‘आपण लग्न वगैरे नाही केले?’

‘अजून नाही.’

‘करायचे नाही का?’

‘तसे ठरलेले काही नाही.’

‘सृष्टीतील सुंदर वस्तू बघता बघता अनुरूप पत्नीही मिळायची!’

‘योगायोगाच्या त्या गोष्टी असतात.’

‘तुम्ही कोठे उतरला आहात?’

‘एका खाणावळीत.’

‘आमच्याकडे या ना! समुद्रावर फिरा. तुरूंगातील बागेत हिंडा. तुमच्यासारख्या सौदंर्यशोधकाची व्यवस्था लावणे म्हणजे पुण्य आहे.’

‘येईन तुमच्याकडे राहायला. तसे मला परके असे कोठेच वाटत नही. मी घरातून बाहेर पडलो तो जगाचा मित्र होण्यासाठी.’

‘तुम्ही एकदम माझ्या विनंतीस मान दिलात हयाबद्दल मी आभारी आहे. शिपाई तुमचे सामान आणतील. चला घरी.’

पहुणा घरच्यासारखा झाला. तो शिपायांना चिरीमिरी देई. सारे त्याच्यावर खूष असत. त्याला तुरुंगात सर्वत्र हिंडण्या-फिरण्याची मुभा होती. एके दिवशी तो बगीच्यात हिंडता-हिंडता कळीने लावलेल्या झाडाजवळ आला. ती पाने त्याने ओळखली. हाच तो प्रयोग असे त्याने जाणले.

पाहुणा त्या पानांकडे बघत होता व त्या पाहुण्याकडे गजांतून फुला पाहात होता. इतक्यात कळी तेथे आली.

‘काय पाहाता इतके टवकारून!’ तिने विचारले.

‘कळये, हा मनुष्य कोण?’

‘तो घरचा पाहुणा झाला आहे. म्हणतो, मी मोठा श्रीमंत जहागीरदार आहे. बाबांना त्यानं भूल घातली आहे. सार्‍या शिपायांजवळ गोड बोलतो. त्याला वाटेल तेथे फिरण्याची सदर परवानगी आहे.’

कळये, तो गृहस्थ आपल्याच झाडाशी बराच वेळ उभा आहे. मला भीती वाटते. हया माणसाचा संशय येतो. कदाचित त्या फुलझाडाला तो उपटून नेईल किंवा त्याचा नाश करील. तू असे कर, उद्या हळूच ते झाड खणून काढ. मुळांना धक्का नको लावू. नंतर तू ते झाड स्वत:च्या खेलीत एका मोठया कुंडीत लाव. खोलीला कुलूप लावून ठेव.’

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel