आर्थिक संबंध
एखाद्या वस्तूचा दुरुपयोग केला जातो एवढ्यावरुन तिचा नीट उपयोग करुन घेऊ नये असे नव्हे. अग्नीने कोणी आगही लावील; म्हणून का आपण स्वयंपाक करण्याचेही बंद करायचे ? सृष्टी कधी कधी उग्र स्वरुप धारण करते. सृष्टीच्या अशा उग्र रुपापासून मानवजातीला वाचवायचे असेल, तर शास्त्र मदत करु शकेल. शास्त्रांची वाढ होत आहे. उत्तरोत्तर अधिकाधिक शक्ती मानवाच्या हाती येत आहेत, नाना साधने मिळत आहेत, उपलब्ध होत आहेत; त्या सर्वांचा नीट बुद्धिपूर्वक उपयोग करु तर कल्याण होईल. प्राचीन काळी ग्रीक लोक काहींना गुलाम ठेवीत व मग स्वतःची सुधारणा करीत! दुस-यांना राबत ठेवून स्वतः मोकळे राहत व सुख-संस्कृती भोगीत. तशी जरुरी आज राहणार नाही. शास्त्रांच्या सदुपयोगाने मानवी शक्ती वाचेल; सुखाची व संस्कृतीची सर्वांना संधी मिळेल. गिरणीतील कापडापोक्षा हातसुताची खादी अधिक पवित्र, मोटारीपेक्षा बैलगाडी अधिक श्रेष्ठ, असे धर्म सांगत नाही. जपायचे ते इतकेच, की यंत्राची गुलामगिरी वाढू नये. मनुष्यांना धुरकटलेल्या शहरात व घाणेरड्या अंधारमय तुरुंगात यंत्रांनी डांबू नये. हिरवी शेते दृष्टीस पडणार नाहीत, निळे आकाश दिसणार नाही, असे यंत्रांना करु नये.

श्रम व फुरसत असे शब्द आपण का वापरतो ? आपल्या कामात आपणास आनंद वाटत नाही म्हणून निराळ्या फुरसतीची जरुरी वाटते. आपल्या कामात आपले मन नसते, म्हणून ते काम आनंददायक वाटत नाही. ते काम जणू बोजा वाटते. समाजाला आवश्यक वस्तू पुरवण्यासाठी असे कंटाळवाणे काम आपण करतो. कामगारांना कामातच आनंद वाटेल, असे केले पाहिजे. कारखान्याच्या सर्वसाधारण व्यवस्थेत कामगारांनाही आपलेपणा वाटेल, असे केले पाहिजे. हा कारखाना आपला असे त्यांना वाटेल, तरच त्या कामात आनंद येईल, अशी आपुलकीची भावना त्यांच्यात उत्पन्न केली पाहिजे.

मनुष्याच्या गरजा दोन प्रकारच्या असतात; काही आर्थिक व भौतिक असतात; पैसा, सुख, सत्ता, प्रतिष्ठा वगैरे या प्रकारांत येतात. दुसरा प्रकार म्हणजे सामाजिक व आध्यात्मिक गरजांचा. उदाहरणार्थ सचोटी, ज्ञान, न्याय, खेळीमेळीने वागणे, सहानुभूती, दुस-यांचे नीट समजून घेणे, निःपक्षपातीपणा, सेवा वगैरे. कामाकडे केवळ धंदा या दृष्टीने बघता कामा नये. धंदा म्हटला म्हणजे तो बाजारभावानुसार नियमित करावा लागतो. आपण आपल्या कामाकडे अशा दृष्टीने बघावे की ‘यामुळे मी समाजाच्या गरजा पुरवीत आहे, समाजासेवेचे साधन म्हणून हे माझे काम आहे.’ कामगारांनीही इकडेतिकडे वारेमाप न जाता आपण एकाच जिवंत संघटनेचे घटक आहोत अशा रितीने बंधुभाव वाढवावा. त्यांची संघटना एकजीवी झाली पाहिजे. आज कोणी कोणाचे म्हणणे नीट समजूनच घेत नाही. परस्पर-समजूतदारपणा वाढला पाहिजे. सामुदायिक जीवनात व वैयक्तिक जीवनात आपण एक व्यापक व जिवंत अशी माणुसकीची व आध्यात्मिकतेची भावना निर्माण केली पाहिजे. काम करणा-या निरनिराळ्या घटकांत एक प्रकारची सामुदायिक भावना उत्पन्न झाली पाहिजे. आपण परस्परावलंबी आहोत ही वृत्तीही अशा सामुदायिक भावनेत अवश्य हवी.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel