वधस्तंभाजवळ जाऊन राजा उभा राहिला. राजाला पाहाताच सर्वांची हृदये उचंबळली. सूडबुध्दी मावळली. हृदये निराळे झाले. राजा बोलू लागला. सर्वत्र शांतता होती.

‘माझ्या प्रिय प्रजाजनांनो, मी वेळेवर आलो. तुमच्या हातून पाप होऊ नये म्हणून देवाने मला वेळेवर आणले. प्रजेच्या पापाची जबाबदारी राजाच्या शिरावर असते. माझे दोन प्रधान गेले. त्यांची चौकशी केली गेली असती तर ते निर्दोष ठरते. माझे जणू दोन डोळे गेले. दोन हात गेले. कोणी तरी काही बातमी उठवतो. तुम्ही ती खरी मानता. असे चंचल व अधीर नका होऊ सत्यासत्याची निवड करायला शिका. विचारी प्रजेचा, संयमी प्रजेचा मला राजा होऊ दे. आपल्या देशाची जगात अपकिर्ती व्हावी असे तुम्हाला वाटते का? हया देशातील लोक वाटेल तेव्हा खवळतात, एखाद्याला विनाचौकशी हालहाल करून ठार करतात. हया देशात न्यायनीती नाही असे जगाने म्हणावे? आपल्या देशाला कमीपणा येईल असे कोणीही कधीही वर्तन करता कामा नये. देशाचा मान वाढवा, किर्ती वाढवा, गौरव वाढवा. तुमच्या देशाचे उदाहरण इतरांना होऊ दे. तुमच्या देशाकडे सारी दुनिया कौतुकाने बोट दाखवील असे वागा.

‘हया अपराध्याला येथे उभे करण्यात आले आहे. पाहा, तो कसा शांतपणे उभा आहे! पाप असे उभे राहून शकत नही. हा मनुष्य अपराधी आहे का महात्मा आहे? आपण चौकशी करू. जे कागदपत्र ह्याच्या घरी सापडले. ते मी वाचीत आहे इतरही सारा पुरावा मी बघत आहे. जर हा मनुष्य अपराधी ठरला तर त्याला आपण शासन करू. सूड म्हणून नाही, न्यायासाठी म्हणून सूडबुध्दी माणसाला शोभत नाही. आपण माणुसकी वाढवू या. फाशीची शिक्षा रद्द करण्यात येत आहे. आरोपीला तुरुंगात घेऊन जा. पुढे चौकशी करू. आपण न्यायाने वागू या. मनुष्यधर्माला जागरूक राहू या. परमेश्वर सर्वांना सद्‍बुद्धी देवो.’

राजाच्या भाषणाचा विलक्षण परिणाम झाला. ‘किती न्यायी राजा, खरा राजा, राजा चिरायू होवो! आपण माणसे होऊ या. खरेच सूड वाईट. देशाची किर्ती वाढवू या. उगीच मारले ते प्रधान; परंतु राजा आला. आता सारे ठीक होईल. तो मार्ग दाखवील. किती थोर मनाचा राजा. राजाचा जयजयकार असो!’ असे लोक म्हणू लागले.

फुलाला पुन्हा तुरूंगात नेण्यात आले. लोक राजाची स्तुती करीत घरोघरी गेले. मांग घरी गेला. तो गब्रु मात्र त्या वधस्तंभाजवळ मेल्याप्रमाणे बसला होता.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel