सारे एकमेकांना भेटले. सर्वांचे डोळे क्षणभर ओले झाले. परंतु पुन्हा ती तोंडे तेजाने फुलली. त्या जंगलात क्रांतीच्या मंगल घोषणा मध्यरात्री दुमदुमल्या.
'ऑगस्ट क्रांतीचा विजय असो.'
'९ ऑगस्ट विजय असो.'
'शेतकरी कामकरी राज्याचा विजय असो.'
'काँग्रेस झिंदाबाद. महात्मा गांधीकी जय.'
ते सारे स्वातंत्र्यवीर पांगले. कोण कोठे गेले, कोण कोठे गेले, ते त्या जंगलाला माहीत; त्या डोंगरांना माहीत.
तालुकाभर धरपकडी होत होत्या. तुरूंग भरून गेले. खास तुरूंग उभे करण्यात आले. अनेकांना फटके मारण्यात आले. वनवासी पुढा-यांचा पत्ता कळावा म्हणून गावोगाव जुलुम सुरू झाला. तरूण असणे हाच गुन्हा झाला ! रात्री दोन वाजता छापे यायचे, दोन-दोनशे हत्यारी पोलीस यायचे. दारे उघडायचे. परंतु शेतक-यांच्या बायाही आता धीट झाल्या होत्या. रात्री पोलीस आले तर त्या दार सत्ताड उघडून म्हणत:
'बघ मेल्या कोण आहे का आता! ते वीर का असे घरात लपतात? ते रानात वाघाप्रमाणे राहतात. तुम्ही इथे येता छळायला.'
तो कोण चालला आहे एकटाच? बरीच रात्र झाली आहे. गोळीबार ऐकू येत आहे. अद्याप लोक प्रतिकार करीत आहेत. हा कोण आहे? त्याच्या हातात का ती बंदूक आहे? परंतु ती घेऊन तो कोठे जात आहे? तो सरकारचा हस्तक की स्वातंत्र्याचा सैनिक? रस्त्यात का ते कोणाचे प्रेत पडले आहे? होय. कोणी तरी गोळीबारात ठार झालेला असावा. देशभक्त की देशद्रोही? हरी जाणे. त्या बंदकवाल्याने आपली बंदूक त्या प्रेताजवळ ठेवली.
'जवळ पुरावा नको.' तो शांतपणे म्हणाला.
तो पुरूष अंधारातून जात होता. सारे रस्ते जणू त्याच्या पायाखालचे होते. कधी तो दाट रानात शिरे, कधी नदीतून त्याला जावे लागे, कोठे जात आहे तो? रात्र आता फार नाही. मुशाफिरा, कोठे जायचे आहे तुला? तू वनवासी राम का आहेस? मग आता उजाडेल ना रे? नको इकडे कोठे जाऊ. कोण पाहिजे तुला? कोणाला शेवटचे भेटून घ्यायचे आहे? लौकर भेट.
अरे, ही तर गोप्याची झोपडी. ही बघा. बाहेर तांबू आहे. आणि झोपडीत कोणी आहे का? ते पाहा दोन चिमणे भाऊ. ते जय-विजय तेथे निजले आहेत. दिनू नि विनू. एकमेकांच्या अंगावर हात ठेवून प्रेमाने दोघे झोपले आहेत. चुलीजवळ काटक्याकुटक्या पडल्या आहेत. तवा आहे. पीठ सांडलेले आहे. हे बाळराजेच दळतात की काय?
तो प्रवासी त्या ढोपडीजवळ आला. तांबू हंबरली. त्याने तिला कुरवाळले.
'तांबू, हंबरू नकोस. कोणाला कळेल आणि पोरे जागी होतील. त्यांना शेवटचे पाहून मी जाणार आहे. तू त्यांची आई हो. त्यांना दुधाची धार दे.'
गाईने त्याचे अंग चाटले. तो पुरूष आत शिरला. त्या चिमण्या मुलांजवळ तो बसला. तो खाली वाकला. त्याने त्यांचे मुके घेतले. त्याच्या डोळयांतील दोन थेंब त्यांच्या गालावर पडले. परंतु ती बाळे जागी झाली नाहीत. त्याने त्यांच्या अंगावरून हात फिरविला. त्यांच्या अंगावरचे पांघरूण जरा नीट केले आणि त्यांच्याकडे तो पाहात बसला. किती वेळ बसणार हा प्रवासी तेथे? बाहेर झुंजूमुंजू होऊ लागले. दिशा फाक लागल्या. आणि हे आवाज कसले? घोडयांच्या टापांचा हा आवाज; आणि गोळीबारही कानी आले. लष्कर आले की काय? तो पुरूष चपापला. त्याने मुलांचा मुका घेतला. तो उभा राहिला.
'सैतान पकडायला आले. घेरणार मला. आता कोठे जाऊ? कोठे लपू?' असे म्हणून तो झोपडीच्या बाहेर आला. त्याने झोपडीचे दार लावले. गाईसमोर बरेच गवत होते. त्या गवताखाली लपावे असे त्याच्या मनात आले. पटकन् तो गवतात शिरला. तांबू मुकाटयाने उभी होती. गवताला तोंड लावीना. काही तरी संकट आहे असे तिला वाटले.