जीवन म्हणजे महाप्रस्थान, जीवन म्हणजे एक मोठे साहसाचे काम. जीवन म्हणजे अज्ञानाचा शोध, सत्याचे प्रयोग. जीवन म्हणजे ठराविक पद्धती नव्हे, चार रुढींची चाकोरी नव्हे. जीवनाचा खेळ असा आहे की, त्याचे सारे नियम संपूर्णपणे नीट समजणे अशक्य आहे. वस्तुस्थिती-निरपेक्ष असे कोणतेही नियम सुंदर जीवन कसे जगावे हे आपणास सांगणार नाहीत. त्यांची मदत आपणास होणार नाही. आपण प्रत्यक्ष जगू या; या विश्वाचा हेतू ध्यानात धरुन, उत्क्रांतीचे नियम व ध्येय लक्षात ठेवून त्यांच्याशी आपल्या जीवनाचा मेळ घालीत पुढे जाऊ या. अशानेच प्रगती होईल, जीवनात राम वाटेल. आज समाजात अशांती का आहे?

वाढते ज्ञान, नीतिशास्त्राचे ऐतिहासिकदृष्ट्या सम्यक पर्यालोचन, आजच्या सामाजिक संस्था, यांमुळे ही अशांती आहे. सुशिक्षित लोक म्हणतात, ‘सद्सदविवेकबुद्धीची आज्ञा आम्ही मानतो, परंतु तिच्यावर आमचा भरवसा तर नाही. कर्तव्यकर्म आम्ही पार पाडतो, परंतु त्यात काही अर्थ आहे असे तर वाटत नाही.’  नैतिक जीवनाची रुढ कल्पना ते धाब्यावर बसवितात. नवीन आरोग्यदायी सुंदर प्रघात निर्माण व्हावे असे त्यांना वाटते. एखादा नवीन प्रघात पडताच सर्वसामान्य लोकांच्या मनाला धक्का बसतो. त्यांना कसेसेच वाटते. परंतु  कसेसेच वाटणे म्हणजे काही सबळ कारण नव्हे. आपल्या पूर्वजांपेक्षा आपण जरा शिथिल बंधनांचे झालो आहो, असे जर कोणी म्हटले, तर त्यांचे ते म्हणणे सत्यार्थाने घेतलेच पाहिजे असे नाही आणि त्यांच्या म्हणण्याचा बाऊ करण्याचीही जरुरी नाही. त्यांनी तसे म्हटले म्हणून आपला मोठा अपमान झाला असे वाटून घेऊ नये. किती तरी गोष्टी अशा आहेत की, ज्यांना हे गतानुगतिक लोक ब-या म्हणत, त्यांना आपण आज रद्दी समजत आहोत. आपली रुची बदलली आहे. आवडीनिवडी बदलल्या आहेत, दृष्टी बदलली आहे. एक काळ असा होता की भार्या विकली जात असे व त्यात काही अब्रह्यण्यम् आहे असे वाटत नसे. तो रोमन मुत्सद्दी सेनेका सौम्यमूर्ती होता. परंतु गुलामांना क्रॉसवर चढविण्याचे त्याला काही विशेष वाटत नसे. आपले गेले महायुद्ध सीझरच्या युद्धापेक्षा जरी कमी भीषण नसले, तरी सीझर जितक्या सहजतेने युद्धाचे समर्थन करी, तितक्या सहजतेने आज युद्धाचे समर्थन कोणी करीत नाही. नीतीच्या क्षेत्रातील तारे स्थिर नसतात. ते भ्रमण करीत असतात. नीतीच्या प्रांतातील प्रकाश अंधुक असतो. परंतु एका दृष्टीने मात्र पूर्वजांपेक्षा आपण नक्की घसरलो आहोत. आपण एखाद्या ठरीव साच्याप्रमाणे वागत नसलो तरी त्याचे दुःख नाही. दुःख आहे ते हे की, आपण फारच उथळ झालो आहोत. एक प्रकारचा फालतूपणा सर्वत्र दिसून येत आहे आणि धोका आहे तो येथेच. आपल्या विचारात, आपल्या आचारात एक प्रकारचा थिल्लरपणा आला आहे. जीवनात जणू मूल्यच राहिलेले नाही. जीवन म्हणजे एक गंमत झाली आहे. आजच्या जीवनाचा रोग आहे तो हा क्षुद्रपणाचा. या रोगातून मुक्त व्हायचे असेल तर एकच उपाय आहे. कोणतेही ध्येय निवडा, कोणताही मार्ग घ्या; परंतु उत्कटपणे तदर्थ अहोरात्र झिजा. वीर व्हा. वीरता हवी असेल तर तपश्चर्या हवी, निग्रह, संयम, विलासविन्मुखता यांची जोड हवी, एक प्रकारची कणखर वृत्ती हवी. गुळगुळीत व मुळमुळीत असून भागणार नाही. तसेच दुस-यांविषयी सहानुभूती, उदारता, माणुसकी यांचीही जरुरी आहे. म्हणजेच जे आहे त्याचा स्वीकार करुन, नवीन उभारण्यासाठी हिंमतीने उभे राहिले पाहिजे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel