एक वर्षाची शिक्षा

डिसेंबर १९२१ ची १० वी तारीख होती अहमदाबाद येथे काँग्रेस भरणार होती. चित्तरंजन अध्यक्ष ठरले. राष्ट्राने महान मान त्यांना देऊ केला. चित्तरंजन आपले अध्यक्षीय भाषण लिहीत होते. ते तयार झाले. परंतु सरकार निराळयाच रीतीने त्यांचा सन्मान करण्याच्या तयारीत होते. २४ डिसेंबरला राजपुत्र कलकत्त्यास येणार होता. त्याच्या आधीच चित्तरंजनांस दूर करण्याची सरकारला जरुरी वाटली. आणि १० डिसेंबरला सायंकाळी ४.३० वाजता चित्तरंजन यांना कैद करण्यात आले. चित्तरंजनांनी जाताना संदेश दिला.

'हिंदी बंधुभगिनींनो, आजचा हा माझा शेवटचा संदेश आहे. विजय दिसत आहे. कष्ट व हाल थोडे अधिक सहन कराल तर विजयाच्या जवळ जाल. अशा वेदनांतूनच राष्ट्राचा जन्म होत असतो. या वेदना पूर्ण शांतीने, धैर्याने व निर्भयतेने सहन करा. तुम्ही जोपर्यंत खरोखर अहिंसक राहाल तोपर्यंत सरकारचा पक्ष सदैव खोटाच राहणार. महात्माजींनी दाखविलेल्या मार्गापासून तसूभरही पदच्युत व्हाल तर नोकरशाहीचा विजय होईल. स्वराज्य हे आपले ध्येय आहे. स्वराज्याचे हप्ते नकोत. तुकडे नकोत. सारे संपूर्ण स्वराज्य आम्हांला पाहिजे आहे. आपले ध्येय आपण प्राप्त करून घेणार की नाही हे भारती तुम्हीच नरनारींनो सांगू शकाल.

'नेमस्त बंधूंनो, तुम्ही ज्या मार्गाने जाऊ पाहात आहात त्या मार्गाने कधीही कोणाला स्वातंत्र्य नाही. सार्‍या जगाचा इतिहास पाहा. हा इतिहास तुम्हाला हेच सांगेल. नोकरशाहीच्या बाजूने उभे राहणार की देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्‍यांच्या बाजूने येणार? लहानसान गोष्टींत तडजोड होऊ शकते. परंतु जो प्रश्न आपल्याला व जो नोकरशाहीला अलग राखीत आहे, त्या प्रश्नाच्या बाबतीत तडजोड कशी होणार? तुम्ही हिंदुस्थानचे कैवारी नसाल तर तुम्ही नोकरशाहीच्या बाजूचे आहात.

'विद्यार्थ्यांनो, तुम्ही हिंदुस्थानची भावी आशा आहात. अंकगणित किंवा अक्षरज्ञान यात खरे शिक्षण नाही. आपली सर्वांची एकच माता, जी भारतमाता, तिची सेवा करण्यात खरे शिक्षण आहे. मातेचे काम करण्याची ही वेळ आहे. माता हाक मारीत आहे. तुमच्यापैकी कोण त्या हाकेला उत्तर देणार?'

असा संदेश देऊन चित्तरंजन तुरुंगात गेले. त्यांचा खटला चालून एक वर्षाची साधी सजा देण्यात आली.

तुरुंगात

चित्तरंजन तुरुंगात देशाशीच चिंता रात्रंदिवस करीत. काही ठिकाणी स्वयंसेवकास फटके मारण्यात आले. चित्तरंजनांच्या हृदयाची तगमग होई. परंतु राजपुत्र आले त्या दिवशी कलकत्त्यांत कडकडीत हरताळ होता. रस्त्यांतून शुकशुकाट होता. ती वार्ता ऐकून चित्तरंजनांस समाधान झाले.

तिने हे सहन कसे केले?

आणि बारिसाल येथे राजकीय परिषद होती. वासंतीदेवी तेथे अध्यक्ष होत्या. परंतु वंदेमातरम् गाणे म्हणायला तेथील मॅजिस्ट्रेटने बंदी केली. चित्तरंजनांच्या कानांवर ही गोष्ट आली. ते क्रोधाने थरथरत होते. 'वंदेमातरमला  बंदी? राष्ट्र गीताला बंदी? आणि वासंतीने हे सहन कसे केले? कसे केले तिने सहन?' असे म्हणत वाघाप्रमाणे, सिंहाप्रमाणे ते फेर्‍या घालीत होते. अति प्रक्षुब्ध ते झाले होते. आणि वासंतीदेवी भेटायला आल्या. ते गुरगुरले. परंतु वासंतीदेवी म्हणाल्या, ''ती बंदी मागून काढून घेण्यात आली होती. आम्ही तो अपमान सहन केला नसता. बंदी मोडून गाणे म्हटलेच असते. लाठीमार सहन केला असता. तुम्ही शांत व्हा.'' चित्तरंजनांच्या आत्म्याला समाधान झाले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel