दहा लक्ष रुपयांचा फंड

चित्तरंजन केवळ विधीमंडळातच रमले होते असे नाही. खेडेगावांची स्थिती कशी सुधारेल, शेती कशी सुधारेल, बेकारांना उद्योग कसा मिळेल याचा ते सारखा विचार करीत होते. चरख्याचे महत्त्व त्यांना पटले होते. ग्रामसुधारणा व ग्रामोद्योग याची त्यांना चिंता होती. या विधायक कामासाठी बंगालप्रांतापुरता दहा लाख रुपये गोळा करण्याचा त्यांनी संकल्प केला आणि त्या कामाला ते लागले. स्वयंसेवक हिंडतच होते. परंतु ते स्वतः क्षणाचीही विश्रांती घेत नव्हते. सकाळी बाहेर पडत ते दोन वाजता घरी येत. पुन्हा थोडे खाऊन बाहेर पडत ते रात्री घरी येत. व्यापारी, कारखानदार, दुकानदार सर्वांच्या समोर हा महापुरुष जाई व हात पसरी.

त्यागाची परमावधी

त्यांनी आपला वकिली कधीच सोडली होती. एकदा एका महत्त्वाच्या खटल्यात काही लोक चित्तरंजनांकडे आले व म्हणाले, ''दहा लाख रुपये आम्ही तुमच्या फंडाला देतो. परंतु आमचे वकील व्हा.'' चित्तरंजनांनी नको म्हटले. जे सोडले ते सोडले. परंतु अद्याप त्यांचे मोठे घर होते. एके दिवशी ते घरही त्यांनी देशासाठी दिले. ते फकीर झाले. त्यागाच्या जणू लाटा त्यांच्या हृदयात उसळत होत्या. बंगाली जनता हा निस्सीम त्याग पाहून गहिवरली. चित्तरंजन यांना कोणत्या विशेषणाने गौरवावे ते वर्तमानपत्रकारांना समजेना. शेवटी एका वर्तमानपत्राने 'देशबंधू' हे विशेषण त्यांना लावले. ते विशेषण सर्वांना आवडले. चित्तरंजन देशबंधू झाले.

प्रकृती बिघडली


अपरंपार श्रम पडत होते. स्वराज्य पक्षाचे प्राण होते. विधीमंडळातील काम पाहावयाचे. टीकाकारांना उत्तरे द्यायची. विधायक कार्याची योजना करायची. फंड जमवायचा. त्यांचे शरीर थकत चालले. परंतु अधिकाधिक काम येतच होते. कलकत्ता कार्पोरेशनचे ते मेयर झाले. म्युनिसिपालटीच्या कामात लक्ष घालू लागले. शुध्द दूध कसे मिळेल, गरिबांसाठी चाली कशा बांधता येतील, शिक्षण मोफत व सक्तिचे करणे, किती तरी प्रश्न त्यांच्या डोळयांसमोर हते. स्वतःच्या मतप्रचारासाठी 'फार्वर्ड' हे वर्तमानपत्रही त्यांनी सुरू केले. या कामाच्या बोज्याखाली प्रकृती बिघडत चालली. तरी ते काम करीतच राहिले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel