मुहंमद आल्यावर औस व खजरज या दोन्ही अरब जमाती भांडणें मिटवून एक होऊन नवधर्म स्वीकारुन मुहंमदांच्या झेंडयाखालीं उभ्या राहिल्या. या लोकांना अनसार म्हणजे साहाय्यक असें नांव मिळालें. इस्लामच्या कठीण प्रसंगी साहाय्य केलें म्हणून अनसार, अनसारी. मक्केमधून घरदार सोडून जे मुहंमदांबरोबर यसरिबला आले त्यांना मुहाजिरीन म्हणजे निर्वासित लोक, परागंदा लोक असें नांव पडलें. अनसार व मुहाजिरीन यांच्यांत खरा बंधुभाव उत्पन्न व्हावा म्हणून मुहंमदांनीं नवीन परंपरा पाडल्या, नवीन संबंध निर्मिले. यसरिब शहराचें नांवहि त्यानीं बदललें. 'मेदीनत-अन्-नबी' म्हणजे पैगंबराचें शहर असें नांव दिलें. नबी म्हणजे पैगंबर. याचाच संक्षेप होऊन मदिना नांव झालें. आणि स्वत:च्या हातानीं पहिली मशीद त्यांनी बांधिली. ते दगड आणीत होते. घाम गळत होता. ही पहिली मशीद जेथें बांधली गेली तीं जागा दोघा भावांची होती. त्यांनीं ती जागा बक्षीस दिली. परंतु हे दोघे भाऊ पोरके होते. मुहंमदांनीं त्यांना जमिनीची किंमत दिली. इस्लामची ही पहिली मशीद ! ती अत्यंत साधी होती. माती-विटांच्या भिंती. ताडाच्या पानांचें छप्पर. ज्यांना स्वत:चें घरदार नसेल अशांना रहाण्यासाठीं मशिदीचा कांहीं भाग राखून ठेवलेला होता. येथें सारें अत्यंत साधेपणानें चाले. मुहंमद उभे राहून प्रार्थना करीत, उपदेश करीत. एका ताडाच्या झाडाला टेकून ते उभे रहात आणि हृदय उचंबळवणारें प्रवचन देत. श्रोते सर्वेन्द्रियांनीं जणूं पीत. मुहंमद एके दिवशीं म्हणाले, 'जो देवाच्या प्राण्यांवर प्रेम करणार नाहीं, स्वत:च्या मुलांबाळांवर प्रेम करणार नाहीं, त्याच्यावर देवहि प्रेम करणार नाहीं. जो जो मुसलमान उघडया माणसाला पांघुरवील, अवस्त्राला वस्त्र देईल, त्याला प्रभु स्वर्गात दिव्यांबरानीं नटवील.' एकदां भूतदयेविषयीं प्रवचन चाललें होतें आणि मुहंमद म्हणाले, 'ईश्वरानें पृथ्वी निर्माण केली त्या वेळेस ती नवीन पृथ्वी भरभरत होती. त्यानें तिच्यावर ती हलूं नये म्हणून पर्वत ठेवले ! तेव्हां देवदूतांनी ईश्वराला विचारिलें, 'तुझ्या सृष्टींत पर्वतांहून बळवान काय ?'

'लोखंड. कारण तें पर्वतांनाहि फोडतें.'

'आणि लोखंडांहून बळवान काय ?'

'अग्नि. कारण अग्नि लोखंडास वितळवतो.'

'आणि अग्नीहून प्रबळ काय ?'

'पाणी. पाण्यानें अग्नि विझतो.'

'पाण्याहून प्रबळ काय ?'

'वारा.'

'आणि वा-याहून ?'

'दान देणारा सज्जन ! उजव्या हातानें दिलेलें डाव्या हातालाहि जो कळूं देत नाहीं असा दाता ! तो सर्वाहून बळी.'

मुहंमदांच्या भूतदयेच्या कल्पनेंत सारें कांही येई. एकदां ते म्हणाले, 'प्रत्येक सत्कर्म म्हणजें भूतदयाच आहे. तुम्ही आपल्या भावांसमोर प्रेमानें व प्रसन्नपणें हंसलांत तर तीहि भूतदयाच आहे. दुस-यानें सत्कर्म करावें म्हणून कधीं रागानें बोलतांत तरी तीहि भूतदयाच. दानाइतकीच अशा उपदेशरुप प्रवचनांची योग्यता आहे. रस्ता चुकलेल्यास रस्ता दाखविणें, आंधळयास मदत करणें, रस्त्यांतील दगडधोंडा, काटाकुटा दूर करणें, तहानलेल्यास पाणी देणें, भुकेल्यास अन्न देणें हीं सारीं भूतदयेचींच कर्मे. या जगांत मनुष्य जें कांहीं भलें करील तेंच परलोकीं बरोबर येईल. इहलोकींचीं सत्कर्मे हींच परलोकींची पुंजी. तेंच परलोकचें त्याचें धन. मनुष्य मरतो तेव्हां लोक विचारतात, 'त्यानें किती मालमत्ता, किती धनदौलत मागें ठेविली आहे ?' परंतु देवदूत विचारतात, तूं आपल्यापूर्वी कोणतीं सत्कर्में पुढें पाठविलीं आहेस ?'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel