फोन: 9987959084
असे म्हणतात की एक चांगली कलाकृती आपले सुदैव घेऊन जन्माला येते आणि मग त्या सुदैवाप्रमाणे आपला प्रवास करते, आपला सन्मान मिळवते. २४ डिसेंबर १९६७ ला गिरगावच्या साहित्य संघ मंदिर मध्ये कट्यार काळजात घुसली या पुरुषोत्तम दारव्हेकर लिखित संगीतमय नाटकाचा पहिला प्रयोग झाला. या नाटकाला जे प्रेक्षक आले होते त्यांनी ठरवले होते की या नाटकाचा प्रयोग रात्री संपला की चर्नीरोड स्टेशनवरून शेवटची ट्रेन पकडून घरी जावे. पण नाटकाच्या प्रत्येक गीताला इतकी दाद आणि इतका वन्स मोअर भेटला की हा नाटकाचा प्रयोग बघणारे सकाळची पहिली ट्रेन पकडून घरी गेले. पुढे या नाटकाने हाऊसफुलचा बोर्ड काही बाजूला सारला नाही. पुढे हे नाटक सुबोध भावेने दिग्दर्शित करून पुन्हा रंगभूमीवर आणले. त्यात वसंतराव देशपांडेची भूमिका त्याचा नातू व सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांनी केली होती. पुन्हा हे नाटक प्रेक्षकाच्या पसंती पडले. २०१५ मध्ये सुबोध भावेने कट्यार काळजात घुसली ही कलाकृती चित्रपट स्वरूपात आणली आणि त्याची सुपरहिट चित्रपटात गणती झाली. या चित्रपटातील गाण्यासाठी पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा शिष्य महेश काळे यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दुसरी काही उदाहरणे म्हणजे रत्नाकर मतकरी लिखित नाटक अलबत्या गलबत्या झी मराठीने चिन्मय मांडलेकरच्या दिग्दर्शनाने पुन्हा रंगभूमीवर आणले आणि प्रेक्षकांची मने जिंकली. शोले, दिवार, हम आपके है कौन यासारखे अनेक चित्रपट प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर आवडलेच पण आज हे चित्रपट लोक आनंदाने आणि उत्साहाने वेगवेगळ्या दूरदर्शन वाहिन्यांवर पाहतात. अशी अनेक उदाहरणे आहेत की कलाकृती वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या दशकात, वेगवेगळ्या पिढीसमोर आल्या पण त्या यश, सन्मान, वैभव यांना कधीच मुकल्या नाहीत.
पण आज मला यशस्वी नाही तर बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरलेल्या उत्कृष्ट चित्रपटाबद्दल बोलायचे आहे. नव्वदीच्या दशकात आपल्या तिन्ही खान नायक मंडळीनी आपल्या रोमँटिक चित्रपटांनी आपल्या बहुजन समाजावर गारूड घातले होते. एकविसाव्या शतकात १५ जून २००१ साली लगान आणि गदर एकाच दिवशी रिलीज झाले आणि दोन्ही चित्रपटांनी हिंदी चित्रपट सृष्टीचा चेहरा मोहरा बदलून टाकला. पूर्ण बॉलिवूडवर अचानक देशभक्ती चित्रपटांची लाट आली. देशभक्ती हा चालणारा फॉर्म्युला समजून खूप चित्रपट देशभक्तीचे अतिरंजित वर्णन करून सातव्या महिन्यात जन्म घेणाऱ्या प्री म्यचुर (Premature) बाळा सारखे जन्माला आले. अर्थात ते बॉक्स ऑफिस वर जोरात आदळले.
या सगळ्या लगीनघाई मध्ये एके दिवशी टिव्हीवर एक टीझर आला. फ्रॉम द डायरेक्टर ऑफ लगान आशुतोष गोवारीकर. म्युझिक बाय अे आर रेहमान असे त्या टीझर मध्ये सुरवातीला दिग्गजांची नावे नमूद केली होती. या टीझर मध्ये त्या चित्रपटाचा नायक वाहतूक वाहनांनी जीवनाचा प्रवास करताना दिसतो. कधी ट्रीपल सीटने स्कूटरने, कधी शिडाच्या होडीत, कधी सर्व सोयी सुविधा उपलब्ध असलेल्या करमणूक वाहन (Caravan) मध्ये, कधी पंसेंजर ट्रेन मध्ये, तर कधी बिझिनेस क्लासच्या सीट मध्ये बसलेल्या फ्लाईट मध्ये दिसतो. अशा प्रकारे या टीझर मधून चित्रपटाचे वेगळेपण जाणून येते. पुढे टप्या टप्याने चित्रपटाचे ट्रेलर, गाणी, डायलॉग ट्रेलर चित्रपट प्रदशनापूर्वी येत गेले. अखेर हा चित्रपट १७ डिसेंबर २००४ साली प्रदर्शित झाला. चांगल्या ओपनिंगनंतर हा चित्रपट विरत गेला आणि बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट अखेर अयशस्वी ठरला.
स्वदेस हा चित्रपट शाहरुख खान अभिनित मोहन भार्गव नावाच्या तरुणांच्या अवती भोवती फिरत असतो. नासा मध्ये प्रोजेक्ट मॅनेजर असलेल्या या अनिवासी भारतीय मोहनला अचानक आपल्या लहानपणी आपली देखभाल करणाऱ्या कावेरी अम्माची आठवण येते आणि ती कशी असेल, वृद्धाकाळात कोणत्या अवस्थेत असेल या चिंतेने तो व्यथित होतो. या चिंतेखातिर तो भारताच्या नकाशावर चरणपुर हे गाव शोधत शोधत तो भारतातील त्या छोट्याशा गावात पोहचतो. या गावी बऱ्याच गैरसोयी असतील म्हणून तो करमणूक वाहन (Caravan) घेऊन कावेरी अम्माकडे पोहचतो. या गावात काही दिवस राहिल्यावर त्याला समजते की या गावात बऱ्याच समस्या , गैरसोयी आहेत तरी गावकरी त्याकडे पाठ फिरवून बसले आहेत. अशाप्रकारे मोहनचे प्रगतिशील विचार आणि गावातल्या पंचाच्या जुन्या खुळचट परंपरा यात मतभेद सुरू होतात. या शब्दिक युध्दात गीता मोहन च्या लक्षात आणून देते की वाचाळ ब्रह्मज्ञानापेक्षा कृती महत्वाची. मग मोहन गावकऱ्यांच्या मदतीने गावात विजेचा प्रश्न सोडवतो आणि नेहमी साठी भारतात स्थायिक होतो. अशी ४-५ ओळींची एका रेषेत जाणारी सरळ कथा आहे स्वदेसची.
स्वदेस मधील मोहन हे पात्र काहीसे महात्मा गांधीशी मिळते जुळते. महात्मा गांधी साऊथ आफ्रिका मध्ये आपली वकिली करून आरामात जीवन जगू शकले असते. पण तरी ते भारतात आले. पसेंजर ट्रेन मधून प्रवास करत त्यांनी पूर्ण भारत पालथा घातला. भारतातील गरिबी, पारतंत्र्य, समस्या, गैरसोयी पाहून त्यांनी भारतात स्थायिक होऊन भारताची सेवा करण्याचे ठरविले. जे महात्मा गांधींनी भारतात पाहिले ते मोहनने चरणपुर मध्ये पाहिले आणि दोंघानी कृतीला महत्व दिले. या कृतीतून पुढे बदल घडला, क्रांती घडली. गांधीजीचे ही नाव मोहन दास होते तेही मोहनला मिळतेजुळते ठरते. असा मोहन भार्गव जेव्हा भारतातील खेड्यात येतो तेव्हा त्यास खूप काही असुविधा दिसतात. ग्रामपंचायतीच्या शाळेतील गणसंख्या तुलनेने खूपच कमी असते. त्यात मुलींचा सहभाग वाजवीपेक्षा कमी असतो. तेव्हा मोहन घराघरात जाऊन शिक्षणाचे महत्व गावकऱ्यांना सांगतो. कुंभाराचा मुलगा कुंभारच बनेल मग त्याला शिक्षणाची काय आवश्यकता या मानसिकतेत जगणाऱ्या गावकऱ्यांना मोहन सांगतो की हाच कुंभाराचा मुलगा शिकला तर तो आपली कला जगात कुठेही घेऊन जाऊ शकतो. त्याच्या कलेला योग्य तो भाव मिळून तो सुखी जीवन जगू शकतो. हे शक्य होऊ शकते ते फक्त शिक्षणामुळे. गावातील मुख्य पंचाची नात शाळेत येत नसते ते फक्त ती मुलगी आहे म्हणून. तेव्हा हाच मोहन सांगतो की "लडकीयोके हाथ सिर्फ मेहंदी के लिये नही होते. शिक्षा से वो आत्मनिर्भर बनती है" गावातील अस्पृश्यमुले विटाळ होईल म्हणून शाळेत येत नव्हती त्यांचे मन मोहन वळवतो. हळूहळू शाळेतील संख्या वाढते. मुली शाळेत जाऊ लागतात. जातीजमातीला आळा घालून विद्यार्थी शाळेच्या एका छताखाली शिक्षण घेऊ लागतात.
हरिदास नावाच्या शेतकऱ्याकडे त्याला दिलेल्या जमिनीचे पैसे मागायला गेलेला मोहन जेव्हा तिथली प्रतिकूल परिस्थिती पाहतो, तिथले भीषण दारिद्र्य पाहतो तेव्हा स्वतच्या खिशातले पैसे काढून हरिदासला मदत म्हणून देतो. हरिदास जेव्हा म्हणतो की "मेरे आसुओं का स्वाद मेरे मन का नमकही समझता है" तेव्हा आपल्या डोळ्यांच्या कडा ओल्या होतात. हरिदास कडून परतत असताना मोहन पूर्णपणे हादरून गेलेला असतो. अशातच भर उन्हात त्याच्या ट्रेन च्या खिडकी समोर २५ पैसेला पाणी विकणारा एक लहान मुलगा येतो. मिनरल वॉटर शिवाय पाणी न पिणारा मोहन ते २५ पैसे चे पाणी त्या मुलाला मदत म्हणून ते पाणी पितो आणि उरलेले पैसे न घेता त्याची ट्रेन वेग घेते. ट्रेन वेग घेते आणि मोहनचे विचारचक्र वेग घेऊ लागते. त्यांचे डोळे पाणावले असतात. हा सीन माझा वैयक्तिक आवडता सीन आहे या चित्रपटामधला कारण हे दृश्य माझ्या अहंकाराला , माझ्या मोहाला जमीनदोस्त करते.
चित्रपट जेव्हा शेवटच्या टप्प्यात प्रवेश करतो तेव्हा मोहन सर्व पंच आणि गावकऱ्यांना सांगतो की "मै ये नाही मानता हू की हमारा देश दुनिया का सबसे महान देश है पर हमारे मे उतनी काबलियत है की एक दिन दुनिया का महान देश बन सकता है" या सर्व प्रकारामुळे गावकरी मोहन च्या मागे आवडीने किंवा नावडीने मागे उभे राहतात आणि गावातील वीज समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू होतात. हळूहळू पूर्ण गाव या प्रकल्पात सहभागी होते आणि एक दिवस तो सोनेरी दिवस उजाडतो जेव्हा गावात स्वावलंबनाने वीज निर्मिती प्रकल्प उभारतो.
यात मोहन हा फक्त नायक किंवा अनिवासी भारतीय नाही तर तुमच्या आमच्यामध्ये लपलेला सुप्त विचार आहे. जे वर्षानुवर्षे चालत आले ते योग्यच असेल असे जरुरी नाही. जुने ते सोने ही म्हण सर्वठिकाणी योग्यच ठरते असे नाही. एखादी गोष्ट जर आता प्रभावी वाटत असेल तरी काळ हा असा इलमी जादूगार आहे की काळाच्या चक्रात ती गोष्ट काळाच्या पडद्याआड होते. त्यामुळे जाती व्यवस्था यासारख्या पुरातन गोष्टींना आता छेद देऊन समाजभान, देशाभिमान यासारखे गुण अंगीकृत केले पाहिजे. कारण मला असे वाटते की मी जेव्हा माझ्या देशाचे राष्ट्रगीत गातो तेव्हा माझ्या अंगावर शहारा येतो. तो शहारा बाजारातील औषध, टॉनिक घेऊन येत नाही. तर तो शहारा आपल्यात असलेल्या देशाभिमानचे प्रतीक असते. असा शहारा आपल्याला पगार झाल्यावर, देवळात गेल्यावर, आनंद झाल्यावर कधीच येत नाही. घरचे लाईट बिल जास्त येते म्हणून ऑफिस मध्ये मोबाईल चार्ज करणारे आपण सामान्य लोक कधी कधी फेसबुक ट्विटरवर स्वतः ला असामान्य समजून देश चालवतो. कधी देशाच्या पंतप्रधानाला चुकीचे ठरवतो तर कधी देशातील शेतकऱ्याला. कधी विज्ञान आणि देव-धर्म यात तुंबळ युद्ध घडवून स्वतः आराम खुर्चीवर बसून आनंद घेतो. पण ही हुशारी सर्व सोशलमीडिया वर दाखवतो. प्रत्यक्षात फक्त ९ ते ५ चा जॉब करून मराठी माणूस उद्योग धंद्यात मागे का यावर लेक्चर द्यायला तयार असतो. आता आपल्याला स्वतः कृतीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आपले प्रोब्लेम सोडवण्यासाठी ७० च्या दशकातील सिनेमासारखे अँग्री यंग मॅन किंवा वुमन कोणी येणार नाही. आपल्या समस्या आता आपणच सोडवल्या पाहिजे. प्रत्येकाने स्वतः मधला क्रियाशील नायक बाहेर काढून स्वतःचा खारीचा वाटा उचलावा लागेल. आमिर खान सारखा माणूस आज पाणी फाऊंडेशन च्या मदतीने महाराष्ट्र पाणीदार करण्याचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करत आहे. याच आमिर खानच्या पत्नीने मीडिया समोर एक चुकीचे वाक्य बोलले आणि त्यावेळी सोशल मीडियावर त्याला पाकिस्तानी म्हणून पाकिस्तानात रवानगी करण्याचे मेसेज फिरू लागले. हे सर्व भयंकर आहे. नाना पाटेकर यांनी आज नाम फाऊंडेशन गावा गावात पोहचवली आहे. बाबा आमटे चा वसा प्रकाश आमटे सातत्यपूर्ण पुढे नेत आहे. आयुष्यभर अंधश्रध्दा विरुद्ध लढणारे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची काही माथेफिरू नी हत्या केली. वाटले की ही चळवळ इथेच संपली पण अंधश्रद्धा निर्मुलन चळवळ अधिक तीव्र झाली. ही अशी माणसे पाहिल्यावर, ऐकल्यावर वाटते की या सगळ्या केओस (chaos) मध्ये ब्राईटर (Brighter) दिशा अजुन शिल्लक आहे. आपल्या प्रत्येकाला आपल्या समाज कल्याणचे भान असते, जन जागृतीची जाणीव असते. पण त्यासाठी आपण आपल्या आतला तवा गरम ठेवला पाहिजे, आपल्या आतली ज्योत तेवत ठेवली पाहिजे. हा तवा गरम ठेवण्याचे काम, ज्योत तेवत ठेवण्याचे काम कधी एखादे पुस्तक करते, तर कधी एखाद्या थोर व्यक्तींचे आत्मचरित्र करते, कधी सावरकरांची कविता करते, तर कधी टिळक आगरकरांचे लेख. पण या सगळ्या बरोबर हेच काम माझ्यासाठी स्वदेस सुद्धा करतो जो माझ्यातला अहंकार गिळून परत मला जमिनीवर आणतो. मातीत जन्म घेणाऱ्या माणसाला आपल्या मातीबद्दल विचार करायला भाग पाडतो, प्रोत्साहित करतो.
"अपने ही पानी मे पिघल जाना ये किसी भी बर्फ का मुकद्दर होता है"
लेखणी : निखिल शेलार
9987959084