माझे वडील कोकणातले, आई लालबागची, बायको गिरगांवची, माझा दादा काही वर्षे सार्वजनिक गणेशोत्सव मध्ये पदाधिकारी. अशाप्रकारे मी गणपतीप्रभावी स्थळानीं आणि सश्रद्ध व्यक्तींनी वेढलेलो... त्यामुळे मला कितीही अंधश्रद्धेविरुध्द लढण्याची उर्मी आली तरी गणपतीमधील तल्लीनता काही कमी झाली नाही.
गणपती हा चौदा विद्या आणि चौसष्ठ कलांचा अधिपती. आजच्या काळात सांगायचे झाले तर Ganesha is Educated God compare than any other. गणपती कडे नेहमी आपण ज्ञान, बुध्दी, चातुर्य या गुणांसाठी प्रामुख्याने आवर्जून पाहतो. आजची शाळेतील स्कॉलरशिपची परीक्षा असो किंवा निरनिराळ्या स्पर्धात्मक परीक्षा असो किंवा आयएएस / आयपीएस सारख्या शून्य पूर्णांक मध्ये निकाल लागणाऱ्या परीक्षा असो या सगळ्या परीक्षांमध्ये गणपतीने नक्कीच अव्वल स्थान प्राप्त केले असते. आपल्या पुराण कथेत सुद्धा बऱ्याच कथेत नमूद केले आहे की देव जेव्हा संकटात असायचे तेव्हा ते मदतीसाठी किंवा सल्ल्यासाठी गणपतीकडे येत असत. आजकाल लोक प्रॉब्लेम मध्ये असतील तर बाबा , बुवा कडे धाव घेतात.
मी लहानपणीच गणपतीच्या प्रेमात पडलो. ना मला कोणी गणपतीच्या शौर्यकथा सांगितल्या , ना कोणी मला गणपतीच्या आरत्या पाठ करायला सांगितल्या. पण गणपतीचे लोभस रूप पाहून मी लहानपणीच त्याला आपले मानले. तो जवळचा आहे म्हणून तर आपण त्याला तो, तू, हा असे एकेरी शब्द वापरतो. मला लहानपणीचा एक किस्सा अजुन चांगला आठवतोय. मी त्यावेळी तिसरीमध्ये होतो. गणेशोत्सवचे दिवस जवळ येऊन ठेपले होते. एकदा मी खेळत असताना बाजूने इवलेशे उंदरांचे पिल्लू दुडूदुडू धावत होते. अचानक माझ्यातली सुप्त अवस्थेतील Saved Power तप्त अवस्थेत कन्व्हर्ट झाली. मी जवळचा दगड घेतला आणि जोरात त्या पिल्लाच्या दिशेने हाणला. दुर्दैवाने तो इवलासा जीव तिथल्या तिथे गारद झाला. त्यावेळी अभिनव बिंद्राला जितका आपल्या नेमबाजी वर अभिमान वाटला नसेल तितका मला त्या वेळी स्वतचा अभिमान वाटला. पण जेव्हा आठवले की उंदीर हे गणपतीचे वाहन आहे तेव्हा खूप भीती वाटली. काही दिवसांनी जेव्हा गणेशोत्सव सुरू झाला तेव्हा मंडपतला दहा फुटी सार्वजनिक गणपतीबाप्पा माझ्याकडे रागाने पाहतोय आणि तो माझे कान कापणार असे वाटायला लागले. तेव्हा माझ्या ताईने मला समजावले आणि माझा आणि गणपती मधील तणाव कमी झाला.
लहानपणी मी बऱ्याच स्पर्धांमधून भाग घेत होतो. या सर्व स्पर्धेत माझा दणाणून पराभव व्हायचा. मी चौथी पास झालो तरी माझ्या बक्षिसांचा दुष्काळ काही संपला नव्हता. एखाद्या स्पर्धेत बक्षीस नाही भेटले तर ती स्पर्धा मला सावत्र आई सारखी वाटायची. त्यावेळी स्पर्धेत तुम्ही कुठे स्टँड होता यापेक्षा तुमची स्पर्धेतील पूर्वतयारी, प्रोसेस हे महत्त्वाचे आहे हे समजणारे शहाणपण यायला त्यावेळी १५ ते २० वर्षांचा अवधी होता. अशा प्रतिकूल परिस्थितीत मी पाचवीला असताना आमच्या सार्वजनिक गणेशोत्सवात दादाने लिहून दिलेले भाषण तोंडपाठ करून माईक समोर फाडफाड बोललो आणि त्या गणेशोत्सवात मला पहिले बक्षीस मिळाले. त्यापुढे मला अनेक बक्षिसे मिळाली. पण मला पहिल्या बक्षिसांसाठी मिळणारे व्यासपीठ गणेशोत्सवाने दिले. त्यामुळे नवोदित कलाकार, स्पर्धक निर्माण करण्यासाठी हा गणपतीच नवी उभारी निर्माण करतो अशी माझी तरी धारणा आहे म्हणून हा देव माझ्या आयुष्यात महत्वाचं स्थान हक्काने घेऊन बसला.
मी लहानपणी लालबागला आजी कडे जात असे. भर दुपारी मला गणेशगल्ली, मार्केटचा गणपती, तेजुकाया मेंशनचे दोन गणपती, चिंचपोकळी, रंगारी बदक हे गणपतीचे सहज दर्शन व्हायचे. या १५ ते ३० फूट उंचीच्या मुर्त्या पाहून मी अवाक होत असे. त्या आश्चर्यात गणपती बद्दल गट्टी अजुन दृढ होत जायची. त्या गणपती समोर त्यांना न्याहाळत ३-५ मिनिटे कधी निसटून जायची माहीत नाही. पण कोणी कार्यकर्ता धक्काबुकी करत नसे. पास तिकिटे वैगेरे या शब्दांचा गणेशोत्सवात जन्म झाला नव्हता. लोकमान्य टिळकांनी घरगुती गणपतीला सार्वजनिक चौकात आणले तेव्हा टिळकांच्या दुरदृष्टी बद्दल अप्रूप वाटले.
पण आता काळ बदलतोय. आता मार्केटचा गणपती हा लालबागचा राजा झाला. गणेश गल्लीचा गणपती मुंबईचा राजा झाला. अनेक मंडळांनी आपल्या गणपती समोर राजा, महाराजा अशा उपाधी लावून गर्दीला आपल्याकडे ओढले. पूर्वी गणपतीच्या अंगावर मातीनेच बनविलेले दागिने, मुकुट पाहून मुर्तीकरांसाठी अप्रूप वाटत असे पण त्या दागिन्यांची जागा आता सोने चांदी हिरे जडीतानी घेतली आहे. पण त्यांसाठी सोनारांसाठी अप्रूप वाटत नाही. सश्रद्ध मंडळे आता व्यावसायिक, राजकारणी मंडळे वाटतात. राजकारणी जसे पक्षांतर करतात तसे मंडपावर झेंडा आपले रंग बदलतो. गणपती भगवा आणायचा की नाही या त्या मंडळाच्या पदाधिकारीच्या पक्षांवर अवलंबून असते. सारी मुंबईची गर्दी ठराविक गणपतीसमोर पिंगा घालत असते. या ठराविक गणपतीच्या व्यतिरिक्त इतर गणपती मंडप ओस पडलेले असतात. गणपती समोरील दान पेट्या मोठ्या झालेल्या असतात. मुखदर्शन, नवंसाची रांग, गणपतीच्या चरणाला स्पर्श करणारी डायरेक्ट रांग अशा प्रकारच्या सगळ्या रांगेतून गणपतीचे दर्शन होऊ लागले. पाच ते दहा तास रांगेत उभे राहून जेव्हा मूर्तीसमोर येतो तेव्हा ३ ते ६ सेकंदात एखादा त्या मंडळांचा कार्यकर्ता बाहेर जाण्याचा मार्ग दाखवतो. प्रचंड गोंधळ, अफाट ताण आणि त्यातल्या प्रत्येकाचा अहंकार, अशा तुडुंब गर्दीत असलेल्या देवांच्या दर्शनाने नक्की काय निष्पन्न होते माहीत नाही. त्यापेक्षा आपण जिथे आहोत तिथे मनाने देवांच्या पायापाशी राहिलेले चांगलं. कारण तिथून बखोटीला धरून कोणीच काढू शकत नाही. मला गणपतीच्या मूर्तीकडे पाहून ऊर्जा भेटते, आनंद भेटतो. एखादा कलाकार, एखादा मूर्तिकार इतकी सुंदर मूर्ती घडवू शकतो याबद्दल या मुर्तिकाराचे कौतुक वाटते. ही माझी श्रद्धा आहे. पण जेव्हा मी गणपती समोर मुलगाच मागतो, मुलगी नको असे बजावून सांगतो. जेव्हा मी गणपतीला महागडा नैवेद्य देऊन दागिने चढवून धंद्यात नफा किंवा नोकरीत प्रमोशन मागतो तेव्हा मी श्रद्धेचे कुंपण तोडून अंधश्रद्धेच्या जंगलात शिरकाव करतो. त्या अंधश्रद्धेच्या जंगलात भोंदू लोक आपली दुकाने ठाण मांडून बसलेली असतात. सुशिक्षित आणि अशिक्षित दोन्ही लोक विज्ञानाला डावलून या अंधश्रद्धेला बळी पडतात. तिथे अंधारात डोळ्यावर काळी पट्टी बांधून काळोख अधिक गडद करण्याचे काम चाललेले असते. हे सर्व भयानक आहे.
शेवटी मला इतकेच सांगायचे आहे की, मुंबईपासून पाच तास प्रवास करून एखाद्या नावाजलेल्या धार्मिक स्थळासमोर पाच तास रांग लावून, देवासमोरच्या मोठ्या झालेल्या पेटीत पाचशे रुपयांची नोट टाकून देव प्रसन्न होतो का? त्यापेक्षा पाच तास छप्पर तुटलेल्या ग्रामपंचायतीच्या शाळेत गरीब मुलांना शिकवून, पाचशे रुपयांची औषधे आदिवासी गरोदर महिलेला मदत म्हणून दिली तर मला वाटते माझा गणपती, माझा साईबाबा, माझा अल्ला, माझा येशू ख्रिस्त अधिक लवकर प्रसन्न होईल आणि आपण पुन्हा अंधश्रद्धेचा जंगलातून श्रद्धेच्या अंगणात बागडत असू. शेवटी स्वदेस चित्रपटातील एक सुंदर ओळ आठवते,
"मन से जो रावण निकाले,
राम उसके मन में हैं,
राम उसके मन में हैं ll
लेखक : निखिल
आपले कमेंट आणि सूचनांसाठी माझा मोबाईल नंबर 9987959084 वाट पाहत आहे. धन्यवाद!