केलेला करार त्यांनीं कधीं मोडला नाहीं. दिलेला शब्द सदैव पाळला. त्यांनीं कधीं कोणाला मारलें नाहीं. बोलण्यांत कधीं रागावलेच तर, 'झालें तरी काय तुला ! तुझें कपाळ चिखलानें भरो !' असें म्हणत. कोणी जर त्यांना म्हणालें, 'अमक्याला शाप द्या, त्याचें नि:संतान होवो म्हणा.' तर पैगंबर म्हणत, 'मी मानवजातीस शाप देण्यासाठीं नाहीं आलों. दया व प्रेम देण्यासाठीं देवानें मला पाठविलें आहे.' कोणी आजारी असला तर त्याला भेटायला जात, धीर देत. वाटेंत प्रेतयात्रा दिसली कीं लगेच तींत सामील होत. मग गरिबाची असो कीं श्रीमंताची. ते समतेचे भोक्ते. त्यांनीं एका गुलामाला मुक्त करुन त्याचें लग्न एका खानदानी स्त्रीशीं करुन दिलें होतें. स्त्रियांची, गुलामांची स्थिती त्यांनीं किती सुधारली. ते स्वत: सर्वांना स्वतंत्र करीत. उदाहरणानें शिकवीत. ते गरिबींत आनंद मानीत. श्रमाचे ते उपासक होते. ते स्वत: स्वत:चे नोकर होते. स्वत:चे कपडे शिवीत, जोडे शिवीत. घरांत चूलहि पेटवीत. दुस-यांचीहि दुधें काढून देत. कोणतेंहि काम त्यांना कमी वाटत नसे. एकदां त्यांच्याकडे एक पाहुणा आला होता. तो रात्री इतकें जेवला कीं सांगता सोय नाहीं. आणि मग रात्रीं त्याला जुलाब होऊं लागले. सारें आंथरुणातच त्यानें केलें. पहांटे गुपचूप लाजेनें निघून गेला. मुहंमद सकाळीं पाहुण्याकडे येतात तों खोलींत पाहुणे नाहींत ! खोलींत सारी घाण. मुहंमदांनी सारें जाणलें. ते सारे कपडे घेऊन झ-यावर ते धुवायला गेले. परंतु तो पाहुणा आपली तरवार न्यायची विसरला. तो परत आला. परंतु मुहंमद कोठें आहेत ? तो पाहुणा गावांतील मंडळींसह पैगंबरांस शोधीत त्या झ-याकाठीं आला. तों ते उदात्त दृश्य ! मुहंमद कपडे धूत आहेत. मानवांचें पाप धुवायला आलेला महापुरुष तीं घाणेरडीं वस्त्रें धूत होता. पाहुणा लाजला !   

स्वावलंबनाचे ते भोक्ते. श्रमानें मिळवावें व खावें असें त्यांना वाटे. भीक मागणें त्यांना पसंत नसे. प्रत्येकाला पोटभर अन्न, अंगभर वस्त्र मिळालेंच पाहिजे. त्यासाठीं मनुष्यानें श्रमावें व समाजानें त्याला द्यावें. एकदां एक धट्टाकट्टा मनुष्य भीक मागत होता. पैगंबर म्हणाले, 'तूं भीक कां मागतोस ?'
"माझ्याजवळ कांही नाहीं.' तो म्हणाला.
"हातांतील हा नक्षीदार कटोरा आहेना ?'

"त्याचें काय करूं ?'
"मी तो विकतों कोणाला तरी. आण इकडे.'
मुहंमदांनीं तो कटोरा विकला. त्याच्या पैशानें त्या भिका-याला त्यांनीं एक कु-हाड घेऊन दिली व ते म्हणाले, 'जा पहाडांत. लाकडें तोड. मोळी आण व वीक. पैसे येतील ते मजजवळ दे.' तो भिकारी जंगलांत गेला. भली मोठी मोळी घेऊन आला. मुहंमदांनीं ती विकली. जे पैसे आले त्यांतून त्याला खाण्यापुरते देऊन बाकीचे स्वत:जवळ त्यांनीं ठेवले. एक महिना याप्रमाणें  झालें. महिनाअखेर मुहंमद म्हणाले, 'हे बघ तुझें शिल्लक पैसे. यांतून कपडे घे. आणि असाच श्रमानें जगत जा. समजलासना.'

ते श्रमोपासक होते. कर्मयोगी होते. कोणतेंहि काम त्यांना कमीपणाचें वाटत नसे. त्यांना गुरेंढोरें चारणें फार आवडे. आणि गुरांवर तरी प्रेम किती ! 'वेळच्या वेळीं पाणी पाजा. शक्तीबाहेर मुक्या प्राण्यांपासून काम घेऊं नका,' अशी त्यांची शिकवण आहे. अर्थात् मांशासन त्यागाचा प्रयोग त्यांनीं केला नाहीं. उंट, शेळया मेंढया हें देवानें दिलेलें अन्न आहे असें ते म्हणत. अरबस्थान ओसाड भूमि. तेथें दाणापाणी नाहीं. तेथें दुसरें खाद्य कोणतें ? हिंदुस्थानासारख्या सुपीक भूमींतच मांसाशनत्यागाचा प्रयोग शक्य. तोहि संपूर्ण यशस्वी झाला नाहीं. बंगालमध्यें ब्राम्हणहि मासे खातात. एकदां पूज्य विनोबाजींस धुळें तुरुंगांत एकानें म्हटलें, 'बंगाली लोक तर मासे खातात !' विनोबाजी म्हणाले, 'बंगालची हवा अशी आहे कीं पोटांत कांहीं तरी माशासारखा पदार्थ गेल्याशिवाय लोक जिवंतच रहाणार नाहींत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel