म्हण अशी होती कीं, ''मी व माझा भाऊ माझ्या चुलतभावाविरुध्द; मी व माझा चुलतभाऊ परक्याविरुध्द!'' अरबाला सदैव भांडण हवें असे. जर भांडण्यासाठीं-लढण्यासाठीं परका नसेल तर भावाजवळ भांडूं लागतील. सामुदायिक मालमत्तेचें रक्षण करण्यासाठी त्याला लढाऊ पेशा पत्करणें प्राप्त होतें. आणि खाण्यासाठीं लूटमार करी. परंतु अरबाला रक्तपाताची हौस नव्हती. आपल्या जमातीच्या लोकांची संख्या कमी होईल या भीतीने तो लढे. सूड घेण्यास प्रवृत्त होई. रक्तपात उगीचच करायचा, त्यांत आनंद मानायचा अशी जी पहिली मोंगली वृत्ति होती ती अरबांत नव्हती. तो स्वरंक्षणासाठी लढवय्या बनला. शेतभात-व्यापार नाहीं म्हणून लुटारू बनला. लढाऊ वृत्ति हा त्याचा स्वभावच बनला. ''जर बाहेरचे कोणी लढण्यासाठी नसतील तर आपसांत लढा.'' अशी एक अरबी म्हण आहे.

अरबांत गुलामगिरीहि होती; जशी त्या काळांत सर्वत्रच होती. लढाईतील कैद्यांस गुलाम केलें जाई. गुलामांची खरेदीविक्री होई. गुलाम म्हणजे मिळकतीचा भाग! नवरीला आंदण बरोबर गुलाम दिले जात. दासदासी दिल्या जात. खानदानी अरबांच्या घरांत गुलाम असावयाचेच. ते घरांतील चाकर. कांहीं गुलाम लष्करी सेवाचाकरीहि करीत. परंतु त्यांच्यावर फार विश्वास नसे. स्वतंत्र मनुष्याला जी शिक्षा देत त्याच्या निम्मे गुलामाला देत. युध्देत्तर होणा-या लुटींत त्याचा हिस्सा नसे. त्याचा हिस्सा त्याच्या धन्याला मिळे. गुलामांचा आणखी एक विशेष प्रकार होता. त्यांना 'किनु' असें म्हणत. तो शेती करी. तो शेताबरोबर विकला जाई! तो भूदास होता. जमीन विकत घेतांना तिच्यांतील झाडें विकत घेतलीं जात तद्वत् तिच्यावर काम करणारेहि ते जणुं जमिनीचा एक भाग, त्या जमिनींतील किडे ! रोमन साम्राज्यांत असे भूदास फार होते. जुगारांतहि गमावून गुलाम होत. अरब गुलामकन्या वरीत, परंतु त्यांचीं मुलें गुलामच! जर मुले विशेष गुणांचीं दिसलीं तर तो त्यांना आपल्या कुटुंबांतील मानी. फार महत्त्वाच्या कारणासाठीं गुलामांना धनी स्वातंत्र्य देई. परंतु धन्याच्या जमातीचा राहिला पाहिजे. तो धन्याचा पक्षकार बने. अशांना मौला म्हणत. नाहीं केवळ गुलाम, नाही संपूर्णपणे स्वतंत्र! मर्यादित स्वातंत्र्य त्याला असे. धनी व धन्याची जमात सोडून जायचें नाहीं. एवढेच त्याला बंधन उरें. परंतु हा मौला शब्द आतां व्यापक अर्थी वापरतात. मित्र, शेजारी, पाहुणा, आप्त, प्रियकर सर्वांना हा शब्द लावतात.

मौला गुलामांचे तीन प्रकार असत. १. गुलामाला त्याच्या चांगल्या वागणुकीसाठीं किंवा इतर कांहीं कारणांनी मुक्त करणें. २. कांहीं एक ठरीव रक्कम गुलाम देईल तेव्हां त्यास मुक्त करणें. ३. इसलामोत्तर काळांत ज्यू व ख्रिश्चन हेहि एकेश्वरी मताचे असल्यामुळें या धर्माच्या लोकांना सहानुभूतीनें वागवावें असें पैगंबर म्हणत. या धर्माचे जे गुलाम असत त्यांना मौला नसत म्हणत, परंतु जिम्मी म्हणत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel