‘मधुरी, तुला शंभर वर्षे आयुष्य आहे.’ म्हातारी म्हणाली.
‘कशावरून?’
‘तुझीच आम्ही दोघं आठवण करीत होतो.’
‘दोघं?’
‘हो.’
‘त्यांना का मंगाची माहिती आहे काही?’
असे दिसते. तू तेथे बस व त्यांना विचार. मी जाऊन येते बाहेर.’

म्हातारी गेली व मधुरी आत आली. मंगाने तिच्याकडे पाहिले.
‘ही पहा ताजी फुले. छान आहे वास.’ ती म्हणाली.

‘आता तुझी मोठी बाग आहे ना?’
‘तुम्हांला काय माहीत?’

‘पूर्वी आपली छोटी बाग होती. लहानशा अंगणातील बाग. मला सारे आठवते आहे, मधुरी.’
‘कोण तुम्ही?’

‘मी तुझा मंगा. उगीच का एकदम तुला असे एकेरी म्हणू लागलो? मधुरी, मी तुझा मंगा. ये, ये; बस माझ्याजवळ. मधुरी, ये. मला दूर लोटू नको.’
‘मंगा, माझा मंगा!’

‘होय. तोच मी. तुम्हांला कळले मी मेला; परंतु तुझ्या गोधडीने तारले. मी एकटाच वाचलो असेन. सारे गलबत बुडाले. अनेक संकटातून वाचून मी आलो. तुझी आठवण तरीही होती मधुरी.’

‘मंगा, तू काय म्हणशील? तू सारे ऐकले आहेस येथे?’
‘होय, ऐकले आहे, पाहिले टेकडीवर तुला व बुधाला पाहिले. तुमचे बाळ पाहिले, मोती पाहिला.’

‘मंगा!’
‘मधुरी, रडू नको. लाजू नको. माझ्याविषयी तुझ्या मनात प्रेम आहे, हे मी जाणतो. तू ती गोधडी नेलीस. त्या टेकडीवरचे तुझे शब्द मला अमृताप्रमाणे वाटले. बुधासाठी तू माझ्यावरचे प्रेम जरा बाजूला ठेवलेस. तुझ्या मनाची ओढाताण मी जाणतो. देवाला लहानपणाचे शब्द खरे करायचे असतील. मधुरी, नीट बस. तुझ्या मांडीवर घे माझे डोके.’

‘मंगा, माझा मंगा. माझ्यासाठी माझा राजा दूर गेला. माझ्यासाठी परत आला. आणि मी? अरेरे!’ तिला बोलवेना.
‘मधुरी, अशी रडशील तर मला दु:ख होईल. खरोखर, माझ्या मनात मत्सर नाही. द्वेष नाही. शांत हो. देवाने तुम्हांला आशीर्वाद देण्यासाठी मला पाठविले आहे. संकटे भोगून मी अधिक वृध्द, अधिक शुध्द झालो आहे. खरे ना? तुम्हांला आशीर्वाद देण्यास योग्य आहे.’

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel