या भौतिक जगावर, या बाह्य जीवनावर आपल्या मनाने आज सत्ता मिळविली आहे. मानवी बुद्धी सृष्टीची राणी होत आहे. परंतु शरीर, संसार व मनोबुद्धी यांच्यावर आत्माचे प्रभुत्व अद्याप स्थापन झालेले नाही. जीवनावर व शरीरावर ताबा ठेवता येईल;  कारण त्यांची तंत्रे आपणास कळली आहेत, त्यांच्या शक्याशक्यता समजल्या आहेत. शास्त्रांच्या प्रगतीचे विजयध्वज नाचू लागताच तत्त्वज्ञान कोप-यात सारले गेले, विचाराचा उपहास होऊ लागला व धर्माला फाशी देण्यात आले ! आपण आपल्या पूर्वजांपेक्षा अधिक शास्त्रसंपन्न असू; त्यांच्यापेक्षा थोड्याफार अधिक गोष्टी आपणांस माहीत असतील; परंतु तेवढ्यानेच आपण पूर्वजांपेक्षा अधिक माणुसकी असलेले, कमी पशुत्व असलेले आहोत असे म्हणता येणार नाही. शिक्षणाने आज बुद्धीची बंधने गळली असे नाही. शिक्षण आज चेतविते, परंतु शांतवीत नाही. आपण काय वाचतो; कादंब-यांवर आपल्या उड्या पडतात; बोलपटांना आपण सदैव उपस्थित असतो. आणि हे सारे केल्यामुळे आपणास वाटते की, आपण सुधारलेले आहोत! आपण सारे स्वतःला आज बुद्धीप्रामाण्यवादी समजत असतो. परंतु हा दंभ आहे. आपल्या वासना-विकारांना पाठिंबा देण्यापुरती आपली बुद्धी उभी राहत असते. आपणास जे करावेसे वाटते त्याच्यासाठी आपली बुद्धी पळवाटा शोधते. आपणास जे मत मानवते, त्याच्या समर्थनार्थ आपली बुद्धी कारणे शोधून काढते. आपण ‘ भले करीत कोठे तरी जात आहोत’ असे आपणास वाटत असते. परंतु वास्तविक ‘भले करणे’ दूर राहून, आपण ‘कोठे तरी जात असतो’ एवढेच काय ते खरे ! आपण केवळ बहिर्दृष्टी झालो आहो, वरवर पाहणारे झालो आहो, मानवजातीच्या ध्येयांविषयी तोंड भरुन बोलतो, ठराविक वचने व म्हणी ओठांवर खेळवितो. परंतु त्या ध्येयांविषयी ना प्रेम, वा जिव्हाळा !  ती ध्येये जीवनात आणण्यासाठी ना त्याग, ना तप!  संयमाचे नावही आपणास माहीत नसते. अर्वाचिनांत व प्राचिनांत फारसा फरक नाही. अर्धवट, लहरी, कशावर तरी भरवसा व विश्वास ठेवाणारे, असेच आपणही आहोत. कधी कधी आपण परमोच्च वीरता प्रकटवितो, तर पुष्कळ वेळा क्रूरतेची कमालही करतो. हा अर्वाचीन मनुष्य इतकी अमानुषता, इतकी निर्दयता दाखवितो तरी कशी, असे मनात येते. मनुष्य अद्याप रानटी पशूच आहे. तो एकदम अंगावर येतो, गुरगुरतो. मनुष्य अद्याप फारसा माणसाळलेला नाही. अर्थिक यशस्विता हे आपले परमोच्च ध्येय ! आपल्या बहुतेक युद्धाची कारणे अर्थिक असतात. अर्थशास्त्र म्हणजे धर्म, साम्राज्य म्हणजे बडा धंदा. व्यापार वाढविण्यासाठी, प्रदेश जिंकण्यासाठी, वसाहती मिळविण्यासाठी आपण लढतो. व्यापारधंदे वाढावे, जगाच्या बाजारपेठा हाती याव्या, यासाठीच बौद्धिक स्वातंत्र्यही हिरावण्यात येते. जर लोक स्वतंत्रपणे विचार करतील तर या युद्धांविषयी त्यांना संशय येईल. मागासलेल्या देशांविषयी व कामगारांविषयी त्यांची सहानिभूती वाढेल. अशी सहानुभूती वाढू लागली तर पिळवणुकीचे यंत्र निष्ठुरपणे व निःशंकपणे कसे चालवता येणार?  रक्तशोषणाच्या कामात हात कदाचित थोडा ढिला पडायचा ! आपली संस्कृती विजिगीषु आहे. व्यक्ती व वंश यांच्या स्पर्धांवर, युद्धाच्या गौरवावर, विजयप्राप्तीच्या आनंदावर ती उभारलेली आहे. आजच्या संस्कृतीत साहस आहे, वेग आहे. प्रक्षोम आहे, उन्माद आहे; धावपळ आहे, गोंधळ आहे. तीत ना शांती, ना विश्रांती! सारखी धडपड व धडपड! कधीही तृप्त न होणारी अशी वासना आजच्या संस्कृतीने उराशी बाळगिली आहे आणि अतृप्त राहणे हेच त्या वासनेच्या नशिबी आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel