ज्ञानपूर्वक येणारा संयम हा थोर आहे. अज्ञानाने सहजासहजी आपण निष्पाप राहिलो तर त्यात पुरुषार्थ नाही. नीती म्हणजे वैचारीक प्रक्रिया. लक्षावधी स्त्रियांना जर रतिहीन राहावे लागत असेल तर, किंवा वेश्यांचा धंदा स्वीकारावा लागत असेल तर, अर्वाचिनांनी एकपत्नीत्वाचा नियमाचा फिरुन विचार केला पाहिजे. विवाहसंस्था अनिर्बंध होणे जसे अहितकारक आहे, तसेच, ती संस्था अपरिवर्तनशील व संकुचित होणेही हानिकारकच. अति सैल नको, अति ताणही नको, स्त्रिया काय किंवा पुरुष काय, उभयतांना एकच नीती असावी. त्यासाठी खाली येण्याची जरुरी नाही; उलट वरच जावे लागेल. स्त्रियांनी पुरुषांच्या दर्जाला खाली येण्यापेक्षा, पुरुषांनी स्त्रियांच्या दर्जाला वर चढावे. युगानुयुगे ज्या शिक्षा स्त्रियांवर लादल्या जात होत्या, त्यांपासून आज नवीन ज्ञानामुळे स्त्रिया मुक्त झाल्या आहेत. परंतु हे नवीन ज्ञान व स्त्रियाना मिळालेले हे नवीन स्वातत्र्य यांची भीती वाटायला नको. जोपर्यंत श्रद्धेने व धैर्याने आपण परिस्थितीला तोंड देत आहोत, तोपर्यंत नाव आपटण्याची भीती नाही. संक्रमणावस्थेत काही काही व्हायला नकोत अशाही गोष्ट घडतात; त्याला उपाय नसतो. पूर्वीच्या पिढीतल्यांपेक्षा आजच्या शिकणा-या मुली लैंगिक जीवनाच्या बाबतीत अधिक जागृत व विकसित असतात. त्या मुलीही म्हणतात की, आम्ही काही त्रेतायुगातील नाही. ‘आम्ही आजच्या आहोत. आम्ही अशा वागणारच.’ त्यामुळे सनातन्यांना धक्का बसतो. शाळा-कॉलेजांतून सहशिक्षण असते, त्यामुळे असभ्य वर्तनाला थोडी चेतना मिळते.

स्त्रियांमध्ये जी अशांतता आहे, तिचे मुख्य कारण म्हणजे आज त्यांचे जीवितकार्य़च त्यांना मिळत नाही. त्यांना चुकल्याचुकल्यासारखे वाटत आहे. कवी बायरन म्हणत असे, ‘प्रेम ही पुरुषांच्या जीवनातील एक वस्तू आहे; तो एक कप्पा आहे, तो एक भाग आहे. परंतु प्रेम म्हणजे स्त्रियांचे सारे जीवन, सारे अस्तित्वच.’ सर्वसाधारणपणे आपण असे समजतो की, स्त्रियांची जागा म्हणजे घरात, गृहिणी घरातच शोभते. परंतु गृहीणीचे गृह आहे कोठे ? आज घरेच नाहीशी होत आहेत! यंत्रामुळे घरातील कामधाम कमी झाले आहे. उपहारगृहांनी घराला उद्ध्वस्त केले आहे. यामुळे स्त्रियांजवळ भरपूर उत्साह व शक्ती शिल्लक उरतात. हा उत्साह कशात ओतावयाचा ? शक्ती कशात खर्चायची ? पती तर पूर्वीपेक्षा अधिकच कार्यव्याप्त झाला आहे. त्याला क्षणाची फुरसत नसते. मग पत्नीने वेळ कसा दवडायचा ? ज्यात मन लागेल, लक्ष लागेल, असे काम नसल्यामुळे स्त्री दुःखी, कष्टी होते. ती असमाधानी होते, अस्वस्थ होते. तिच्या जीवनात अर्थ राहत नाही, हेतू राहत नाही. तिचे जीवन म्हणजे का कचरा ? स्त्रियांना मग मानसिक रोग जडतात. त्यांना फेफरे वगैरे येऊ लागते, कधी कधी वेडही लागते. अशा परिस्थितीत स्त्रियांनी काय करावे ? जवळ पैसा असेल व वेळ असेल, तर एखादी स्त्री आपला हा रिकामा वेळ भरुन काढण्याची खटपट करते. मग ती करते गंमत, करते मजा! वेडेवाकडेही जरा वागते. स्वतःच्या काही अतृप्त भुका ती शमवू पाहते, काही सुख भोगते. तिचे पूर्वीचे घरकाम नाहीसे झाले आणि नवीन तर आले नाही. लग्न काही सर्व दिवसभर काम देत नाही, पुरेसे काम देत नाही. विवाहित स्त्रियांची जर ही कहाणी, ही दुर्दशा, तर मग अविवाहित स्त्रियांची, किंवा विवाहित होताच त्यांना सोडून जातात त्यांची काय बरे मनःस्थिती होत असेल ? सर्व दुःखाचे कारण एकच आहे, की करायला पुरेसे काम नाही, वेळ जायला साधन नाही. जीवनातील हा रिकामेपणा स्त्रियांना अनैसर्गिक व अस्वाभाविक मार्गाकडे न्यायला कारणीभूत होतो. कुटुंबातच त्यांना काम मिळेल अशी योजना करणे, त्यांच्या स्वभावास अनुरुप व अनुकुल असा उद्योग त्यांना देणे हे कर्तव्य आहे, ही न्याय्य अशी गोष्ट आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel