घरच्यांची तुरुंगात रवानगी
चित्तरंजनांनी कलकत्त्यात स्वागतावरील बहिष्काराचा, तसेच परदेशी मालावरील बहिष्काराचा प्रचार धुमधडाक्याने सुरू केला होता. परंतु प्रत्यक्ष कायदेभंगात त्यांनी सुरुवात केली. आणि ती आपल्या घरातून केली. स्वयंसेवकदले बहिष्कृत होती. परंतु काँग्रेसचा स्वयंसेवक म्हणून हातात झेंडा देऊन स्वतःचा एकुलता मुलगा चिररंजन याला त्यांनी बहिष्काराचा प्रचार करायला, 'स्वागतावर बहिष्कार घाला, परदेशी कापड जाळा' अशा घोषणा करायला पाठविले. चिररंजनास सहा महिन्यांची शिक्षा झाली. अनेक स्वयंसेवकांस सजा झाल्या. लाठीमारही झाले. चित्तरंजनांनी या सर्व तरुणांस उद्देशून पुढील पत्रक काढले,
'जे सहन करीत आहेत, ज्यांना सहन करावे लागले, सहन करण्यासाठी जे तयार आहेत, त्यांना मी अधिक काय सांगू? स्वातंत्र्यासाठी असे करावे लागते, सहन करावे लागते, असे सांगण्याची काय जरूरी? परंतु एका फारशी कवीने दिलेला संदेश मी तुम्हाला देतो/
'निराशेच्या वेळेस, कसोटीच्या प्रसंगी तुझी श्रध्दा, तुझे धैर्य टिकतील की खुटतील? का कसोटीच्या वेळेस अग्निदिव्यातून जाऊन तावून सुलाखून अधिकच उज्ज्वल, प्रबळ, उन्नत व तेजस्वी होऊन बाहेर पडशील?' कवीने विचारले.
'डोक्यावर आकाश कोसळले तरी मी हार जाणार नाही, हिंमत सोडणार नाही. श्रध्दा सोडणार नाही' तरुणाने उत्तर दिले.
'शाबास! तुझा मार्ग प्रकाशाचा व विजयाचा आहे. जा पुढे. तुझा भविष्यकाल उज्ज्वल आहे. जनता तुझी ॠणी राहील. तुझ्या मस्तकावर शाश्वत विजय राहील. हे तरुणा, तुझी निर्भयता, तुझी दृढता सर्वांत येवो. सारे सजीव होवोत. चैतन्यमय होवोत. जे निर्भय असतात तेच जीवन संग्रामात विजयी होतात. तेच आत्म्याचे स्वातंत्र्य मिळवितात. आणि आत्मस्वातंत्र्याहून दुसरे अधिक मोलवान असे काय आहे? आत्मस्वातंत्र्याहून अधिक किंमतीचे असे बक्षिस कोणते? हे प्रभो, प्रेम आणि प्रकाश यांनी भरलेल्या या जगाला, निर्भयतेची देणगी देण्याची कृपा कर.'
असा हा संदेश चित्तरंजनांनी दिला.
पुत्राच्या अटकेनंतर दुसर्या दिवशी वासंतीदेवी हातात झेंडा घेऊन निघाल्या. चित्तरंजनांची बहीण उर्मिलादेवी हीही निघाली. सुनीतीदेवीही निघाल्या. घोषणा करीत त्या चालल्या. त्यांनाही अटक झाली. चित्तरंजन आनंदले होते. घरी एका खुर्चीत ते शांतपणे बसले होते. इतक्यात बॅरिस्टर विजयकुमार तेथे आले. ते म्हणाले, ''मी गव्हर्नराच्या सेक्रेटरीस भेटलो. हिंदी स्त्रियांचा अपमान कराल तर ब्रिटिश साम्राज्याचा सत्यनाश होईल असे त्याला सांगितले. त्याने लगेच पोलिस कमिशनरला चिठ्ठी दिली आहे. वासंतीदेवी लवकरच मुक्त होऊन येतील.''
चित्तरंजन म्हणाले, ''विजय, हे कशाला केलेस? जाणूनबुजून वासंतीने तुरुंग पत्करला होता. हे पाऊल टाकले होते.''
''वासंती माझी बहीण. तिच्या डोक्यावर लाठी पडती तर? ते का मी सहन करू?''
''विजय, वासंती तुझी बहीण म्हणून तू हे सारे केलेस. दुसर्या एखाद्या स्त्रीवर सरकारी हात पडता तर तू एवढी खटपट केली असतीस का?''
विजयने खाली मान घातली.