‘उघड डोळे,’ सैतान म्हणाला. माधवने डोळे उघडले. कोठे आले होते ते? तेथे एक मोठा दिवाणखाना होता. तेथे खाणे-पिणे चालले होते. मोठी मेजवानी होती. कोणी लाडू खात होते, कोणी जिलेबी खात होते; कोणी चिवडयावर हात मारला, तर कोणी भज्यांवर खूष होते. कोणी फळांचे भोक्ते होते, ते द्राक्षांच्या घडांवर तुटून पडत होते. काहींना संत्री, मोसंबी आवडली. हे काय? एकदम अंधारसा झाला? सैतानाने गंमत केली. दिवे विझले. लोक एकमेकांच्या हातांतील ओढू लागले. कोणाला काही दिसेना. द्राक्षे म्हणून ओढायला जात, तो कोणाच्या तोंडाला हात लागे. फजिती झाली. पुन्हा प्रकाश पडला. सारे हसू लागले. पुन्हा खाण्यावर घसरले. आता कोणी मद्याकडे वळले. दारूचे पेले रिकामे होऊ लागले. दारू पिऊन प्रेमाला भरती आली. एकमेकांच्या गळयांत पडू लागले. ‘तू अगदी माझा. अगदी माझा.’ असे म्हणू लागले; परंतु प्रेमातून कलह जन्मला. मारामारी सुरू झाली. ‘चप्पल बघ पायातली. देईन एक ठेवून. बदमाष. माझे घेतो.’ असे शब्द सुरू झाले; परंतु शेवटी भान नाहीसे झाले. सारे घेरी येऊन पडले. किळसवाणा प्रकार.
‘अरे खा ना ते. नुसता बघत काय उभा राहिलास?’ सैतान म्हणाला.
‘मला नाही खाण्यात मौज वाटत. का नुसते खात बसायचे? हे पाहा कसे लोळत पडले आहेत. मी का असा लोळू? छे, मला दुसरीकडे ने. ही सारी डुकरे आहेत. खाण्यासाठी हपापलेली. माधव निराळा आहे. हं, ने दुसरीकडे.’ माधव चिडून म्हणाला.
‘मीट डोळे, मीट डोळे.’ सैतान म्हणाला.
माधवाने डोळे मिटले. हवेतून दोघे जात होते. सैतानाने डोळे उघडायला सांगितले. तो कोण दिसले समोर? पिशाच्चलोकी ते आले होते. जखिणी, डाकिणी, समंध, भुते सर्वांची तेथे गर्दी होती. अक्राळ-विक्राळ भेसूर रूपे. डाकिणींचे केस सोडलेले होते. कडकड कडकड दात खात त्या डाकिणी आल्या. त्यांची नखे म्हणजे जणू सुया. त्यांनी माधवाला मिठी मारली.
‘हे काय? बोचल्या सुया. सोडा मला. मला मला मारू नका, खाऊ नका.’ माधव म्हणला.