झोपडीत मलाही जागा ठेवा
पुण्याच्या ससून हॉस्पिटलात शस्त्रक्रिया होऊन महात्माजी खाटेवर पडून होते. देशबंधू त्यांना भेटायला आले होते. बोलता बोलता देशबंधू म्हणाले, ''महात्माजी, नको हा खटाटेप असे वाटते. गंगातटाकी झोपडी बांधावी व प्रभूचे स्मरण करीत राहावे असे सारखे मनात येते.''
''त्या झोपडीत माझ्यासाठीही थोडी जागा ठेवा.'' महात्माजी म्हणाले. दार्जिलिंगला ही वृत्ती पुन्हा बळावली. तरी देशातील कामाकडे डोळे होतेच. बंगालची खेडी पुन्हा पूर्वीप्रमाणे भरल्या गोकुळासारखी कशी होतील याची त्यांना हुरहूर लागली होती. ते योजना करीत होते. आणि त्यांना भेटायला महात्माजी आले. स्वर्गीय महादेवभाईही होतेच. तो लहानसा बंगला गजबजून गेला. महात्माजींची सारी नीट व्यवस्था राहावी म्हणून देशबंधूंची किती उत्कंठा! बकरीचे दूध हवे म्हणून पलीकडच्या तिबेट भागातून पाच बकर्या आणण्यात आल्या. केव्हा उजाडते व महात्माजी आपले प्रसन्न मुक्त हास्य घेऊन येतात असे देशबंधूंस होई. देशबंधू आपल्या खाटेवर महात्माजींना बसवीत तेथे लोड करीत. त्याला महात्माजी टेकत. आणि मग विनोद चाले.
''सूत काढायला आता पुन्हा सुरुवात केली आहे. चरखाही शिकेन.'' देशबंधू म्हणत.
''परंतु चरख्याची माळ कशी घालीवी, त्राक कशी बसवावी हे समजत असेल तर शपथ. सारे मी करून देईन तेव्हा.'' वासंतीदेवी हसून म्हणत.
''तुम्ही स्वतःचे महत्त्व वाढावे म्हणून देशबंधूंना परावलंबी करून ठेवले आहे.'' महात्माजी म्हणत.
''महात्माजी, खरोखरच यांना हे काही येत नाही. ट्रंकेचे कुलूप कसे काढावे, बॅग कशी उघडावी तेसुध्दा समजत नाही? विचारा मी खोटे बोलत असेन तर?''
''यावरून माझा आरोप अधिकच सिध्द होत आहे. तुमची पदोपदी जरूर वाटावी म्हणून देशबंधूंना तुम्ही असे अज्ञानात ठेवले.'' असे म्हणून महात्माजी हसत. सारी मंडळी हसू लागे. निर्मळ आनंदसागर तेथे उचंबळे.
''महात्माजी, चरख्याला आता मी सोडणार नाही. हा चरखा घरोघर गेला पाहिजे. चरख्याने पुन्हा खेडी सजीव होतील. मी सतीशबाबूंना बोलावून घेतो. आपण खादीची सर्व योजना आखू. बंगालभर खादी कशी फैलावेल ते ठरवू.''
''परंतु या बंगल्यात आता आणखी माणसे आली तर राहणार कोठे?'' महात्माजी म्हणाले.
''राहतील येथेच.'' देशबंधू म्हणाले.
आणि सतीशबाबू आले. खालच्या मजल्यावर खादीची चर्चा सुरू झाली. सतीशबाबूंना थंडी वाजत होती. देशबंधू एकदम उठले व जिना चढून वर गेले. तेथला गरम कोट घेऊन ते निघाले.
''मी नेऊ का?'' महादेवभाईंनी विचारले.
''मीच नेतो.'' देशबंधू म्हणाले.
आणि सतीशबाबूंना तो कोट त्यांनी दिला. रात्री स्वतः खाली निजून सतीशबाबूंना त्यांनी आपली खाट दिली. कारण सतीशबाबूंना पडसे झाले होते. जरा ताप आला होता. देशबंधू स्वतः आजारी, परंतु दुसर्या साठी त्यांना किती काळजी!