वंगभंगाची चळवळ
चित्तरंजन वकिलीच्या धंद्यांत धडपडत होते. अद्याप ते पुढे आले नव्हते. कुटुंबाची प्रतिष्ठा केव्हा पुन्हा नीट स्थापिन असे त्यांना झाले होते. आणि ते वंगभंगाचे दिवस आले. व्हॉईसरॉय कर्झन याने बंगालचे दोन तुकडे केले. सारी बंगाली जनता खवळून उठली. परंतु सरकार लक्ष देईना. आणि १९०६ मध्ये कलकत्त्यास राष्ट्रीय सभा भरली. दादाभाई अध्यक्ष होते. सभेत जहाल पक्ष व नेमस्त पक्ष यांची खडाजंगी झाली. लोकमान्य टिळक, बिपिनचंद्र पाल वगैरे पुढारी सभेतून उठून गेले. त्यांच्याबरोबर चित्तरंजनही उठून गेले होते.
दडपशाही
राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशी, बहिष्कार यांची चळवळ सुरू झाली. सारा बंगाल गर्जत होता. बंगालच्या राष्ट्रीय भावनांच्या या पुरास नीट वळण लावण्यासाठी एक महापुरुष आला. बडोदे संस्थानातील शिक्षणाधिकार्या च्या जागेचा राजीनामा देऊन श्री. अरविंद घोष हे बंगालला निघून आले. एका राष्ट्रीय महाविद्यालयाचे ते प्रमुख झाले. त्यांनी 'वंदेमातरम्' पत्र सुरू केले. अत्यंत भावनामय व तेजस्वी विचार वंदेमातरम् देऊ लागले. काही तरुण दहशतवादाकडे वळले. सभांनी हे सरकार ऐकत नसेल तर बाँब फेकू या असे तरुण म्हणू लागले. आणि पहिला बाँब फेकला गेला. १९०८ च्या एप्रिल महिन्याची ३० तारीख होती. त्या दिवशी हा पहिला स्फोट झाला. आणि मेच्या पहिल्याच तारखेस तो सोळा वर्षांचा तेजस्वी तरुण खुदीराम बोस पकडला गेला. आणि मेच्या दुसर्या तारखेस अरविंद, त्यांचे बंधू वारींद्र, उल्हासकर दत्त इत्यादी अनेक देशभक्तांना अटक झाली. सर्वत्र धरपकड होत होती. मधून मधून बाँब उडत होते. पिस्तुले झाडली जात होती.
अरविंदांचा बचाव
कलकत्त्यातील काही लोकांनी या तरुणांच्या बचावासाठी काही फंड गोळा केला. काही वकिलांची नावे जाहीर झाली. हे वकील या तरुणांचा खटला चालविणार होते. या वकिलांच्या यादीत चित्तरंजनांचे नाव नव्हते. परंतु पुढे पैसे संपत आले आणि हे भाडोत्री वकील अळंटळं करू लागले. अरविंदासारख्यांना कोण वाचवणार? कोण पुढे येणार? कोण त्यांची बाजू मांडणार?