सर्व रात्र गेली. पहाटे पाखरांनी त्याला जागे केले. तो उठला. मधुरी त्याच्या डोळयांसमोर आली. मुले त्याच्या डोळयांसमोर आली. मुले त्याच्या डोळयांसमोर आली. मधुरी जाऊ नको, जाऊ नको सांगत होती. आपण हट्ट धरून आलो. त्याला फार वाईट का वाटले? पुढे काय होणार? तो उमेदीने आला. व्यापार करण्यासाठी निघाला होता. त्याची उमेद खचली. तो निराश झाला. परंतु पुन्हा मन म्हणे, निराश नको होऊ. तुझ्या जगण्यात अर्थ नसता तर तू वाचतास का? तुझी व घरच्या प्रिय मंडळींची भेट होणार असेल म्हणूनच तू वाचलास.

आता चांगलेच उजाडले. किती सुंदर सुदंर पक्षी तेथे होते. त्यांचे आवाजही मोठे गोड. त्या पाखरांच्या पंखाचे रंग पाहून मंगा दंग होई. सरोवरात कमळे फुलली होती. काही पक्षी सरोवरात पोहत होते. मंगाचा श्रमपरिहार झाला. इतक्यात त्याला दूर एक फळझाड दिसले. लालसर फळे होती. तो गेला. काही फळे खाली पडली होती. त्याने चाखून पाहिली. ती चवदार लागली. आंबटगोड, फळे. त्याने ती फळे खाल्ली. पोटभर फलाहार झाला. येथेच सरोवराच्या काठी राहावे असे त्याला वाटले.

एके दिवशी तो घाटावर झोपला होता; आणि तेथे कोण आले? त्या देशाचा राजा तेथे आला होता. शिकारीला आला होता. गडबड ऐकून मंगा जागा झाला. त्याला घोडेस्वार दिसले. तो घाबरला. परंतु माणसे पाहुन आनंदला. मंगाची मूर्ती दिसायला मोठी मोहक होती. राजाला वाटले की कोणी देवदूतच आहे. राजा मंगाजवळ आला. परंतु एकमेकांची भाषा एकमेकांस समजेना.

राजाने एक घोडा मंगाला दिला. आपल्याबरोबर चलण्यास सांगितले. मंगा काय करणार? तो राजाबरोबर निघाला. सारी मंडळी राजधानीस आली. तेथे दुभाषे होते. त्यांच्या द्वारा राजाशी बोलणे चालणे झाले.

‘तुम्ही येथे राहा. तुमची नीट व्यवस्था होईल.’ राजा म्हणाला.
‘परंतु माझी मुलेबाळे घरी आहेत. राजा, माझी येथून रवानगी कर. मला घरी जाऊ दे.’ मंगाने विनविले.

‘नाही. येथून जाता येणार नाही.’ राजा म्हणाला.
मंगाला एक बंगला देण्यात आला. त्यात सारी व्यवस्था होती. सारा थाटमाट होता. उंची वस्त्रे त्याला देण्यात आली. निजायला छपरी पलंग. जेवायला राजाच्या पंगतीला त्याला बसविण्यात येई. शहर सोडून जाता कामा नये एवढे बंधन त्याच्यावर होते. बंगल्याभोवती बाग होती. तीत त्याने हिंडावे-फिरावे.

मंगा तेथे राजपुत्राप्रमाणे होता. परंतु त्या सुखोपभोगात त्याचे मन रमेना. तो कंटाळला. तो दु:खीकष्टी झाला. परंतु करतो काय? राजाला एक मुलगी होती. त्या मलीचे प्रेम या मंगावर जडले. करीन लग्न तर त्याच्याशीच असे ती म्हणू लागली. ती त्याच्याकडे येई. त्याला फुले देई. त्याच्याकडे पाहत राही. मंगाला कसे तरी वाटे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel