आपण जरी बरेचसे पशूंचे वारसदार असलो; पशूत्वाचा अंश जरी परंपरेने आपणांत आला असला, तरी मनुष्यप्राणी हा इतर प्राण्यांपेक्षा मनुष्यप्राणी या दृष्टीनेसुद्धा निराळा आहे. मनुष्यप्राण्याचे गुण वा दुर्गुण हे मनुष्यातच आढळतील. आपण विषयसुख हे जीवनाचे ध्येय केले, तर आपण पशूत्वाकडे गेलो असे मानले जाते. परंतु असा कोणता मानवेतर पशू आहे की, जो विषयसुख हे ध्येय ठरवून सारखा त्याच्या पाठोपाठ जातो? असे करणे हे या विशिष्ट मनुष्यप्राण्यालाच शक्य आहे. पुन्हा अशा काही गोष्टी आहेत की ज्यांत पशू माणसापेक्षा अधिक नेटकेपणे वागतात. काही गोष्टी पशूंत स्वाभाविक आहेत. माणसाला त्या हेतूपरस्पर प्रयत्नाने व संयमाने अंगी आणाव्या लागतील. पशू केवळ प्रजोत्पतीसाठीच रमतील. या बाबतीत मागासलेले व रानटी म्हणून ज्यांना आपण समजतो ती माणसेही पशूंप्रमाणेच वागतात. परंतु मनुष्य जसजसा सुधारतो तसतशी त्याची विचारशक्ती वाढते. तो तुलना करु लागतो. कुरुप-सुरुप पाहू लागतो. आवड-निवड उत्पन्न होते. पसंती-नापसंती येते. यामुळे माणसात अशी क्षमता येते की, तो जर मनात आणील तर महात्मा होईल किंवा अंधःपाताच्या खोल दरीतही पडेल. जेव्हा आपण म्हणतो की अमका अमका पशूत्वाच्या पायरीला गेला, त्यावेळेस आपण अलंकारिक बोलत असतो. त्या म्हणण्याचा अर्थ इतकात असतो की, मनुष्याने आपल्या स्वातंत्र्याचा नीट उपयोग केला नाही. मनुष्य व पशू या दोघांना समान असणा-या ज्या गरजा, त्यांच्या बाबतीत कितपत आसक्ती घरायची ते त्याला नीट समजले नाही; त्या गरजा तृप्त करुन घेताना मनाला कितपत मोकळे सोडायचे त्याचे तारतम्य त्याला साधले नाही.

मनुष्यातील पशुता स्वतःच्या तृप्तीसाठी सदैव तडफडत असते. आपल्यातील सर्वच वासना-विकारांची जर नीट तृप्ती झाली, तर आपल्यातील पशुतेचा पूर्ण विकास झाला असे समजता येईल. हे शरीर म्हणजेच आत्मा व या देहाचे कोडकौतूक म्हणजेच जीवीतकार्य, असे जर आपण मानले तर आपण रानटी आहो असे मानण्यात येते. पाशवी शक्ती पूजणे, इंद्रियांच्या तृप्तीलाच ध्येय मानणे, हे मनुष्याला शोभत नाही असे म्हणतात. आपण जर केवळ शरीराकडेच लक्ष देऊ, शरीरच पुष्ट व तुष्ट करीत बसू, तर आपल्या आत्म्याची शक्ती क्षीण होईल. आपल्या उच्च व उदार स्वभावाचा नाश होईल. त्याला ज्या आध्यात्मिक भुका आहेत त्यांचे हक्क आपण हिरावून घेतले असे होईल. केवळ शारीरिक बळाची पुजा करणे, त्या बळाचीच प्रतिष्ठा मानणे हे रानटीपणाचे चिन्ह आहे. मागासलेल्या रानटी समाजात पुरुष स्त्रियांची पै किंमत करतो व त्यांचा भोक्ता बनतो. कारण स्त्रिया दुबळ्या असतात. आणि जे पराक्रम करतात, शौर्य गाजवतात, शक्तीमान असतात त्यांच्यावरच स्त्रियाही अनुरक्त होतात; त्यांच्याच गळ्यात पडतात.

जो समाज केवळ शरीराकडे न बघता, केवळ जगण्याकडे न बघता मनाला महत्त्व देतो, तो समाज अधिक सुसंस्कृत होय. परंतु मन शब्द फार व्यापक अर्थाने मात्र घेतला असला पाहिजे. नैतिक परिपूर्णता, कलात्मक विकास या सर्व गोष्टी मन या शब्दांत अंतर्भूत असल्या पाहिजेत. मन म्हणजे आत्माच म्हणा ना? म्हणून जोपर्यंत आत्म्याला महत्त्व नाही, तोपर्यंत संस्कृतीच्या ख-या ध्येयाप्रत आपण पोचलो असे म्हणता यावयाचे नाही. आपले ज्ञान वाढले असले; परंतु जोपर्यंत त्या ज्ञानाचा उपयोग केवळ शारीरिक सुखासाठी होत आहे, जगण्यापलीकडे काही आहे असे जोपर्यंत वाटत नाही, जगणे हेच त्या ज्ञानाचे इतिकर्तव्य, तोपर्यंत संस्कृतीचा गाभा सापडला आहे, असे म्हणता येणार नाही. आपल्या गरजा नेहमी वाढत असतात. त्या गरजा तृप्त करणे, त्या गरजा तृप्त करुन घेण्याची साधने जमविणे, मालमत्तेचा धनी होणे हेच शेवटी आपले जीवितकर्तव्य होत असते. आपले आंतरिक वैचारिक जीवन फारच कमी दर्जाचे असते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel