स्वतःच्या नवऱ्याची मनात असलेली भक्कम प्रतिमा तशीच राहावी म्हणून स्वतःशी झगडणारी मंदोदरी खरी की, अशोक वनात रामाच्या नावाचा जप करत अश्रू ढळणारी सीता खरी? किंवा स्वतःला आवडेल आणि भावेल तो पुरुष उपभोगणारी आणि तरीही अस्वस्थ राहणारी शूर्पा खरी? हे तीन प्रश्न मला 'महाराष्ट्र राज्य हौशी नाट्यस्पर्धेतील' 'अंतरद्वंद्व' हे दोन अंकी नाटक पाहून पडले. या तीन बायकांच्या मनोविश्वाचा खेळ अलौकिक वाटला. या स्त्रिया रामायणातल्या पात्र असल्या तरी आपल्या आजूबाजूला आजही आहेत. त्यापैकीच मी एक आहे, किंबहुना माझ्यातही एक शूर्पा दडली आहे, एक सीता दडली आहे आणि अर्थात मंदोदरी देखील आहे. माझ्यात म्हणण्यापेक्षा आजूबाजूला असणाऱ्या स्त्रियांमध्ये या तिघी दडल्या आहेत असे वाटत राहते.
रावणाने रंभा आणि वेदवतीवर केलेली बळजबरी ही आजच्या युगात होणाऱ्या भीषण बलात्कारासारखीच वाटली. वासनेचे हे अनाकलनीय कांड माणसाच्या आयुष्याचे मातेरे करते, मग तो माणूस लंकाधिपती रावण असो, किंवा आत्ताच्या नुकत्याच घडलेल्या प्रियांका रेड्डीच्या बलात्काराच्या घटनेचे उदाहरण असो. काळ बदलतो, माणसे बदलतात, पण मानवी वृत्ती बदलत नाहीत. रामायण, महाभारत यांसारखे साहित्य हे काळ कितीही पुढे गेला तरीही टिकून आहे याची साक्ष पदोपदी हे नाटक पाहिल्यावर होते.
सत्ता आणि स्त्री या दोन गोष्टी पुरुषाने जर मिळवल्या तरच त्याचा पुरुषार्थ सिद्ध होतो हा विचार त्याला काय काय करायला लावतो हे या नाटकात खूपच प्रभावीपणे मांडला आहे. यातला सध्या असलेला सत्तेचा सिद्धांत आत्ताच्या काळाला किती चपखल लागू होतो हे महाराष्ट्राच्या चालू राजकारणाच्या सत्तेच्या घडामोडीतून दिसून येतेच हे काही सांगायला नको.
या नाटकातला अजून एक मुद्दा जो आत्मपरीक्षण करायला भाग पाडतो तो म्हणजे मंदोदरी आणि सीता या दोघींचे पातिव्रत्य. सीतेच्या बाबतीत तिचा पती राम हा तिच्याशी एकनिष्ठ. पण मंदोदरीचा रावण हा स्त्रीलंपट. तरीही आपला पती हा एक चांगला माणूस आहे, आणि तो असा आहे यात त्याचा दोष नाही, तर इतर व्यक्तींच्या मुळेच तो असे वागतो याचे समर्थन करणारी आणि स्वतःच्या डोळ्यांनी नवऱ्याला इतर स्त्रियांच्या कुशीत पाहणारी मंदोदरी ही अंगावर काटा आणते. ही व्यक्तिरेखा म्हणजे स्त्रीच्या भावविश्वाला एकीकडे झाकोळून ठेवणारी आणि दुसरीकडे आदर्श गृहिणी, पत्नी म्हणून स्वतःचा समझोता करणारी मंदोदरी मनाचा तळ ढवळून टाकते. विसंगतीने परिपूर्ण असलेल्या या जगण्यात मानवी हतबलता, आत्मीयता, आणि प्रिय व्यक्तीबद्दल वाटणारे पराकोटीचे प्रेम अधोरेखित करते.
सगळ्यात बंडखोर आणि स्वैर असूनही अस्वस्थ असलेली शूर्पा अर्थात शूर्पनखा ही व्यक्तिरेखा नाटकातला सगळ्यात महत्वाचा केंद्रबिंदू वाटला. तिचे आणि तिच्या वहिनीचे संवाद, तिच्या भावाबद्दल वाटणारी असूया, प्रेम, द्वेष या भावना, रामाबद्दल वाटणारे आकर्षण, गेलेल्या पतीबद्दल वाटणारे दुःख, सीता आणि मंदोदरी या दोघींच्या पतीनिष्ठेच्या संकल्पनेबद्दल असलेला तिटकारा या सगळ्याच गोष्टी खूप विचार करायला प्रवृत्त करतात. शूर्पा ही स्त्रीच्या मनातल्या प्रामाणिक उघड्या आणि स्वैर भावनांचे प्रतिक वाटली. अगदी स्वतःसाठी खरीखुरी आणि प्रामाणिकपणे जगणारी, आणि जसे आहे तसे वागणारी आणि व्यक्त होणारी स्त्री वाटली.
माणसाच्या मनात चालणारा कल्लोळ आणि त्यातून घडणारे नाट्य म्हणजे रामायण. हे आजही एक आदर्श आणि दैवी असलेले साहित्य या दोन अंकी नाटकातून नव्या दृष्टीकोनातून बघायला मिळाले याचे समाधान वाटले. मानवी मनाचा हा द्वंद्व दिसतो तितका सोपा नाही, आणि वाटतो तितका अवघड पण नाही. पण नाटकाच्या माध्यमातून तो व्यक्त होण्याचा उत्तम प्रयत्न झाला असे तरी नक्कीच वाटत आहे. प्रदीप रत्नाकर आणि जगदीश पवार या दोघांचे खूप आभार. एक चांगली कलाकृती पाहायला मिळाली.