गोप्याचा जन्म

त्या गावचे नाव गोपाळपूर. गाव सुंदर होता. गावाला नदी होती. नदीचे नाव गुणगुणी. उन्हाळयातही नदीची गोड गुणगुण सुरू असे. नदीच्या काठाने किती तरी मळे होते. गावची जमीन सुपीक होती. काळीभोर जमीन. परंतु जमीन जमीनदारांच्या हातांत होती, सावकारांच्या हातांत होती; शेतकरी नावाचेच शेतकरी होते. ते जवळजवळ शेतमजूर झाले होते. दिवसभर राबावे, कष्टावे; परंतु पोटभर खायला नसावे, अशी त्यांची स्थिती होती.

त्या गोपाळपुरात एक सुखी शेतकरी होता. त्याचे नाव बाळा. त्याचे घरदार होते. त्याची शेतीवाडी होती. परंतु त्याला एक दु:ख होते. त्याला मूलबाळ नव्हते. त्याची पहिली बायको मेली. त्याने आशेने दुसरे लग्न केले. काही वर्षे गेली; परंतु मूलबाळ झाले नाही आणि ही दुसरी बायकोही मरण पावली. बाळाने तिसरी बायको केली. काही वर्षांनी तीही मूलबाळ न देता देवाघरी गेली. बाळा दु:खी असे. मेल्यावर आपणाला पाणी कोण देईल असे मनात येऊन तो कष्टी होई. प्रत्येक नवीन लग्न करताना त्याला थोडीफार शेतीवाडी विकावी लागे. हळूहळू तो गरीब झाला. तरीही पुन्हालग्न करण्याची त्याला इच्छा होती. तो एका सावकाराकडे थोडे पैसे मागण्यासाठी गेला. सावकार पैसे देईना.

'नाही म्हणू नका. पुन्हा लग्न करायचा माझा विचार आहे. गरिबाचे लग्न करून द्यावे. पुण्य जोडावे.' बाळा म्हणाला.

'अरे, लग्न करणार तरी किती वेळा? आणि आता तू म्हातारा झालास. तुझे लग्न लावून पुण्य मिळण्याऐवजी पाप मात्र पदरात यायचे. तू उद्या मेलास तर तुझ्या बायकोचे काय होईल? काय खाईल? सारी शेतीवाडी तर तुझी गेली. आता हे घर फत्त राहिले आहे. आता या लग्नाच्या फंदात पडू नकोस.' सावकार म्हणाला.

'मी तर पुन्हा लग्न करणार.'

'अरे तुला कोण देणार मुलगी?'

'आपल्या देशात मुलींना तोटा नाही. प्रेताजवळसुध्दा लग्ने लावायला मुली मिळतील.'

अशी बोलणीचालणी बराच वेळ चालली आणि बाळा थोडे पैसे कर्ज म्हणून घेऊन गेलाच. तो लग्नाच्या खटपटीत गर्क झाला. परंतु त्याला बायको मिळेना. लोक त्याला चिडवीत, हसत. बाळाही त्यांच्यावर संतापे.

'लग्न लावून दाखवीन तरच मी खरा बाळा - ‘असे तो म्हणे.

एके दिवशी सायंकाळी तो एकटाच नदीकाठाने फिरत जात होता. आपल्या विचारांत तो गुंग होता. तो बराच दूर आला. जरा अंधार पडू लागला होता. नदी वाहत होती. त्या बाजूला खोल डोह होता. बाळा जात होता, तो त्याला नदीतीरी कोणी तरी दिसले. कोण होते तेथे? अशा अंधारात त्या डोहाच्या बाजूला कोण आले होते?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel