे पती, बहिणींचे भाऊ, मातांचे पुत्र तुरुंगात होते. त्यांची ना चौकशी ना काही. तरुण असणे हाच फक्त गुन्हा. ज्या ठिकाणी स्थानबध्द करून ठेवीत, त्या जागा वाईट असत. कधी तेथे सापही असत. जमीन उखळायची. अधिकारी येऊन म्हणायचे, 'येथे का कसरत करता? अद्याप मस्ती जिरली नाही?' कोणी आजारी पडत. कोणी क्षयी होत. या तरुणांची कोण बाजू घेणार? चित्तरंजन त्यांच्यासाठी उभे होते. १९१७ च्या ऑक्टोबर महिन्याच्या दुसर्या तारखेस कलकत्त्यास या अटकबंद तरुणांविषयी प्रचंड सभा झाली. चित्तरंजनांचे हृदयास घरे पाडणारे भाषण झाले आणि शेवटी ते म्हणाले,
'ज्या घरात कोणास अटक नाही असे एखादेच घर पूर्व बंगालमध्ये असेल. सुधारणा देणार, सुधारणा देणार असा एकीकडे डांगोरा पिटीत असता इकडे ही सर्रहा अटक करणे हा का शहाणपणा आहे? सरकारचे हे करणे अन्याय्य आहे, अयोग्य आहे.'
चित्तरंजन अशा रीतीने पुन्हा ओढले जाऊ लागले. आणि १९१७ साली तर कलकत्त्यासच काँग्रेस भरली. देशात पुन्हा उत्साह संचरत होता. लोकमान्य आले. चित्तरंजनांना त्यांनी संपूर्णपणे राजकारणात पडण्याचा प्रेमपूर्वक आग्रह केला. आणि १९१८ मध्ये मुंबईस काँग्रेसचे पाहुणे म्हणून उतरले. त्यांचे भाषण झाले. लोकमान्य म्हणाले, ''एक दिवस लवकरच असा येईल, की ज्या दिवशी चित्तरंजन संपूर्णपणे देशसेवेस वाहून घेतील.'
रौलेट बिल
बंगालभर विनाचौकशी शेकडो तरुण कोंडयावाडयांतून ठेवलेले होते. या तरणांवर आरोप तरी कोणते? कोणता पुरावा? सरकारने एक कमिटी नेमली. त्या कमिटीचे रौलेट साहेब अध्यक्ष होते. या कमिटीने सर्व चौकशी केली. क्रांतिकारकांची संघटना कशी आहे, त्यांचे प्रयत्न कसे चालतात ते सर्व मांडले आणि काही उपाय सुचविले. हे तरुण हिंदुस्थानसरकारच्या वटहुकुमांनी अटकेत होते. परंतु महायुध्द थांबले. आता या वटहुकूमांची काय जरूर? परंतु हे चळवळे तर दडपून ठेवता आले पाहिजेत. प्रांतिक सरकारांना अधिक सत्ता या बाबतीत द्यावी, पोलिसांना संशयावरून वाटेल त्याला करता यावी, अशा प्रकारचे उपाय या कमिटीने सुचविले. सरकार काही तरी असा कायदा करणार असे जाहीर झाले. रौलेट बिल हिंदुस्थान सरकास पास करणार असे नक्की झाले.