'तुझ्याच्यांनं व्हईल का?' हा प्रश्न वश्याला उर्फ वसंताला सगळेच जण विचारतात. त्याच्या पुरुषपणावर शंका घेतात, कारण का तर तो किडकिडीत आहे. पुरुष कसा असावा? किंवा नवरा कसा असला पाहिजे या संकल्पना भारतीय समाज मनात इतक्या खोलवर रुजलेल्या आहेत की त्या तोडून टाकणं अजूनही जमलेलं नाही. तीच गोष्टी स्त्रियांच्या बाबतीत. स्त्री जर जाड असेल किंवा दिसायला काळी किंवा सुंदर नसेल तर लग्नाच्या बाजारात तिचा कसा निभाव लागणार? तिला मुले कशी होणार हा प्रश्न अनेकजण विचारत राहतात.

ही समस्या किंवा प्रश्न हा काही फक्त आजच्या पिढीचाच नाही. तर तो खूप आधीपासून चिघळत आलेला आहे. 'आटपाडी नाईट्स' या सिनेमाच्या माध्यमातून तो पुन्हा उपस्थित झाला आहे. आणि मराठी बोलणाऱ्या, ऐकणाऱ्या,पाहणाऱ्या माणसांसाठी तो खुलेपणाने बोलायला भाग पाडतो असं म्हणायला हरकत नाही.

वसंताची आई आपल्या लग्न झालेल्या मुलाला जवळ घेते, त्याच्या गालावरून हात फिरवते त्याचे पापे घेते तेव्हा मनाला दिलासा मिळतो. स्वतःच्या बारीकपणाचा न्यूनगंड असलेला आपला मुलगा चांगला आहे हे वारंवार तिच्या कृतीतून दाखवून देते. कुटुंबाचा संवादाचा पूल असलेली ही आई खूपच महत्वाची वाटते.

प्रत्येक कुटुंबातला कर्ता पुरुष हा उत्तमच असला पाहिजे, त्याने घराण्याचा वंश पुढे नेला पाहिजे, आणि एक मर्द म्हणून बाईला कायम खुश ठेवलं पाहिजे या ज्या अपेक्षा आपल्या मनात असतात त्याचं प्रारूप म्हणजे वसंताचे वडील. घरात धाक दाखवत जगणारा, आणि नेमक्या अवघड वेळी मुग गिळून गप्प बसणारा बाप आज अनेक घरांमध्ये दिसतो.

खाटमोडे कुटुंब हे त्या अर्थाने संवादी वाटलं. पण एका बाजूने पारंपारिक गोष्टींच्या स्वाधीन असलेलं देखील वाटलं. लग्न झाल्यावरची वसंत आणि प्रियाची पहिली रात्र. पहाट झाली तरी खाटेचा येणारा आवाज, घरातल्या माणसांची त्यावरून होणारी कुजबुज आणि माडीवर चाललेला धुमाकूळ एकीकडे हसवतो आणि एकीकडे अंतर्मुख करून सोडतो.

पुरुषाने पहिल्या रात्री चांगला परफॉरमन्स दिला पाहिजे, तो जर खूपच चांगला दिला तरीही आश्चर्य आणि नाही दिला तरीही आश्चर्य. या एका गोष्टीमुळे वैवाहिक जीवन कसं सुरुळीत होतं, आणि ते जर झालं नाही, तर काय होतं हे पाहण्यासाठी हा सिनेमा एकदातरी पाहिला पाहिजे.

लैंगिक शिक्षण मुळात काय आणि त्याच्या अज्ञानाचा परिणाम हा समाजजीवनावर कसा होतो या गोष्टींकडे कधीच गांभीर्याने पाहिले जात नाही. मित्र जेव्हा चोरून तसली सीडी पाहतात, आणि त्यातून स्वतःचे समाधान करतात, तेव्हा त्यांनी जे पाहिले त्यातून लैंगिक शिक्षण झाले असा एक समज जनरली रूढ होतो. पण त्यातून मनात अनेक समज- गैरसमज निर्माण होतात. पाहिलेले जेव्हा प्रत्यक्ष सत्यात आणायचा प्रयत्न माणूस करतो तेव्हा मात्र त्याचा भ्रमनिरास होतो.

कुठल्याही नात्यात संवाद आणि गप्पा या गोष्टी जर झाल्या नाही तर, त्या नात्याचे भावनिक, शारीरिक, मानसिक पदर हे खुलत नाहीत. प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ यावी लागते असा जो एक विचार आहे त्याचा जर आपण विचार केला तर मानवी नात्यांच्या बाबतीत तितका वेळ द्यावा लागतो. मुख्यतः स्त्री-पुरुष नात्यामध्ये पुरेसा एकमेकांना वेळ द्यावा लागतो हे ही या सिनेमातून अप्रत्यक्षरीत्या सांगितले आहे.

मला वाटतं, स्त्रियांना जशी आदराची, प्रतिष्ठेची आणि समजून घेण्याची गरज आहे, तशीच पुरुषांच्या बाबतीत पण थोडी जास्त गरजेची आहे. पुरुषाने त्याचं पुरुषत्व हे बेडवर आणि घराच्या बाहेर सतत सिद्ध करून दाखवायचं आणि त्यातून एक कर्ता पुरुष म्हणून जी प्रतिमा जगवत ठेवायची ही जी अपेक्षा आहे त्यातून आपण त्याच्याकडे केवळ एक माणूस म्हणून बघत नाही असेच वाटते.

या सिनेमाच्या निमित्ताने आजच्या समाजाच्या न बोलल्या गेलेल्या आणि लपवून ठेवलेल्या प्रश्नांवरचा पडदा थोडा हलला असं म्हणायला हरकत नाही. हा पडदा पूर्ण दूर होवून, स्त्री-आणि पुरुष मैत्रीच्या नात्यात खुले होवून एकमेकांना समजून घेवून स्वतःचे लैंगिक आयुष्य निरामय आणि आनंदी पद्धतीने जगायला लागतील अशी आशा करते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel