फोन: 9011082299
माधव राघव प्रकाशनचे इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझात आयोजन.
गझलेने कवितेला समृद्ध दालन बहाल केले. सादरीकरणाने उठून येणारी कविता व गझल बहारदार असतात, असे प्रतिपादन ज्येष्ठ गझलकार आनंद पेंढारकर यांनी केले, ताळगाव येथील माधव राघव प्रकाशनतर्फे येथील इन्स्टिट्यूट मिनेझिसच्या सहकार्याने ब्रागांझाच्या परिषद कक्षात लिहिणाऱ्या हातांचा उत्सव हे कविता आणि गझल संमेलन घेण्यात आले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी मुंबई येथील कवी गझलकार आनंद पेंढारकर होते. त्यांनी गोव्यातील कवितांना चांगली दाद दिली. ज्येष्ठ कवयित्री व साहित्यिका मीरा यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन झाले. त्यांनी या उपक्रमाची प्रशंसा करून ज्येष्ठ दिवंगत साहित्यिका माधवी देसाई यांचे स्मरण केले. यावेळी पत्रकार प्रभाकर ढगे यांनी कविता व या संमेलनावर भाष्य केले. या संमेलनात प्रस्थापित आणि नवोदितांनी सहभाग घेतला.
संमेलन तरुणाईने गाजवले:
संमेलनाध्यक्ष पेंढारकर यांनी तरन्नुममध्ये गझलची महती सांगणारी गझल पेश केली. कवितेचं बेट या त्यांनी सादर केलेल्या कवितेने रसिकांना विचारप्रवण केले. तरुण कवी विठ्ठल शेळके याने धरणावर आधारित कविता सादर केली. धरणासाठी गाव आणि जंगल कसे उद्ध्वस्त झाले त्याची कर्मकहाणी त्याने सादर केली.
ज्येष्ठ कवी माधव सटवाणी यांनी तोलतो मी वीज ही बाहूत आता ही गझल सादर करून रसिकांची दाद मिळवली. दया मित्रगोत्री यांनी दुःख सहन करण्यासाठी चिमटीत घेऊन त्याला तंबाखूसारखे दाढेखाली ठेवून द्यावे अशी वेगळ्या धर्तीची कविता सादर केली. तुळशीदास काणकोणकर यांनी गाऊन कविता पेश केली. मेघना कुरुंदवाडकर, छाया कुलकर्णी, अंजली आमोणकर यांनी मुक्तछंदांतील सरस कविता सादर केल्या. लक्ष्मण पित्रे यांनी नेहमीप्रमाणे विडंबन कविता सादर करून चिदंबरम प्रकरणावर बोचक चिमटे काढले व रसिकांना हसवता हसवता अंतर्मुख केले. उदय ताम्हणकर यांनी अस्सा हा पाऊस यावा ही गेयता असलेली कविता ठसक्यात गाऊन रसिकांची दाद मिळविली. शुभदा च्यारी विद्या शिकेरकर यांच्या कविताही रसिकांनी उचलून धरल्या.
प्रकाश क्षीरसागर यांनी सोसतो मी यातनांना सल तयाचा भावनांना ।। बघ दुरावा वाढलेला । मी इगो कुरवाळताना ही हृद्य गझल पेश केली. प्रा. वसंत बापट यांनी शब्दचि आमुच्या जीविचे जीवन म्हणणाऱ्या तुकोबालाच धारेवर धरले. विश्वनाथ जोशी यांनी संगीताच्या साथीने बहारदार गझल पेश केली.
मंगेश काळे यांनी आपल्या नेहमीच्या खास शैलीत मुक्तछंदातील कविता पेश करून रसिकांचे लक्ष वेधून घेतले. चित्रा क्षीरसागर यांनी उन्हाळ्याला जाब विचारून तुझे आभाळ तुझे होवो, तुझे उन्हाळे जळून जावोत अशी स्त्रीशक्तीला आवाहन कऱणारी कविता पेश केली.
दयाराम पाडलोस्कर यांच्या कवितेत ग्रामीण बाज आणि ठसका होता. नूतन दाभोळकर आणि विंदा नाईक यांनी श्रावणावरील कविता गाऊन सादर करून श्रावणातील वातावरणाची निर्मिती केली. कविता बोरकर आणि मीरा यांच्या कवितेने रसिक अंतर्मुख झाले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभदा च्यारी यांनी केले.