‘त्या टेकडीवर तीन मुले खेळत. मंगा, मधुरी व बुधा लहानपणी खेळत. घसरगुंडी करीत. खाली येत. अजूनही मधुरी तेथे येते व समु्द्राकडे पहात बसते.’

‘येतो ती टेकडी पाहून. प्रेमाची टेकडी.’

आणि मंगा निघाला. तो त्या टेकडीवर आला. त्याला शेकडो स्मृती आल्या. त्याच्या डोळयांतून शतधारा वहात होत्या. ‘मधुरी मधुरी,’ मी म्हणत होतो. अनेक संकटे सोसुन मी आलो. तिच्यासाठी आलो. मुलांसाठी मी आलो आणि आता काय करू? त्या राजकन्येचे प्रेम झुगारले. तुरुंग भोगला. एकान्तवास भोगला. त्या राजकन्येने बलिदान केले आणि मधुरी? मधुरी का माझ्यावर प्रेम नाही करीत? प्रेम नव्हती करीत? तसे असले तर ती या टेकडीवर येऊन का रडते? केवळ बुधासाठी का तिने असे केले? आणि ते लहानपणाचे शब्द. काय आहे ही सारी घटना? आता मी कोठे जाऊ? राहणेही पाप. ओळख देणेही पाप. मधुरीला का दु:ख देऊ? तिचे मन कोवळे आहे. तिच्या सुखात का विष कालवू? अरेरे?’

मंगाच्या मनात कोण डोकावेल? त्याच्या मन:स्थितीचे कोण वर्णन करील? कोण तेथल्या खळबळी दाखवील, वेदना दाखवील? तो दमला आणि पुन्हा घरी आला. अंथरुणावर पडून राहिला. जेवला थोडेसे आणि पुन्हा पडला रात्री त्याला झोप आली नाही.

बाहेर उजाडले. मंगाच्या मनात दाट अंधार होता. त्याला उठण्याची इच्छा नव्हती. बाहेरचा प्रकाश त्याला पाहवेना. त्या प्रकाशाचा त्याला तिरस्कार वाटत होता. त्याने डोक्यावरून पांघरूण घेतले. त्या पांघरूणाच्या आत मधुरीने दिलेली गोधडी होती. त्याच्या मनात येई की, गोधडी समुद्रात फेकावी, चुलीत जाळावी. राजकन्या गोधडीची होळी करायला निघाली होती. उगीच नाही. तिला का दिसत होत सारे? पण नाही, मधुरी वाईट नाही. मी ही गोधडी जाळणार नाही. मधुरीच्या हृदयाची ही ओढाताण आहे. तिच्या हृदयाचे हे तुकडे, हृदयकमळाच्या या पाकळया, मधुर व पवित्र पाकळया.

म्हातारी अंथरुणावर नव्हती. ती केव्हाच उठली होती. कामधाम करीत होती. झाडलोट करीत होती.
‘उठा. कढत कढत दूध घ्या.’ ती त्या मुशाफराला म्हणाली.

‘तुमचे प्रवाशांवर इतके प्रेम?’ त्याने विचारले.
‘माझ्या खाणावळीत जे येतात, ते त्या वेळेपुरते जणू माझे माझ्या घरातले. खरे ना? घ्या कढत कढत दूध. हुशारी वाटेल.’
‘तोंड धुतो, मग घेतो.’

तो उठला. त्याने प्रातर्विधी केले. दूध घेऊन तो बाहेर पडला. तो समोर त्याला कोण दिसले? बुधा व मधुरी. बुधाच्या खांद्याशी बाळ होते. बाजूला होऊन मंगाने पाहिले. त्याने मूठ उगारली. दातओठ चावले. परंतु पुन्हा त्याच्या डोळयांत करुणा आली. प्रेम आले. पाणी आले. मधुरी व बुधा हसत हसत गेली. मंगा निघाला. तो बुधाच्या घराजवळ येऊन उभा राहिला. सोन्या, रुपल्या, मनी, ती तीन मुले तेथे खेळत होती.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel