फुला खोलीत उदासीन होऊन बसला होता. त्याचा प्रयोग नष्ट झाला होता. पाखरांचे घरटे नष्ट झाले होते. ती अंडी नष्ट झाली होती. ते जोडपे, ते निळे-निळे पक्षी येतील, घरटे नाही असे पाहून त्यंना काय वाटेल? त्यांची अंडी नाहीत, मी मात्र जिवंत आहे, हे पाहून त्यांना काय वाटेल? नर मादी येथे असती तर त्यांनी अंडी वाचविण्यासाठी स्वत:चे प्राणही दिले असते. चोचींनी त्यांनी लढाई केली असती; परंतु मी? मी फक्त डोळे मिटून घेतले. त्या पाखरांना मी काय सांगू? ती  पाखरे मला काय म्हणतील? आणि इतक्यात ती मादी खिडकीत आली, तो घरटे नाही. ती ची ची करू लागली. खोलीभर तिने फेर्‍या घातल्या. ची ची परंतु कोण उत्तर देणार? समुद्राकडे तोंड करून ती ची ची ओरडू लागली. ती का नराला हाक मारीत होती? तो पाहा नर आला. निळा-निळा नर. किती सुंदर दोघांनी टाहो फोडला. क्षणात खोलीकडे तोंडे करून ओरडत, क्षणात समुद्राकडे तोंडे करून ओरडत. फुलाच्या डोक्यावरुन त्यांनी घिरटया घातल्या, परंतु त्याला त्यांनी चोच मारली नाही. आपल्याला प्रेमाने भाकरी देणारा असे करणार नाही, असा त्यांना विश्वास होता.

ची ची करीत नर व मादी बसली होती. समुद्र गर्जना करीत होता. ‘शेवटी मरण, मरण, सर्वांना मरण,’ असे का त्या लाटा किनार्‍यावर आदळून सांगत होत्या? ओहोटी-भरती, जगणे-मरणे असाच हा संसार आहे असे का समुद्र सांगत होता? मरावयाचे असले म्हणून का जन्मलो नाही तो मरावे? जीवनाचा अनुभव घेऊन मग मरण आले तर त्याचे दु:ख नाही; परंतु असे अकाली मरण, अंडयातच मरण दु:खदायी आहे.

फुलाची भाकरी आली. ती पाखरे तेथेच होती. त्याने त्यांना आधी तुकडा दिला, परंतु ती घेत ना. त्यांनी तोंडे फिरविली. ची ची करीत ते जोडपे उडून गेले. फुलालाही त्या दिवशी जेवण गेले नाही. तो तसाच न खाता पाणी पिऊन खोलीत खाली मान घालून बसला होता.

दुपारची वेळ झाली. हातात पाटी घेऊन कळी आली हळुहळू फुलू पाहाणारी कळी आली. ते पाहा तिच्या तोंडावर शतरंग पसरत आहेत, परंतु रंग आले व गेले. फुलाची खाली झालेली मान पाहून कळी दु:खी झाली.

‘काय झाले आज?’ तिने विचारले.

‘माझा वेल कुस्करण्यात आला. खोलीतील पक्ष्यांचे घरटे पाडण्यात आले. अंडी फुटली. पाखरे ची ची करीत बसली. तुकडा न घेता निघून गेली. कळे, कसा मी हसू? हया लहानशा खोलीतील एवढासाही आनंद देवाला बघवला नाही का?’

‘ज्या पुस्तकाने तुम्हाला मरणासही हसत-हसत मिठी मारायला शिकविले, त्या पुस्तकाने निराशेत, दु:खात शांत ठेवायला नाही का शिकविले? रडू नका तुमचा अपराध नाही. पाखरे पुन्हा आली तर पुन्हा त्यांना प्रेम द्या.’

‘पुन्हा कशाला प्रेम देऊ? पुन्हा येथे ती घरटे बांधतील, अंडी घालतील. पुन्हा घर पाडण्यात येईल, अंडी फोडण्यात येतील. नको. त्या पाखरांना आता मी प्रेम देणार नाही. ती आली तर त्यांना घालवीन. मलाच येथे एकटयाला मरू दे. त्यांच्या अंडयांना का मरण?’

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel