कौटुंबिक जीवन
जी एक सामाजिक नीती म्हणून मानली जात असे, तिच्याविषयी आज अनास्था उत्पन्न झाली आहे. मागचे महायुद्ध झाले व एक प्रकारचा सर्वत्र  विस्कळीतपणा आला. आर्थिक अडचणींमुळे लग्ने उशिरा करण्याची पद्धत पडू लागली. स्वतःच्या व्यक्तित्वाचा कोंडमारा होता कामा नये, असे उत्कटपणे वाटू लागले. आईबापांचे मुलाबाळांवरील नियंत्रण ढिले पडले. अर्धवट लैंगिक ज्ञानामुळे घोटाळे झाले. फ्राइड वगैरे मानसशास्त्रज्ञांनी लैंगिक वासनाच सर्व व्यवहाराच्या मुळाशी असतात असे प्रतिपादिले. संततीनियमनाची साधने उपलब्ध झाल्यामुळे विषयभोग भोगूनही त्याचे परिणाम भोगावयास न लागण्याची सोय झाली. अशा या अनेक कारणांमुळे पूर्वीची ध्येये व दृष्टी यांना तितकेसे महत्त्व राहीले नाही. पुरुषांना एक कायदा व बायकांना मात्र निराला ही गोष्ट अतःपर स्त्रिया सहन करावयास तयार नाहीत; आणि ते रास्तही आहे. पुरुष तो पुरुष व स्त्री ती स्त्री, असे मुलभूत भेद पाहून उभारलेली ध्येये आज कोणी मानायला तयार नाही. अक्षतयोनित्वाचे, निर्मळ कौमार्याचे जे ध्येय स्त्रियांच्या गळी उतरविण्याची पूर्वी पुरुष खटपट करीत, ते ध्येय आज धुळीत गेले आहे. त्या ध्येयाचा मनावर फारसा पगडा हल्ली राहिला नाही. पुरुष काय किंना स्त्रिया काय, त्यांना रोजच्या चाकोरीतील जीवनापेक्षा स्वैर सुंदर जीवनच आवडते असे सांगण्यात येत आहे. चंचल वासना-विकारांनी नटलेले प्राणी म्हणजे हे मानव. पुरुष वा स्त्रिया यांच्यात श्रेष्ठ-कनिष्ठपणा दाखविण्याची जरुर नाही. दोघेही वासनांचे गोळे. पुरुष चंचल असतात नि स्त्रिया नसतात असे थोडेच आहे? आणि स्त्रिया तेवढ्या पतिनिष्ठ असतात आणि पुरुष पत्निनिष्ठ नसतात असे थोडेच आहे ? गुणदोष दोघांत आहेत. मानवजात जन्माला आली त्यावेळेपासूनच लैंगिक स्वैरता रुढ आहे. परंतु त्या स्वैरतेला आज गोड गोंडस नाव दिले आहे. ही स्वैरता नाही. त्या त्या व्यक्तीचे आंतरिक स्वरुप प्रकट करण्याचा हा मार्ग आहे. हे व्यक्तीचे अंतराविष्करण आहे. चांगल्या चांगल्या कादंब-यांतूनही ही जी नैतिक शिथिलता गौरविली जात आहे, ती आदर्श म्हणून पुढे मांडली जात आहे.* जी स्त्री आर्थिक अडचणीमुळे पाप करते, तिला तिच्या या धंद्यातून लैंगिक सुखाचा आस्वाद घेऊ पाहणा-या नव युवती घालवून देत आहेत. स्वतःची वासना तृप्त करुन घेत असताही ती आपली सद्सद्विवेकबुद्धी शाबूत ठेवू पाहते. पुष्कळ स्त्रिया केवळ वासनांना बकळी पडून व्यभिचार करतात.

* न्यायाधीश लिंडसे याने ‘आजच्या तरुणांचे बंड’ म्हणून एक पुस्तक लिहीले आहे. त्यात तो लिहीतो, ‘चौदा ते सतरा वर्षाच्या मुली जर आपण घेतल्या तर असे दिसेल की, दर दहा मुलींपैकी एकीने लैंगिक बाबतीत गुन्हा केला आहे. सतरा ते एकवीस वर्षांपर्यंतच्या मुली घेतल्या तर हे प्रमाण अधिकच आढळते. तरुण व तरुणी वनभोजनास जातात, नाचांना जातात, मोटारीत बसून फिरायला जातात. परंतु यांच्यातील शेकडा नव्वद तरी एकमेकांस मिठ्या मारतात, एकमेकांची चूंबन घेतात आणि शेकडा पन्नास तर चुंबन-अलिंगनाचीही मर्यादा ओलांडून पलीकडे जातात.’ न्यायाधीश लिंडसे अमेरिकेतील डेव्हर शहरी न्यायाधीश होता.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel