जेथे जेथे तुम्हास अर्थपूर्ण वर्तन दिसेल, सामाजिक मूल्य दिसेल, तेथे तेथे नीती आहे असे समजा- मग त्या जीवनाचे स्वरुप कोणते का असेना. मानवी जीवनाचा कोणताही आविष्कार आपण नाकारु नये. त्या विशिष्ट दिशेच्या ध्येयाची व्यवस्थित अनुभूती जोवर नाही, तोपर्यंत तरी कोणास नाकारु नये. मानवी स्वभाव वैचित्र्यपूर्ण आहे आणि पूर्णताही विविध रुपांनीच प्रकट होईल. पूर्णता म्हणजे मानवी जीवाची ध्येयभूत वस्तूशी भेट किंवा पूर्णता म्हणजे त्या ध्येयभूत वस्तूशी मानवी जीवाचा संपूर्णपणे मेळ. ईश्वरी वैभव अनेक रुपांनी व्यक्त होते. पावित्र्य शतरुपांनी प्रकट होते. भगवदगीता दहाव्या अध्यायातील ४१ व्या श्लोकात म्हणते, ‘जे जे भव्य आहे, वैभवशाली आहे, सुंदर आहे, सामर्थ्यसंपन्न आहे, ते ते मीच आहे असे मान. ते माझेच स्वरुप. माझ्या दिव्यत्वाचेच ते प्रकटीकरण.’ प्लेटोच्या आदर्श जगात पृथ्वीवरील प्रत्येक वस्तूचे एक आदर्श रुप आहे. पृथ्वीवरील सर्व वस्तूंची विवक्षित व परिपूर्ण रुपे त्या आदर्श सृष्टीत आहेत. त्या स्वर्गाच्या राज्यात या अनंत आदर्शासाठी अनंत प्रासाद उभारलेले आहेत.

आपल्या वर जाण्याच्या धडपडीने ध्येय नेहमी हाती येतेच असे नाही. परंतु ध्येयाला हात न पोचले म्हणून कष्टी होण्याची जरुरी नाही. खेळ कसा खेळलो याला महत्त्व आहे.  धावा किती काढल्या ही गोष्ट महत्त्वाची नाही. कर्तव्य करणे हे आपले काम. ते कोणाकडून करवून घेणे हे काम नाही.

असत् ही अकरणात्मक वस्तू आहे. असत् म्हणजे कमी सत्. अमुक एक मनुष्य वाईट आहे याचा अर्थ काय? याचा अर्थ इतकाच की त्याच्या ठिकाणी चांगुलपणा तितकासा नाही. सत् व असत् यांच्यातील विरोध हा अंतिम नाही, जे असत् आहे तेच सत् व्हावयाचे आहे. जो झगडा आहे तो सत् व असत् यांच्यात नसून अधिक सत् व कमी सत् यांच्यामध्ये आहे, किंवा कमी वाईट व अधिक वाईट यांच्यात आहे. सत् व असत् असे भेद न करता वरचे व खालचे, श्रेष्ठ व कनिष्ठ असे भेद करणे अधिक यथार्थ होईल. सारेच मोक्षाच्या शिडीवर चढणारे. कोणी वरच्या पायरीवर, कोणी तळच्या पायरीवर. आपलेच घोडे नेहमी पुढे दामटू नये; दुस-यांचाही विचार करावा. प्रतिपक्ष्याला केवळ कचरा मानू नये. त्याचेही म्हणणे सहानुभूतीपूर्वक समजून घ्यावे. आपल्या प्रियतम ध्येयांना विरोध सहन करणे कठीण असते खरे. व तो विरोध पुन्हा खेळीमेळीने शांतपणे सहन करणे हे तर त्याहूनही कठीण. परंतु अशाच वेळी तर वृत्तीचा विजय असतो. येथेच महात्मा इतरांपेक्षा उमटून पडतो व मात करतो. जग कसे असले पाहिजे व कसे आहे, यातील महदंतर पाहून आध्यात्मिक वृत्तीचा मनुष्य खवळून उठत नाही. कधी सुधारणार हे जग, असे मनात येऊन तो अधीर होत नाही, आदळाआपट करीत नाही. तो जीवनाचा शांतपणे स्वीकार करतो. ‘जीवनाचे हे असे स्वरुप असले पाहिजे, दुसरे नाही असता कामा,’ असे हटातटाने म्हणणारे जे उतावळे लोक, त्याची निराशा व गडबड आध्यात्मिक वृत्तींच्या मनुष्यच्या ठायी आढळणार नाही. सहानुभूतीचा अभाव म्हणजे अधर्म. मी जसा प्रामाणिक आहे तसेच दुसरेही असतील, मला जितकी कळकळ व तळतळ आहे तितकीच दुस-यांनाही आहे, असे आध्यात्मिक पुरुष मानतो. ज्यांचा देव राष्ट्रप्रिय किंवा युद्धप्रिय नाही, ज्यांचा देव प्रेमरुप आहे, विश्वरुप आहे, त्यांचा तर हाच धर्म ठरतो की, विरोधासमोर शांतपणे उभे राहावे. प्रेमस्वरुप परमेश्वराची उपासना करणारे विरोधकांशीही शांतीने व सौजन्यानेच वागतील. आपल्याला विरोध करणारांवरही न रागावता क्षमावृत्ती दाखवणे, त्यांच्याशी सहनशीलपणाने वागणे, हा त्यांचा धर्म आहे. जो जो आपल्या धर्माचा नाही तो नास्तिक व पाखंडी आहे असे मानण्याची एक सहजप्रवृत्ती आपणात असते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel