साहित्य - १) १ वाटी सपाट चणाडाळीचे पिठ ( थोडे रवाळ असेल तर उत्तम )
२) १ टे.स्पून कणिक ( रवाळ उत्तम )
३) २ टे.स्पून तूप
४) २॥वाटी घट्ट नारळाचे दूध
५) १ वाटी किसलेला गुळ
६) १ टी.स्पून वेलची,जायफळ पूड
७) १ टे.स्पून बदाम,काजू,पिस्ता काप ( ऐच्छीक )
८) १ टे.स्पून घरची दूधावरची साय
९) १ टे.स्पून दूधात भिजविलेले केशर
१०) चिमूटभर मीठ
कृती - प्रथम बेसन व कणिकेच पिठ एकत्र करून जाड बुडाच्या पसरट पितळी किंवा इतर कुठल्याही भांड्यात घेऊन ( शक्यतोवर नॉनस्टीक भांड घ्यावं म्हणजे बुडाला करपत नाही.) त्यात १ टे.स्पून तूप टाकून मिडीयम फ्लेम वर खमंग भाजून घ्यावे.जरा तांबूस रंग व खरपूस वास आल्यावर ताटात पसरून पिठ गार होऊ द्यावे.त्यानंतर त्याच भांड्यात नारळाचे दूध,गुळ,साय,चिमुटभर मीठ,गार झालेले पिठ हळुं,हळुं टाकून हाताने मिश्रण एकजीव करून घ्यावे.गुठळी राहता कामा नये.आवश्यक वाटले तर मिक्सर मधे फिरवून घ्यावे. केशर,वेलचीपूड घालून मिश्रणाचे भांडे गॅसवर मिडीम फ्लेमला ठेवून सतत बुडातून ढवळत रहावे.दहा,पंधरा मिनीटांत मिश्रण घट्ट होत जाते. त्यावर सुकामेव्याचे काप पसरून आणि मिश्रणाच्या कडेनी १ टे. स्पून तूप सोडून,मंद फ्लेमवर वाफेला ठेवावे.भांड्यावर घट्ट झांकण ठेवावे.म्हणजे वाफ चांगली येते.साधे भांडे असेल तर तवा गॅसवर ठेऊन त्यावर भांडे ठेवावे व झाकणा वर वरंवटा किंवा इतर जड वस्तु ठेवावी.म्हणजे बुडाला फार करपत नाही.खालून थोडे खरपूस झालेल चवीला स्वादिष्ट व सुरमट लागत.साधारण २५ / ३० मिनीटांत छान वाफ येऊन वास खमंग येऊ लागतो.निनाव झाल्याची चाचणी म्हणजे झांकण उघडून पाहील्यावर तकाकी आलेली दिसते.व त्यात कालथा उभा घातल्यावर त्याला मिश्रण चिकटत नाही.नंतर थंड झाल्यावर त्याचे चौकोनी काप करून,प्लेट मधे खुटखुटीत झालेल्या वड्या सुशोभित कराव्यात.
टीप - भांड पसरट घ्यावे.म्हणजे वड्या पातळ पडतात.हा पदार्थ सी.के.पी लोकांकडे श्रावण अमावस्येला भाद्रपदाच्या आधल्या दिवशी नेमाने केला जातो.त्या दिवसाला. दाटा हे नाव आहे.