(कल्पनारम्य कथांची माहिती देणाऱ्या लेखमालिकेतील हा दुसरा भाग)
आजच्या लेखांत आपण जगांतील कदाचित सर्वांत प्रसिद्ध अश्या रम्यकथेची ओळख करून घेणार आहोत. JRR टोलकेन हे एक इंग्रज कवी, लेखक तसेच भाषाशास्त्राचे प्राध्यापक आणि संशोधक होते. त्यांचा जन्म १८९२ मध्ये झाला. आमच्या हिंदू पुराणांत एक कथा आहे कि विश्वामित्र ऋषीनी आपल्या तपोसामर्थ्यावर एक प्रतिसृष्टी रचली. त्याच प्रमाणे टोलकेन ह्यांनी सुद्धा एका प्रतिसृष्टीचे निर्माण केले. लॉर्ड ऑफ द रिंग्स हे चित्रपट कुणाला ठाऊक नाहीत ? ह्या चित्रपटांनी तुफान गर्दी तर खेचलीच पण मोठ्या पडद्यावर रम्यकथा कश्या भव्यपणे दाखवल्या जाऊ शकतात ह्याच्या कक्षा रुंदावल्या.
पण चित्रपटांच्या आधी सुद्धा टोलकेन ह्यांची पुस्तके अफाट लोकप्रिय होती. टोलकेन ह्यांच्या नंतर कित्येक सुंदर रम्यकथा निर्माण झाल्या. मार्टिन ह्यांचे गेम ऑफ थ्रोन्स (सोंग ऑफ आईस अँड फायर) , रोवलिंग ह्यांचे हॅरी पोट्टर, जेम्स रिगनी ह्यांचे व्हील ऑफ टाईम इत्यादी पण आज सुद्धा रम्यकथानचा विषय येतो तेंव्हा टोलकेन ह्यांचे स्थान सर्वांत वरचे आहे.
टोलकेन ह्यांच्या कथेबद्दल बोलायच्या आधी लेखक म्हणून त्यांची ओळख करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. इतर लेखकाप्रमाणे टोलकेन ह्यांनी कादंबरी लिहायला घेतली नाही तर त्यांनी एक काल्पनिक विश्वच निर्माण केले. ह्या काल्पनिक विश्वाला एक अत्यंत संपन्न असा हजारो वर्षांचा इतिहास आहे, अनेक प्रकारच्या प्रजाती आहेतच पण त्या सर्वांच्या आपल्या भाषा आहेत आणि त्या भाषेतील साहित्य सुद्धा आहे. प्रत्यक्ष विश्वप्रमाणे भाषांच्या अनेक बोली आहेत आणि ह्या भाषा सुद्धा इतिहासाप्रमाणे बदलत गेल्या आहेत. प्रत्येक शहराला आपला एक इतिहास आहे, आपले एक मिथक आहे.
अश्या ह्या प्रचंड विश्वाला टोलकेन ह्यांनी मिडल अर्थ असे नाव दिले. मराठीत आपण त्याला मध्य धरा असे म्हणू. ४० वर्षे त्यांनी ह्यावर काम केले. लक्षांत घ्या कि हा काळांत संगणक नव्हता, इंटरनेट नव्हता त्यामुळे सर्व काम त्यांना स्वतःला करावे लागत होते. एखाद्या लिखाणात बदल करायचा तर सर्व पान पुन्हा टंकलिखित करावे लागत असे. त्याच वेळी टोलकेन ह्यांनी एलविष हि भाषा सुद्धा निर्माण केली. ह्या भाषेला स्वतःचा इतिहास होता त्याच वेळी अतिशय प्रगल्भ असे साहित्य सुद्धा त्या भाषेंत टोलकेन ह्यांनी निर्माण केले आणि ह्या भाषेतून कविता सुद्धा लिहिल्या. ह्या त्यांच्या प्रतिभेने त्या काळाचे सर्वच लेखक स्तंभित झाले होते. आज काल संगणकाच्या मदतीने नवीन भाषा सहज निर्माण केल्या जाऊ शकतात पण अश्या भाषांतून कविता वगैरे लिहिणे आजकालच्या लेखकांना सुद्धा जड जाते.
१९१६ मध्ये ब्रिटन ने पहिल्या महायुद्धांत भाग घेतला. टोलकेन हे त्यावेळी कॉलेज मध्ये शिकत होते. त्यांनी युद्धांत भाग घेतला नाही आणि आपण कॉलेज मध्ये आहोत हि सबब दाखवून त्यांनी आर्मी मध्ये जाण्यापासून सरकारकडून सूट मिळवली. त्यांचा ह्या निर्णयाने त्यांच्या नातेवाईकांनी त्यांची बरीच टर उडवली. १९४१ आपल्या मुलाला टोलकेन ह्यांनी एक पत्र लिहिले त्यांत ते लिहितात कि त्या काळी बंदूक घेऊन हिंसा करण्याला लोक जास्त महत्व देत होते आणि कल्पनाशक्ती आणि लेखन प्रतिभेची किंमत त्या समाजाच्या नजरेत शून्य होती.
पण शेवटी टोलकेन ह्यांना आर्मी मध्ये जावेच लागले. आपल्या प्रिय पत्नीपासून दूर जाणे त्यांच्या साठी असह्य होतेच पण त्याच वेळी आपल्या मित्रांना युद्धांत मरताना पाहून त्यांचे कवी हृदय अत्यंत पीडित होत होते. त्या निरर्थक हिंसेनेच कदाचित त्यांना मिडल अर्थ निर्माण करण्याचे सुचले असावे पण टोलकेन ह्यांनी स्वतः ते कधीच मान्य केले नाही.
१९१९ मध्ये त्यांना आर्मीतून निवृत्त करण्यात आले. त्यांनी अनेक चकमकीत भाग घेतला होता आणि काही चकमकींत तर त्यांची संपूर्ण बटालियन खलास झाली होती. टोलकेन सुद्धा ह्या युद्धांत खात्रीशीर पणे मारले गेले असते पण त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना माघारी पाठवले गेले. आर्मीतील त्यांच्या अनुभवाबद्दल टोलकेन एक भावना विशेष करून व्यक्त करतात. आर्मीत भेदभाव नसतो, गरीब लोक आणि श्रीमंत लोक एकत्र एकाच तंबूत झोपतात आणि एकाच ध्वजाखाली लढतात, ह्यातून त्यांना अनेक नवीन अनुभव प्राप्त झाले.
टोलकेन ह्यांनी १९१४ मध्ये सिल्मारिलिओन ह्या त्यांच्या पुस्तकावर काम करायला सुरुवात केली. हे पुस्तक त्यांनी कधीच पूर्ण केले नाही, ४० वर्षानंतर त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या मुलाने ते पूर्ण करून प्रकाशित केले.
सिल्मारिलिओन ह्या पुस्तकांत टोलकेन ह्यांनी इआ ह्या विश्वाची निर्मिती केली. इआ विश्वांत मिडल अर्थ हा पृथ्वी प्रमाणे एक लोक आहे त्याच प्रमाणे नुमिनॉर , वालिनॉर, बेलेऱीण्ड हे लोक सुद्धा ह्या विश्वांत आहेत. इलुवतार नावाची एक शक्ती ह्या विश्वांतील सर्वांत मोठी दैवी शक्ती आहे. ह्या शक्तीने (ब्रम्हदेवाप्रमाणे) ऐनूर ह्या देवांची निर्मिती केली. ऐनूर मधील मेलकोर हा सर्वांत शक्तिशाली देव होता. ह्या देवाने इतर देवा पासून फारकत घेतली आणि इलुवतार विरुद्ध बंड पुकारले. इलुवतार प्रचंड शक्तिशाली असल्याने त्याला काहीही फरक पडला नाही. इलुवतार ने शेवटी आरडा नावाचा लोक निर्माण केला आणि सर्व येनूर ना ह्या विश्वांत जाण्याची संधी दिली.
येनूर देवांनी आरडा विश्वांत प्रवेश केला. ह्या देवांतील काही देव जे जास्त शक्तिशाली होते त्यांना वालार असे नाव पडले तर जे कमी शक्तिशाली देव होते त्यांना मायार असे नाव पडले. त्यांनी नवीन विश्वांत रचना करायला प्रारंभ केला पण वारंवार मेलकोर ह्या दुष्ट देवाने त्या रचनेचा संहार सुद्धा केला. शेवटी वालार नी वालिनॉर मध्ये जम बसवला आणि मेलकोर ला मिडल अर्थ मध्ये सोडून दिले. काही हजार वर्षांनी त्यांनी ताऱ्यांची निर्मिती केली आणि त्यामुळे एल्फ ह्या प्रजातीचा जन्म झाला. लॉर्ड ऑफ थे रिंग्स मध्ये दाखविल्या प्रमाणे एल्फ हे सुंदर, सोनेरी केसांचे अमर असे लोक आहेत. (एल्फ हि प्रजाती मूळ जर्मन संस्कृतीतील आहे. एल्फ ना संस्कृत भाषेंत ह्रीभू असे म्हणतात. ). एल्फ शक्तिशाली होते तसेच विद्वान आणि फार चांगले कलाकार होते. वालार नी शेवटी मेलकोर ला पकडून कैदेत टाकले नि सिमिलीरॉन नावाच्या तीन अत्यंत सुंदर अश्या ३ मोत्यांची निर्मिती केली. त्यामुळे सर्व जगाला प्रकाश मिळाला. मेलकोर ने सुद्धा माफी मागितली आणि त्याला वालार नि माफ केले. पण शेवटी तो उलटलाच. त्यांनी तिन्ही मोत्यांची चोरी केली आणि तो पळून गेला.
ह्यामुळे जगाला प्रकाश देण्यासाठी वालार देवांनी सूर्य आणि चंद्र निर्माण केला. आणि ह्याचा परिणाम म्हणून मानवांची निर्मिती झाली. ह्या विश्वाची तीन युगे आहेत. पहिल्या युगांत मेलकोर आणि वालार ह्यांची वरील कथा आहे.
दुसर्या युगांत मेलकोर चा शक्तिशाली नोकर सौरऊन ची कथा आहे. सौरऊन हा लॉर्ड ऑफ द रिंग्स मधील खलनायक. हा आपल्या कपटनीतीने मानवांना वालार देवांच्या विरुद्ध भडकावतो आणि त्यांच्यात युद्ध घडवून आणतो. देवांना ह्याचा इतका धक्का बसतो कि ते इलुवतार कडून मदतीची याचना करतात. इलुवतार त्यांचे ऐकून प्रचंड मोठा प्रलय घडवून आणतो ह्या प्रलयात सौरॉन ची सेने नष्ट होते आणि सौरॉन सुद्धा नष्ट होतो. पण एक मायर देव असल्याने तो निराकार रूपांत विश्वांत संचार करतो.
वालार देवांचे काही भक्त ह्या प्रलयात वाचतात ते गोंडोर ह्या मानवी साम्राज्याची स्थापना करतात. अर्थांत हे सर्व थोडक्यांत झाले. प्रत्यक्ष कथेंत डझन वारी शहरे, खंड, युद्धे इत्यादी आहेत. सर्व राजांची संपूर्ण वंशावळी आहे, प्रेमकथा आहेत, ड्रॅगन्स आहेत, भुते, थरारकथा तसेच विस्मित करणाऱ्या गोष्टी आहेत. मी त्या सर्व इथे सांगू शकत नाही.
अश्या प्रकारे दुसर्या युगाचा अंत होतो.
तिसऱ्या युगांत लॉर्ड ऑफ थे रिंग्स आणि हॉबिट ची कथा घडते. लॉर्ड ऑफ द रिंग्स हे चित्रपट पाहण्यासारखे आहेत आणि त्यांची कथा इथे सांगून मी वाचकांचा रसभंग करणार नाही पण कथेची पार्शवभूमी इथे सांगितल्याने हे चित्रपट तुम्हाला जास्त आवडतील. ह्या चित्रपटांतील खलनाकाय सौरॉन आहे तरीसुद्धा आकार स्वरूपांत तो कुठेही दिसत नाही ह्याचे कारण तुम्हाला समजेल. सौरॉन खलनायक असला तरी सर्वांत मोठा खलनायक नाही. रिंग मिळवण्याचा त्याचा मूळ उद्धेश हा आहे कि तो पाताळ लोकांतील आपला स्वामी मेलकोर ला सोडवू शकेल. मेलकोर ला कथेंत मोरगॉथ असे सुद्धा संबोधित केले आहे.
कथेंतील गंडाल्फ हा एक मायार म्हणजे कनिष्ठ देवता आहे. सरुमन हा सुद्धा एक मायार आहे. कथेच्या शेवटी गंडाल्फ, एल्फ आणि ४ हॉबीट्स हे वालार देवतांच्या शहरांत जातात.
इथे लक्षात घेतले पाहिजे कि इतकी प्रचंड कथा लिहून सुद्धा अनेक गोष्टी टोलकेन ह्यांनी गूढ ठेवल्या आहेत. इलुवतार हिंदू धर्मातील ब्रह्म प्रमाणे एक प्रचंड अज्ञात शक्ती आहे. त्यांच्या शक्तीला सीमा नाही. आरडा हे एक विश्व आहे ज्यांत ह्या सर्व गोष्टी घडतात. त्याशिवाय इतर विश्वे सुद्धा इलुवतार ह्यांनी निर्माण केली असू शकतात. आरडा विश्वांत सुद्धा मिडल अर्थ मध्ये अनेक गूढ गोष्टी आहेत ज्यांची माहिती खुद्द गंडाल्फ सारख्या महाविद्वान मायार देवतेला नाही.
लॉर्ड ऑफ द रिंग्ज मध्ये टॉम बोंबडील नावाचे एक गूढ पात्र आहे. कुठेतरी जंगलात खोलवर हा विचित्र माणूस राहतो. फ्रोडो आणि इतर हॉबिट्स ची तो मदत करतो. एल्फ राजा एलरोड च्या मते त्याच्या पूर्वजांनी सुद्धा टॉम ला एक पुरातन व्यक्तिमत्व म्हणून पहिले आहे. गंडाल्फ च्या मते टॉम मिडल अर्थ मधील सर्वांत जुनी व्यक्ती आहे. टॉम खुद्द स्वतःला सर्वांत जुनी व्यक्ती मानतो. एल्फ च्या निर्माणा आधी सुद्धा तो तिथे म्हणे होता. विक्षिप्त असला तरी त्याचे ज्ञान आणि शक्ती अफाट असते. फ्रोडो चे रिंग त्याच्या हातांत असले तरी रिंग चा काहीही परिणाम त्यावर होत नाही. गंडाल्फ च्या मते रिंग टॉम सुरक्षित पाने ठेवू शकतो पण त्याच्या विक्षिप्त पणा मुळे तो रिंग आठवणीने व्यवस्थित ठेवीलच ह्याची शाश्वती नाही. म्हणून शेवटी रिंग मॉरडोर मध्ये फेकून नष्ट करण्याचा निर्णय होतो.
टोलकेन ह्यांनी ज्या विश्वाची निर्मिती केली ते मानवी प्रतिभेचे आणि कल्पना शक्तीचे जबरदस्त उदाहरण आहे. ह्या विश्वाची कथा टोलकेन ह्यांनी सुमारे ८ विविध पुस्तके आणि शेकडो कवितेंचा माध्यमातून लोकांच्या पुढे ठेवली. काही कविता तर चक्क एलविष भाषेंत लिहिल्या गेल्या आहेत. टोलकेन हे आमच्या आधुनिक काळातील विश्वामित्राच आहेत असे आम्ही म्हणू शकतो.