महात्माजी तर म्हणत की, सारी जमीन गोपाळाची आहे. गोपाळ म्हणजे भगवान. गोपाळ म्हणजे शेतकरी. ही सारी जमीन शेतक-याला वाटून दिली पाहिजे. जो कसतो त्याची जमीन. लोडाजवळ बसणारे ऐदी शेणगोळे, त्यांचा काय म्हणून अधिकार?
महात्मीजींचे एक थेर अनुयायी आहेत. ते एकदा म्हणाले होते की, स्वराज्यात सारी जमीन वाटून देऊ. फार तर पंचवीस एकर जमीन एका कुटुंबाजवळ असावी. बाकीची काढून घेतली पाहिजे.
आज ना उद्या काँग्रेस परकीय सत्ता दूर करील नि खरे स्वराज्य आणील. आधी परकी सत्ता दूर करायला हवी. ही परकी सत्ता दूर करायला आपल्या देशात एकच संस्था धडपडत असते. ती संस्था म्हणजे काँग्रेस. या काँग्रेस संस्थेत आपण सर्वांनी शिरले पाहिजे. ठायी ठायी काँग्रेसच्या झेंडयाखालचे शेतकरी - संघ, कामगार - संघ उभे केले पाहिजेत. आपले लढे काँग्रेसच्या मध्यस्थीने सोडवून घेतले पाहिजेत आणि काँग्रेसची प्रचंड चळवळ आली तर तीत सामील झाले पाहिजे.
गोप्यादादा, कदाचित् काँग्रेसची फार मोठी चळवळ येईलही. आपण शेतक-यांनी संघटित होऊन राहिले पाहिजे. अधिक काय लिहू?
मी या पत्राबरोबरच एक पुडके धाडीत आहे. त्यात हस्तपत्रके आहेत. काँग्रेस शेतकरी संघाच्या जाहिराती आहेत. तुम्ही वाचून दाखवा. प्रसार करा. आपण आता उठले पाहिजे. शेतक-यांत चळवळ करा. मला शेतक-यांतच उभे राहिले पाहिजे.
तुमचे दु:ख मी जाणू शकतो. ताराच्या मृत्युची वार्ता ऐकून तुम्ही विव्हळाल. परंतु दु:ख आवरा. ताराचे दोन लहान भाऊ आहेत. त्यांना तुमच्याशिवाय कोणाचा आधार? खरे ना? मी तुमच्या सांत्वनासाठी येणार होतो. परंतु सोन्याच्या मरणाच्या वेळचा तो प्रसंग आठवतो नि मी यायला शरमतो. तुम्ही मला त्या अपराधाची क्षमा करा.
तुम्ही नि मी उद्या स्वातंत्र्याचा लढा आला तर त्यात सामील होऊ. कोटयावधी लोकांचा संसार सुखाचा व्हावा यासाठी काँग्रेसच्या तिरंगी झेंडयाखाली आपण उभे राहू. त्या लढयात मरण आले तरी सुखाने मरू. वंदे-मातरम् - तुमचा दौल्या.
गोप्याने ते पत्र वाचले. किती तरी वेळ त्याला ते पत्र वाचायला लागला. काही काही ठिकाणचा त्याला अर्थही नीट पटकन् समजेना. परंतु शेवटपर्यंत त्याने ते पत्र वाचले. तो विचार करीत बसला. परंतु शेवटी त्याच्या डोळयांतून अश्रू आले. त्यांने हंबरडा फोडला. 'तारा, तारा, कोठे आहेस तू बाळ? तारा, तारा.'
गोप्याला भान राहिले नाही. तो ओक्साबोक्सी रडू लागला. दिनू जागा झाला. विनू जागा झाला. ती मुले रडू लागली.
'बाबा, का रडता बाबा?' दिनूने विचारले.
'तारा गेली. तळयात बुडून मेली. तुमची ताई गेली, बाळांनो तुमची आई गेली, तुमची ताई गेली. अरेरे! कशाला मी तिला दूर पाठविले? दुष्ट आहे मी. पापी आहे मी. लहान गुणी पोर. तिला परक्यांकडे मरमर मरतो काम करायला मी पाठविले. मंजी काय म्हणेल वरती? अरेरे! गेली रे तुमची ताई. आणणार होतो दोन महिन्यांनी घरी. आता कोठून आणू? गेली. अभागी पित्याला सोडून गेली. माझी आई दुर्देवी होती म्हणतात. मीही का दुर्देवी आहे? अरेरे! तारा, बाळ, कोठे आहेस तू? गेलीस सोडून. लाडक्यांनो, सोनुकल्यांनो, या जवळ. तुम्हाला तरी घट्ट धरून ठेवू दे. काय करू? देवा! हे दारिद्र! या दारिद्रयामुळे हे सारे दु:ख. काय आम्हा गरिबांची ही दशा!'
'बाबा, नका रडू. ताई येईल.'
'नाही रे येणार, बाळांनो! ती गेली. कायमची गेली.'
'परंतु, येईन म्हणून सांगून गेली ताई. ती येईल. भोवरा घेऊन येईल. गांधीटोपी घेऊन येईल. हे खोटे पत्र. ताई येईल. बाबा रडू नका, आमच्याजवळ निजा तुम्ही.'
ती लहान मुले बापाला धीर देत होती. दिनू नि विनू बापाचे अश्रू पुशीत होते. करूण, करूण असे दृश्य ते होते. दोन्ही मुलांना जवळ घेऊन गोप्या अंथरूणात पडला. त्याच्या एका बाजूस विनू होता, एका बाजूस दिनू.
'बाबा, माझ्याकडे तोंड करा.' विनू म्हणाला.
'माझ्याकडे करा.' दिनू म्हणाला.
'दिनू, तू मोठा आहेस. लहानाची समजूत आधी घालायला हवी. खरे ना?'
'ताई आम्हा लहान भावांची समजूत घालायची. ताई येईल. खाऊ घेऊन येईल. बाबा, खरेच येईल ताई.'
'तुमचे शब्द खरे ठरोत. देवाकडे गेलेले माणूस परत नाही येत बाळांनो.'
'आईला आणायला ताई गेली असेल. दोघी एकदम येतील. आई नि ताई. गंमत.' मुले म्हणाली.