‘तुझा प्रियकर आहे. काय करायचा भाऊ, काय करायची आई? मी आता थोडाच वाचणार आहे? शक्ती संपत आली. झापड आली डोळयांवर. एकच तुझ्याजवळ मागणे. मरताना मला हात नको लावू. तुझा स्पर्श नको. कुळाला काडी लावणारी तू. हो माझ्या डोळयांआड, हो दूर.’

मधुरी दूर झाली. ती बाजूला रडत बसली; परंतु तिला आता रडूही येईना. ती केवळ शून्य दृष्टीने बघत होती. शेवटी भावाने प्राण सोडले. मधुरी जगात एकटी राहिली.

काही दिवस मधुरी घरातून बाहेर पडली नाही. विहिरीवरून पाणी आणण्यासाठी हळूच एकटी जाई. जगाचे दर्शन नको असे तिला वाटे. ती रडत बसे एके दिवशी ती विहिरीवर गेली तो तेथे बायका बोलत होत्या.

‘ऐकलंत का? ती चिमणी म्हणे पळून गेली.’

‘खरंच का?’

‘हो. सार्‍या गावात बभ्रा झाला आहे.’

‘का ग मधुरी, तुला आहे ना ती चिमणी माहीत?’

‘हो. आहे. ती का गेली?’

हो. आईबाप घरात आहेत. त्यांच्या नावाला काळिमा, अलिकडच्या मुली फारच हो अगोचर वागू लागल्या एकूण.’

‘जे जे ऐकावे ते ते थोडेच.’

त्या बायका गेल्या. मधुरी घागर घेऊन तेथेच उभी होती. घागर भरलेली होती. डोळयांच्या घागरीही भरून आल्या. चिमणीवर होणार्‍या टीकेत तिनेही भाग घेतला; परंतु तिला काय अधिकार? ती चिमणीसारखीच नव्हती का? ती चिमणी तर ही मैना. काय होता फरक? मधुरीचे मन तिला खात होते. शेवटी घागर घेऊन ती घरी आली. दारे लावून ती रडत बसली.

मधुरीची आई गेली, भाऊ गेला; परंतु प्रियकर होता. परंतु तो बरेच दिवसांत डोकावला नाही तोही का सोडून गेला? त्याने का फसविले? प्रेम म्हणजे क्षणभर शरीराची करमणूक असे का त्याला वाटले? नाही, असे तो करणार नाही. येईल, तो येईल. कसा दिसे, कसा हसे, त्याचे कसे चालणे, कसे बोलणे माझा राजा, येईल माझ्या प्राणांचा प्राण.

अशा आशेने मधुरी जगत होती. ती चरखा चालवी. तोंडाने गाणे म्हणे. प्रियकराच्या वर्णनाचे गाणे. प्रियकाराच्या प्रेमाचे गाणे. चरखा गूं गूं करी. तिच्या गाण्याला साथ देई. ‘येईल. गूं गूं. येईल प्रियकर येईल. गूं गूं’ असे जणू तो चरखाही बोले.

दिवसामागून दिवस चालले. मधुरी वाट पाहात होती. दिवसा ती दारे लावी. रात्र झाली, मध्यरात्र झाली की, उघडी टाकी. तो दिवसा यायला लाजत असेल रात्री येईल. दारे उघडी असू देत; परंतु तो आला नाही. कोठे गेला तो? तो का फसवील? मला सोडून जाईल? नाही. तो असे करणार नाही. तो माझ्याजवळ लग्न लावील. माझी अब्रू सांभाळील. मला प्रेम देईल. येईल. तो खात्रीने येईल. दु:खी कष्टी मधुरी. किती फिक्कट दिसते, परंतु आशेने आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel