‘आता काय आजी?’ आता तर गलबत भरण्यात आले.
‘अजून रिकामे करता येईल.’
‘ती फजिती आहे. सा-या गावात मी जाणार असे झाले आहे. आता ऐन वेळी का माघार घेऊ? मग मधुरीला काय वाटेल!’
‘नको, पण आता मी जाईनच. ठरले ते ठरले. आजी, मी परत येईन; परंतु तोपर्यंत तू-तू आमची मायबाप. आम्ही तुझ्याजवळ लहानपणी खेळलो, तुझ्याजवळ खाऊ खाल्ले, तुझ्याजवळ भांडलो, खरे ना? तू मधुरीचे बाळंतपण केलेस. आजी, तुझे किती उपकार!’
‘मंगा, उपकार हा शब्द नको बोलूस. माझ्या समाधानसाठी ते मी सारे करीत असे. माझ्या सुनेचे, मुलीचे बाळंतपण करण्याचे भाग्य मला नाही लाभले. परंतु ते सुख मी अनुभवले. मधुरी माझी सून का मुलगी? दोन्ही; खरे ना! मी हा आनंद मिळविला. थोडी धन्यता मला वाटली.’
‘आजी, मला तुझा आशीर्वाद आहे ना!’
‘माझा आशीर्वाद आहे; परंतु देवाची दया हवी.’
‘आजी, तुझ्यासारख्या प्रेमळ माणसात का देव नाही! देवाच्या दयेचा तुझ्यासारख्यांच्या द्वाराच साक्षात्कार होतो. तुझा आशीर्वाद असेल तर देव का शाप देऊ शकेल.’
‘जातोस तर जा. परेदशात जाणार. जपून राहा. हवापाणी सदैव बदलते. मधुरीचा व मुलांची आठवण ठेव. ती आठवण तुला तारील. ती आठवण तुला वाटेल तसे वागू देणार नाही. ती आठवण तुला असली म्हणजे तू प्रकृतीची काळजी घेशील. खरे ना!’
‘होय आजी मी यांच्यासाठीच जात आहे. माझ्या मनाच्या लहरीसाठी नाही जात. मधुरीला सुखात ठेवावे, मुलांना सुखात ठेवावे म्हणून मी जात आहे.’
‘मंगा आम्ही सुखातच होतो हो.’
‘ते खरे, परंतु अधिक सुख देता यावे म्हणून जात आहे.’
‘मंगा, तू परंत केव्हा येशील? फार लोभात गुंतू नकोस. परत ये. पुन्हा परत जा. येणा-या जाणा-या गलबताबरोबर चिठ्ठी, पत्र पाठवीत जा. खुशाली कळव.’
‘आणि कोणी न भेटले तर?’
‘वा-यावर निरोप पाठव. रोज वा-याबरोबर बातमी कळव. तो वारा येऊन सारे सांगेल. मधुरी समुद्रावर येईल. ती वा-यावरचा निरोप वाचील. खरे ना मधुरी!’
‘होय, आजी.’
इतक्यात सोन्या व रुपल्या आले. किती तरी सागरी संपत्ती त्यांनी गोळा करून आणली होती. शिंपा, शंख, कवडया, ती सारी संपत्ती आईबापांच्या चरणी त्या बाळराजांनी अर्पण केली.