‘कळये, तू अजून कळी आहेस. तरी तुझे हसणे इतके गोड. मग फुललीस म्हणजे तुझे हसणे किती गोड असेल?’ पिता म्हणाला.
‘बाबा, मला कळीच राहू दे!’ ती म्हणाली.
‘कळीचे रंग फुलल्यावर दिसतात. कळीचा गंध फुलल्यावर दरवळतो. तुझे रंग, तुझा गंध नकोत का प्रगट व्हायला?’ पित्याने प्रेमाने विचारले.
‘कळीचे रंग खुलले, गंध दरवळला म्हणजे लोक ती खुडून नेतात. कळीचे फुलणे म्हणजे मरणे. जे फुलते ते सुकते, गळते. कळी असणे म्हणजे अमर असणे. फुलणे म्हणजे नष्ट होणे. बाबा, मला कळीच राहू दे-’ ती म्हणाली.
‘तुला फुलवणारा भेटला म्हणजे एकदम फुलशील. आपण कळीच राहावे हयाची तुला मग आठवणही राहाणार नाही. तुझे रंग पसरतील, तुझा गंध घमघमाट करील,’ तो म्हणाला.
त्या दिवशी रात्री ढब्बूसाहेब जरा बाहेर गेले होते. कळी एकटीच घरी होती. फाशी जाणारा एक मनुष्य तुरुंगात आहे ही गोष्ट तिला कळली होती. फाशी जाणार्याला ती पाहू इच्छित होती. मरणार्याजवळ दोन गोड शब्द बोलावे असे तिच्या मनात आले. त्याला दोन फुले नेऊन द्यावी असे तिला वाटले. ती उठली. दोन सुंदर फुले घेऊन निघाली. तिल कोण अडवणार? तुरुंगाच्या अधिकार्याची ती मुलगी, एकुलती एक लाडकी मुलगी.
शिपायाबरोबर त्या फाशीकोठयाजवळ ती आली. आतील कैदी आनंदी होता.
‘हयांची खोली उघडा जरा-’ कळी शिपायाला म्हणाली.
‘साहेब रागावतील.’ तो म्हणाला.
‘त्यांचा राग मग मी शांत करीन -’ ती म्हणाली.
शिपायाने ते दार उघडले. ती फाशी जाणार्याकडे पाहात राहिली. तिला काही बोलवेना. तिचे डोळे भरून आले. तिचे हदय भरून आले.
‘कशासाठी तुम्ही आल्यात?’ फुलाने विचारले.
‘तुम्हाला पाहाण्यासाठी.’
‘माणसाला काय पाहायचे?’
‘तुम्ही उद्या जग सोडून जाणार. तुमच्याजवळ दोन गोड शब्द बोलावे म्हणून मी आल्ये आहे.’
‘जे जगतात त्यांच्याजवळ गोड बोला. मरणार्याजवळ गोड बोलण्यात काय अर्थ? तो तर मरणार आहे. जगणार्यांना आनंद द्या.’
‘तुम्हाला मरणाचं भय नाही वाटत? तुमच्या खिडकीसमोर मुद्दाम तो वधस्तंभ उभारला आहे, तुम्हाला सारखा दिसावा म्हणून, तुम्हाला वाईट नाही वाटत? तुम्ही तर त्या खिडकीतून हसत पाहात होतेत!’