‘आईला देऊ हे औषध?’ मधुरीने विचारले ‘दे. पेलाभर पाण्यात हया बाटलीतील  चमचा दोन चमचे औषध घाल. गाढ झोप लागेल. खोकला उसळणार नाही. तू येशील ना रात्री?’

‘हो.’

मधुरी औषधाची बाटली घेऊन गेली.

‘आज रात्री गंमत आहे एकूण!’ सैतान म्हणाला.

‘चूप. खबरदार असे काही बोलशील तर!’ माधव चिडून बोलला.

रात्र झाली. मधुरीचा भाऊ घोरत होता. तिची आई खोकत होती.

‘आई, तुझ्यासाठी आज औषध आणले आहे, विसरले मी सांगायला. विसरले मी द्यायला. घेतेस का?’

‘कोणी दिले बाळ औषध?

‘एका उदार माणसाने. त्या औषधाने दमा जातो, खोकला थांबतो. गाढ झोप लागते.’

‘आता कायमचीच झोप लागू दे; परंतु तुझे एकदा लग्न झाले असते म्हणजे; बरे; परंतु नसेल माझ्या नशिबी तुमचा संसार पाहण्याचे. आण औषध. घेऊ दे घोट. वाटेल बरे तर ठीक. जरा डोळा तरी लागेल.’

मधुरीने फुलपात्र घेतले. त्यात तिने दोन चमचे औषध घातले. मग त्यात पाणी घालून चमच्याने ढवळून तिने आईच्या हाती दिले. आई औषध प्यायली.

‘पड आता. झोप लागेल.’ मधुरी म्हणाली.

‘तूही पड. दिवसभर तुला काम करावे लागते. धुणी धुवावी लागतात. दळण दळावे लागते. नीज हो मधू. ये.’ आई प्रेमाने म्हणाली.

आईला झोप केव्हा लागते हयाची वाट पाहात मधुरी अंथरूणावर पडली. थोडया वेळाने आई खरोखरच घोरू लागली. भाऊही घोरत होता. मधुरी हळूच उठली. तिने दाराची कडी अलगद काढली. ती बाहेर पडली. आपल्या प्रियकराला भेटायला गेली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel