अडयाल बाई एक खडी । पडयाल बाई एक खडी ।मधी गवळ्याची वाडी । त्या गवळ्याच्या दोघी लेकी ।राई आणि चंद्रवळी । राई दिली कान्हा घरीं ।चंद्रावळ दिली गवळ्याघरीं । दोघी वीं लग्रें लागलीं ।राई गेली कान्हा घरीं । चंद्रावळ गेली गवळ्याघरीं चंद्रावळ आणि सासूचंद्रावळ कायच बोलली । दहीदूध साठवीलं ।तूप लोणी साठवीलं । दुधाच्या बासरी भरल्या ।जाईन मदुराच्या हाटी । त्याचा विकरा करीन ।राई बहिणीला भेटीत । तवाच माघारा परतीन ।सासू कायच बोलली ? " नको ग नको चंद्रावळी ।मदुरेचा कान्हा आखाळी । नारी पुरुषाच्या भोगितो ।"सासूचें न ऐकता चंद्रावळ जाते -चंद्रावळ ऐकनाशी झाली ।  दही दूध साठवीलं ।तूप लोणी साठवीलं । दुधाच्या बासर्‍या भरील्या ।आणल साथीशीनदी । ओढलं रेशमी पटाड ।घेतल्या सोनीयाच्या मेखा । घेतली रेशमांची दावी ।तिनं लगडीजी लादिल्या । माग साथीच्या गौळणी । निघाली मदुराच्या हाटा । निघाली येशीच्या बाहेर ।लागली वनाच्या मारगी । एक वन वलांडिलं ।दोन वनं वलांडिलीं । तीन  वनं वलांडिलीं ।चौथ्या पांचव्या वनाला । नगर दिसूं बा लागलं ।कृष्णाच्या नगरीत -गेली येशीच्या जवळीं । अर तूं येशीराख्या दादा ।"आहेस कुणाई वा कोण?" "मी कान्हाचा नोकर "।"तूं कुणाईची कोण ?" "मी गवळ्याची चंद्रावळ ।"उघड म्हणाली येशी वी झडप । गेली मदुराच्या हाटा ।भरल्या कवलारी पेटा । चंद्रावळ निघून चालली ।तिनं लगडी उतरील्या  ।नंदी पागेला लाविला ।विक्रा कराया बसली ।इकडे वेशीराख्या कृष्णाला सांगतो -"गवळण मोठी झाक आली ।"कृष्ण -"अशीलदान घेऊन याजा।"वेशीराख्या अशीलदान मागतो न-"अग अग तू गवळणी । अशीलदान तूं देवाचा ।"चंद्रावळ -"होऊं दे दह्याचा विकरा । होऊं दे लोण्याचा विकरा  ।होऊं दे तुपाचा विकरा । उरुं दे बेरी ना बा शेरी ।मग घालीन तुझ्या तळहातावरी ।"गवळणींना चंद्रावळ म्हणते -"उठा साथीच्या गवळणी । द्याग तोंडीच्या तोंडी ।उपटा माथीयाची शेंडी । " धावल्या साथीच्या गवळणी ।दिली तोंडीयाच्या तोंडी । उपटली माथीयाची शेंडी ।वेशीराख्याची तक्रार -गेला कान्हाच्या जवळीं । " आहो आहो तुम्ही कान्हा ।नको  तुमची चाकरी । नको तुमची भाकरी ।उठल्या साथीच्या गवळणी । दिलें तोंडीयाच्या तोंडी ।उपटली माथीयाची शेंडी । नग तुमची चाकरी नग तुमची नोकरी ।"कृष्ण येऊन वेशींत बसला -हिनं दहीदूध विकरा केला । हिनं लगडीजी लादिल्या ।म्होर साथीच्या गवळणी । मागं साथीच्य गवळणी ।गेली येशीच्या जवळीं ।चंद्रावळ -"अर तूं येशीराख्या दादा । उघडी येशीची झटप ।तूं कुणायाचा कोण?"कृष्ण -"मी मथुरेचा कान्हा । अग तू ग चंद्रावळी ।नको जाऊ तुझ्या गांवाला । जा तुझ्या बहिणीला भेटाया ।पाणी लोणी घालील । बुती भाकरी बांधील ।मग तुला वाट लावील ।"चंद्रावळ निघून जाते -चंद्रावळ ऐकेनाशी झाली । "माझा गवळी लई खट ।"कृष्ण -"तुझा गवळी मला ठाव । शिळ ताक खायाचा ।म्हशीमाग जायचा ।"चंद्रावळ ऐकनाशी झाली । निघाली येशीच्या बाहेरी ।आली आपल्या नगरीला ।कृष्ण राईचा वेष घालून जातो .........कान्हा बोलतो राईला । "अग तूं गई ग अस्तुरी ।सर्वा श्रृंगार द्यावा मला । जातो गोकुळी नाचायला ।बांधू भूक तान्हं लाडू । बांधू बुतीची भाकरी ।"राईचा सर्व वेष घालून आरशांत न्याहाळतो -राईवाणी सुरत दिसूं बा लागली । निघाला येशीच्या बाहेरी ।एक वन वलांडिलं । दोन वनं वलांडिलीं ।तीन वनं वलांडिलीं । चौथ्या पांचव्या वनाला ।आडवीं शेळ्यांची खिलारं ।कृष्ण -"अरं तूं शेळीराख्या दादा । शेळ्यांचीं खिलारं कुणाची ?"खिलारी -"चंद्रावळी या बाईचीं "।कृष्ण -"चंद्रावळीला सांगा जा । राई तुझी बहीण आली ।"तेथून म्होरच निघाला । आडवीं उंटाचीं खिलारं ।तेथून म्होरच निघाला । पानवठ्याला आला ।कृष्ण -पाणवठयाच्या बायानो । चंद्रावळीला सांगा ।राई तुमची बहीण आली ।"चंद्रावळीच्या घरीं -गेला तिच्या वाड्याला । लाजून बसूं बा लागला ।गवळी काय च बोलला । "चंद्रावळी तुझी बहीण आली ।शेज भोज कर जाग । हितगुज बोल जाग । "सांगितलं बायकोला ।सहा महीन्याची केली रात । भोग देऊन निघाला ।निघाला गांवाच्या बाहेर । सार्‍या अंगावरले कपडे जाळून ।गोसावी ग गेली होऊन । युगत लावाया चंद्रावळी ।तिच्या कपाळीं हात बा लावला । गौळी काय बोलता झाला ।" चंद्रवळी  तुझा नूर कां कोमलो । दारी तुळस वाळली ।काय झालें सांग मला ।"चंद्रावळ _"काही नाही झालं मला । गोसाव्यानें युगत लावली ।त्याचा हात बा लागला ।"
 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel