का तू कर्मयोग शिकवीत आहेस? सात्त्वि कर्मयोगी कसा असावा ते का तू सांगत आहेस? मानवांनो, भरती असो, ओहोटी असो, मी सदैव माझ्या कर्मात रमलेला आहे. सुखदु:ख विसरून मी माझ कार्य करीत आहे. माझे स्मरण करा व तुम्हीही असेच झगडत राहा. सुख वा दु:ख, जय वा पराजय, कर्म करीत राहा, असे का तुला शिकवावयाचे आहे?

समुद्र, तुझी गर्जना ऐकिली की हृदय गंभीर होते. तुझ्या गर्जनचा अर्थ समजला नाही. तरीही शरीरातील अणुरेणू नाचतो. तुझ्यात काय जादू आहे. कळत नाही. तुझे वर्णन कसे करावे ते कळत नाही. तू परमेश्वराचे प्रतीक आहेस. अनंत ईश्वराचे तू सिंहासन आहेस. लहान होडया परंतु निर्भयपणे तुझ्या वक्ष:स्थळावर त्या नाचत असतात. तू त्यांना खेळवतोस, डोलवतोस, एखादे वेळेस रागावतोस व त्यांच्या थोबाडीतही मारतोस. तुला खारट म्हणू की गोड म्हणू! खारट म्हणावे तर तुझ्याच पाण्याचे होणारे ढग गोड पाण्याची वृष्टी करतात. तू आपला खारेपणा स्वत:जवळ ठेवतोस व मधुरता जगाला देऊन टाकतोस. असे का आहे?

तुला पाहून तो मंगा उगीच नसे शत विचारांत रममाण होत! लहानपणापासून त्याला तुझे वेड. लहानपणापासून तुझा छंद. हृदयसिंधू भरून आला की तुझ्याकडे धाव घेई. अपरंपार शोक असो वा अपार आनंद असो, भावना उचंबळल्या की शांत करावयास मंगा तुझ्याकडे यावयाचा. किती त्याला तुझे आकर्षण! रात्री सारी सृष्टी शांत असावी. सारे गोड झोपेत असावेत, आणि मंगाने तुला भेटायला यावे! या टेकडीवर बसून तुझ्याकडे घटकान् घटका त्याने बघत राहावे. असे कितीदा तरी होत असे. तुला पाहून काय वाटे त्याला! तुझी हाक त्याच्या हृदयाला का अधिक समजे?

मंगा समुद्रावर आला म्हणजे समुद्र त्याच्याजवळ कधी गोड गोष्टी सांगे. कधी भेसूर भीषण कथा सांगे. मंगा, मी दुष्ट आहे. येऊ नका माझ्याजवळ. मी फसव्या आहे. मुलासारखा क्षणभर हसतो, परंतु दुस-या क्षणी अक्राळ विक्राळ राक्षस मी होतो. मी चंचल आहे. केव्हा काय करीन त्याचा नेम नाही. माझ्याजवळ याल तर मराल, मराल, असे मी सांगत असतो. मी मृत्यूची गाणी गात असतो आणि खरे म्हटले तर मंगा या जगात शेवटी मरण आहे. या माणसांच्या धडपडी पाहून कधी कधी मी हसतो. कोण ते त्यांचे अहंकार. बुडबुडे बेटे. अरे, मी हजारो वर्षे खेळ पाहून राहिली आहे. सर्वांची मरणे मी पाहून राहिलो आहे. मोठमोठे ऋषिमहर्षी, ज्ञानी, तत्त्वज्ञानी, शास्त्रज्ञ, कवी कोठे आहेत ते! सारे गेले. मोठमोठे राजेमहाराजे, त्यांची ती विशाल नगरे, प्रचंड राजे, ते वैभव, ते हत्ती-घोडे-कोठे आहेत सारे? कोठे आहेत कौरवपांडव? कोठे आहेत रामकृष्ण? कोठे गेले ५३ कोटी यादव, १८ पद्मे वानर? कोठे आहे सोन्याची लंका? तो चौदा चौकडयांचा रावण? कोठे आहे तो अशोक, कोठे आहे समुद्रगुप्त? कोठे आहे ते महान् ग्रीक राष्ट्र, कोठे आहे मिसर? कोठे आहे रोम? कोठे आहे इस्तंबूल? सारे क्षणभर गर्जतात, दुस-या क्षणी नष्ट होतात. अनेक संस्कृती उदयास आल्या व अस्तास गेल्या. एकाचे मरण व दुस-याचा जन्म. मंगा, असा हा भीषण खेळ चालला आहे. परंतु मानवाला भान नाही. मी खदाखदा हसतो. पोट धरून हसतो. मोठमोठी गलबते बांधून ऐटीने माझ्या छातीवरून जाऊ पाहतात. मी त्यांना जाऊ देतो. हा अहंकारी मानव घमेंड करू लागतो, पाहा, मी समुद्रावर विजय मिळविला. या समुद्राला तुडवून मी जात आहे. परंतु एखादे वेळेस मी त्याला धोक्याची सूचना देतो, अरे बुडबुडया, फार नको ऐट, ही जाणीव करून देतो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel