‘सांगू?’

‘अरे, तिला फाशीची शिक्षा झाली आहे.’

‘तिला म्हणजे कोणाला?

‘तुम्ही माणसे फार विसराळू, अरे, ती.’

‘ती म्हणजे कोण?’

‘जिच्याशी तू माकडचेष्टा केल्यास, प्रेम प्रेम करून जिला बिलगलास मिठया मारल्यास....’

‘कोण? मधुरी?’

‘हो.’

‘का बरे?’

‘तिच्यावर तीन आरोप आहेत.’

‘कोणते बा?’

‘आईला विष घालून मारल्याचा; प्रियकराकडून भावाला मारविल्याचा आणि स्वत:चे मूल गुप्तपणे नदीत सोडून दिल्याचा.’

‘अरेरे! काही करता नाही येणार?’

‘उपाय नाही.’

‘मधुरीला वाचवलेच पाहिजे.

‘ती तुरूंगात आहे. दारे बंद आहेत. सर्वत्र पहारे आहेत.’

‘मला सबबी सांगू नकोस. मधुरी वाचलीच पाहिजे. मृत्यूच्या दाढेतून तिला ओढून काढले पाहिजे. उपाय सांग, मार्ग दाखव.’

‘तुझी इच्छा पूर्ण करण्याचे मी वचन दिले आहे. जा. त्या तुरूंगात जा. सारी कुलपे गळून पडतील. पहारेकरी घोरत पडतील. तू आज जा. तिला आण सोडवून. पहाटेचा कोंबडा आरवण्यापूर्वी बाहेर या. कोंबडा आरवेपर्यत माझी सत्ता. मग नाही. कोंबडा आरवल्यावरही जर आत राहिलास तर तूही पकडला जाशील. ध्यानात धर. जा. लौकरच रात्र पडेल.’

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel